जॉन लेनन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जॉन लेनन

जॉन लेनन (इंग्लिश: John Lennon) (९ ऑक्टोबर, इ.स. १९४० - ८ डिसेंबर, इ.स. १९८०) हे ख्यातनाम ब्रिटिश गीतकार, संगीतकार आणि गायक होते. बीटल्स या विसाव्या शतकात टीकाकारांची प्रशंसा आणि अपार लोकप्रियता वाट्याला आलेल्या संगीत बॅंडच्या चार संस्थापकांपैकी लेनन एक होते.

जीवन[संपादन]

जॉन लेनन यांचा जन्म आणि सुरुवातीचे आयुष्य इंग्लंडमधल्या लिव्हरपूल शहरात गेले. तेथेच कोवळ्या वयात त्यांची संगीत कारकीर्द सुरू झाली. इ.स. १९६० मध्ये त्यांनी तीन सहकारी संगीतकारांसह बीटल्स या बॅंडची स्थापना केली. पुढे दशकभर अपार लोकप्रियता मिळवल्यानंतर हा बॅंड फुटला. त्यानंतर लेनन यांनी स्वतःची एकट्याची कारकीर्द सुरू केली. इ.स. १९६९ मध्ये योको ओनो या मूळच्या जपानी स्त्रीवादी कार्यकर्तीशी लेनन विवाहबद्ध झाले. इ.स. १९७१ मध्ये ते इंग्लंड सोडून न्यू यॉर्कमध्ये स्थायिक झाले. मुलाकडे लक्ष देता यावे यासाठी इ.स. १९७५ मध्ये त्यांनी संगीत प्रवास थांबवला. मात्र पाच वर्षांनी इ.स. १९८० मध्ये त्यांनी डबल फॅंटसी या अल्बमद्वारे संगीत कारकिर्दीचा पुनरारंभ केला. हा अल्बम प्रसिद्ध झाल्यानंतर तीनच आठवड्यात एका हल्लेखोराने गोळ्या झाडून लेनन यांचा खून केला.

लेनन यांचे स्वतःचे संगीत, लेखन, चित्रे, चलचित्रे आणि मुलाखती यांतून एक बंडखोर, बोचऱ्या विनोदाची झालर असलेले असे व्यक्तिमत्त्व उभे राहते. लेनन यांची राजकीय मते आणि त्यांचे शांतताविषयक कार्य यांवरूनही ते वादग्रस्त ठरले होते.