चिनी नववर्ष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
, अमेरिका येथील चिनी नववर्षाचा सोहळा (इ.स. २०११)

सिअ‍ॅटल

मँचेस्टर मध्ये चीनी नवीन वर्ष

चिनी नववर्ष हा चिनी संस्कृतीतील सर्वांत मोठा सण आहे. चीनमध्ये हा सण "वसंतोत्सव" म्हणूनदेखील ओळखला जातो. चिनी दिनदर्शिकेनुसार या काळात शिशिर ऋतूचा शेवट होऊन उन्हाळ्याची सुरुवात होते. उत्सवाची सुरुवात नवीन महिन्याच्या (चिनी: 正月; फीनयीन: : Zhēngyuè) पहिल्या दिवशी होते आणि १५ व्या दिवशी कंदील उत्सवाने समारोप होतो. नववर्षाच्या सायंकाळी, चिनी कुटुंबे वार्षिक सहभोजनासाठी (चिनी: 除夕 ; फीनयीन: Chúxī ) एकत्र जमतात. चिनी दिनदर्शिका चंद्र आणि सूर्याच्या गतीवर आधारित असल्यामुळे चिनी नववर्ष हे "चांद्रमासिक नववर्ष" म्हणून ओळखले जाते.

चिनी नववर्ष हा चीनमधील सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा उत्सव आहे. या उत्सवाची सुरुवात काही शतकांपूर्वी झाली असून अनेक चिनी कथा आणि परंपरांमुळे या उत्सवाचे महत्त्व उत्तरोत्तर वाढतच राहिले. चिनी नववर्ष हे जगभरात चिनी लोकसंख्या अधिक असणाऱ्या देशा-प्रदेशांमध्ये साजरा केला जातो. चीनचे जनता प्रजासत्ताक, हाँग काँग, मकाऊ, तायवान, सिंगापूर, थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, मॉरिशस, फिलिपिन्स, व्हिएतनाम, आणि जगभरातील चायना टाउनांमध्ये साजरा केला जातो. चीनच्या शेजारी देशांमध्येही या उत्सवाचा प्रभाव आहे.

रीतीभाती[संपादन]

उत्सवाच्या पद्धती आणि परंपरा यांबद्दल चीनमध्ये प्रादेशिकतेनुसार वैविध्य आढळते. लोक भेटवस्तू, कपडे, भोजन आणि सुशोभीकरणाच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. घरातील दुर्भाग्य दूर करून सद्भाग्य आणि प्रगतीचा मार्ग मोकळा करण्यासाठी, चिनी परंपरेनुसार घराची साफसफाई करण्याचा रिवाज आहे. दरवाजे आणि खिडक्यांवर "उत्तम आरोग्य", "आनंद", "स॓पत्ती" आणि "वृद्धी" दर्शवणाऱ्या लाल रंगाच्या कागदी कलाकृतींचा वापर सजावटीसाठी केला जातो. नववर्षाच्या आदल्या सायंकाळी, कौटुंबिक स्नेहभोजनात बदक, डुक्कर, कोंबडी यांपासून तयार केलेल्या रुचकर पदार्थांची रेलचेल असते, तसेच गोडाधोडाचाही आस्वाद घेतला जातो. रात्री फटाके उडवून दिवसाची अखेर होते. दुसऱ्या दिवशी सकाळी, वडीलधाऱ्यांना लहान पोरे व तरुण कुटुंबीय उत्तम आरोग्य आणि भरभराटीच्या शुभेच्छा देतात; तर वडीलधारे त्यांना पैसे भरलेले लाल लिफाफे देतात. नववर्षाच्या निमित्ताने जुनी दुःखे, क्लेश विसरून शांती आणि सुखसमॄद्धीसाठी प्रार्थना केली जाते.

चिनी परंपरेनुसार वर्षगणना ही सलग अंकांमध्ये मोजली जात नाही. चीनबाहेर पिवळ्या सम्राटाच्या कारकिर्दीपासून वर्षगणना केली जाते. पण गणनेचा संदर्भबिंदू प्रत्येक विद्वानाने गणनेत वेगळा धरल्याने, इ.स. २०१२ हे वर्ष ४७१०, ४७०९ आणि ४६४९ ठरते.

बाह्य दुवे[संपादन]