Jump to content

सुधाकरराव नाईक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुधाकरराव नाईक

कार्यकाळ
२५ जून, इ.स. १९९१ – २२ फेब्रुवारी, इ.स. १९९३
मागील शरद पवार
पुढील शरद पवार

जन्म ऑगस्ट २१, इ.स. १९३४
गहुली, तालुका पुसद जिल्हा यवतमाळ
मृत्यू मे १०, इ.स. २००१
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

सुधाकरराव राजूसिंग नाईक (ऑगस्ट २१, १९३४; - मे १०, २००१) हे भारतीय राजकारणी आणि जागतिक ख्यातीचे जलतज्ञ , निर्भिड पत्रकार होते. महाराष्ट्राचा 'पाणीदार नेता' , आणि 'जलक्रांतीचे जनक' म्हणून सुधाकरराव नाईक देशभर ओळखले जातात.[] 'महाराष्ट्राचा पाणीदार नेता' , जलक्रांतीचा लढवय्या 'जलनायक' या शब्दात प्रसिद्ध साहित्यिक एकनाथराव पवार यांनी सुधाकरराव नाईक यांच्या प्रेरक कार्याचे वर्णन केले आहे.[] "सरपंच , सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री , मुख्यमंत्री आणि राज्यपाल" असे लोकशाही व्यवस्थामधिल क्रमश: पहिल्या ते सर्वोच्च स्थानावर विराजमान होणारे ते एकमेव नेते मानले जातात. २५ जून, १९९१ ते २२ फेब्रुवारी, १९९३ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्याचा तसेच शेतकऱ्यांना पिक कर्जाच्या दहा टक्के व्याजदर रकमेवरून सहा टक्के व्याजदर करण्याचा क्रांतिकारी निर्णय सुधाकरराव नाईक सरकारने घेतला. अमरावती विद्यापीठ व रामटेक येथील संस्कृत विद्यापीठाची स्थापना देखील त्यांच्या कारकिर्दीत झाली. देशात पहिल्यांदाच जलसंधारण खात्याची स्वतंत्र निर्मिती करून त्यांनी जलक्रांतीचे बीजे रुजवली. महिला आयोगाची स्थापना केली. आधुनिक अभियांत्रिकी शिक्षणाची पायाभरणी केली.तसेच महिला आणि बालकल्याण विभागाची निर्मिती देखील सुधाकरराव नाईक सरकारच्या कारकिर्दीत झाली. मुलींचे शिक्षणाचे प्रमाण वाढीसाठी सुधाकरराव नाईक यांनी मुलींचे शैक्षणिक शुल्क माफीचे तसेच उपस्थिती भत्ता सारखे कल्याणकारी योजना सुरू केली. हरितक्रांती व धवल क्रांतीचे जनक महानायक वसंतराव नाईक यांच्या लोककल्याणकारी ध्येयधोरणावर व राष्ट्रयुगीन विचारांवर वाटचाल करीत राज्य व राष्ट्र बांधणीत मोलाचे योगदान दिले.

सुधाकरराव नाईकांचे वचन/मुलमंत्र

[संपादन]

•पाणी अडवा पाणी जिरवा

•वाहते पाणी चालवायला शिका, चाललेले पाणी थांबवायला शिका आणि थांबलेले पाणी जिरवायला शिका.

•पाण्यासाठी वेळीच उपाययोजना जर झाली नाही, तर या महाराष्ट्राला वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही.

•ग्रामीण विकास हाच देशाच्या विकासाचा राजमार्ग आहे.

•सावज टप्प्यात आल्याशिवाय बार सोडायचा नसतो.

जलक्रांतीचे जनक सुधाकरराव नाईक

[संपादन]

सुधाकरराव नाईक यांना 'जलक्रांतीचे जनक' मानले जाते. जागतिक किर्तीचे जलतज्ञ म्हणून ओळखले जाणारे जलनायक सुधाकरराव नाईक यांनी देशात पहिल्यांदाच जलसंधारण‌ चळवळीचा पाया रचला. जलसंधारण परिषदेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. "पाणी अडवा पाणी जिरवा" हा मुलमंत्र त्यांनी दिला. जलनायक सुधाकरराव नाईक यांची 'शाश्वत जलनीती' ही सन १९९२ च्या कालखंडात देशभर नावारूपाला आली. हिमाचल प्रदेशाच्या राज्यपाल पदाचा राजीनामा देत त्यांनी जलसंधारणाची चळवळ अतिशय सक्षम करून जलसाक्षरतासाठी पुढाकार घेतला.[] जलसंधारण अभियानाच्या कोकण दौऱ्यावर असतांना उष्माघातामुळे प्रकृती गंभीर झाल्याने पुढे अल्पावधीतच त्यांची प्राणज्योत मालवली. जलसंधारण क्षेत्रातील ऐतिहासिक कार्याच्या स्मरणार्थ तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी जलनायक सुधाकरराव नाईक यांचा स्मृतिदिवस 'जलक्रांतीचे जनक' या नात्याने 'जलसंधारण दिन' म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते. तेव्हापासून १० मे सर्वत्र 'जलसंधारण दिवस' म्हणून साजरा केला जातो.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "जलक्रांतीचे जनक सुधाकरराव नाईक". मुंबई: The voice of Mumbai. 2020. 2021-10-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-04-03 रोजी पाहिले.
  2. ^ पवार, एकनाथराव (२०२२). "जलनायक सुधाकरराव नाईक". दैनिक सकाळ.
  3. ^ पवार, एकनाथराव. "जलनायक सुधाकरराव नाईक यांची शाश्वत जलनीती": ०४. Cite journal requires |journal= (सहाय्य)
  4. ^ सुर्वे, धनाजी. "महाराष्ट्राचा पाणीदार नेता सुधाकरराव नाईक, त्यांना'जलनायक'का म्हटल्या जाते?". एबीपी माझा.