जिलेबी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जिलब्यांचे जवळून टिपलेले दृश्य

जिलेबी किंवा जिलबी (अनेकवचन: जिलेब्या, जिलब्या; अरबी: زلابية , झलाबिया; उर्दू: جلیبی ; नेपाळी: जिल्फी/जेरी ; पंजाबी: ਜਲੇਬੀ ; पश्तो: جليبي ; फारसी: زولبیا , झुल्बिया; बंगाली: জিলাপী जिलापी; मल्याळम: ജിലേബി ; सिंधी: جلیبی ; सिंहला: පැණි වළලු ; हिंदी: जलेबी ; ) हा इराण, तसेच भारतीय उपखंडातील भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश इत्यादी देशांमध्ये प्रचलित असलेला मिठाईवर्गीय खाद्यपदार्थ आहे. डाळीचे (बेसनाचे) किंवा गव्हाचे आंबवलेले पीठ गोलगोल वेटोळ्यांसारख्या आकारात तेलात सोडून, तळून घेऊन व नंतर साखरेच्या पाकात बुडवून जिलब्या बनवल्या जातात.

जिलब्या गरमागरम असताना किंवा निवल्यानंतर, अश्या दोन्ही अवस्थांमध्ये खाल्ल्या जातात. काहीसा चिवटसर, परंतु काही अंशी कुरकुरीत असा संमिश्र पोत असलेल्या या पदार्थास हाताच्या पंजाएवढ्या विस्ताराच्या अनेक वळ्या किंवा वेटोळी असतात. तेलात तळल्यावर पिठाचा रंग तांबूस-केशरी होतो. या वेटोळ्यांच्या बाह्यावरणावर साखरपाकाचा थर असतो. पदार्थाचा वास व स्वाद खुलवायला या साखरपाकात काही वेळा गुलाबपाणी, केवड्याचा सुगंध, तसेच लिंबाचा रस यांसारखे अन्य घटकपदार्थ मिसळले जाऊ शकतात.

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.