शहापूर
शहापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातल्या ठाणे जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे. शहापूर हे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मुंबई पासून ९० कि. मी. अंतरावर वसले आहे. आसनगाव आणि आटगांव हे सर्वात जवळचे रेल्वे स्थानक असून ते मुंबईच्या सीएसएमटी ते कसारा या उपनगरीय रेल्वेमार्गावर मुंबई सी.एस.टी पासून ८५ कि. मी.आणि ९४ कि. मी. अंतरावर आहेत.
शहापूर हा ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे. शहापूर तालुक्यात मुंबईला पाणी पुरवठा करणारी तानसा, वैतरणा आणि भातसा ही तीन धरणे आहेत. मुंबईची व ठाण्याची पिण्याच्या व औद्योगिक क्षेत्राची पाण्याची गरज पूर्णतः शहापूर तालुका भागवतो.सह्याद्रीने वेढलेल्या शहापूर गावालगत किल्ले माहुली व आजोबा डॊंगर ही गिर्यारोहणाची ठिकाणे आहेत.
२००१ च्या जनगणनेनुसार शहापूरची लोकसंख्या १०,४९० असून, ह्यात ५,५७१ पुरुष व ५,११९ स्त्रियांचा समावेश होतो.
विशेष महत्त्वपूर्ण माहिती
[संपादन]शहापूरची संक्षिप्त ओळख ठाणे जिल्हयातील भिवंडी उपविभागात सामाविष्ट करण्यात आलेला, शहापूर तालुका क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका आहे. एकूण क्षेत्रफळ १,५४,२७० हेक्टर म्हणजे १९३९चौ.कि.मी. आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगीतील डोंगरांनी वेढलेल्या शहापूर तालुक्याच्या उत्तरेस नाशिक जिल्हा आहे. दक्षिणेस मुरबाड, कल्याण, भिवंडी हे तालुके तर पश्चिमेस वाडा तालुका आहे. येथे आदिवासींची संख्या जास्त असल्याने आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. ठाकूर, वारली, कोकणा, कातकरी, काथोडी, महादेव कोळी, या, आदिवासी जमाती शहापूर तालूक्यातील आदिवासी जमातीपैकी आहेत. एकूण लोकसंख्येत कुणबी व आगरी समाजाची लोकसंख्या जास्त आहे. मुंबई-आग्रा हा राष्ट्रीय महामार्ग क्र ३ शहापूर तालुक्यातून जात असून संपूर्ण तालुक्यातील त्याची लांबी, ६५ कि. मी. आहे. मुंबई-आग्रा महामार्ग होण्यापूर्वी मुरबाड मार्गे माळशेज-नाणे घाटातून अन्य भागांशी पूर्वीपासून संपर्क होता. तत्पूर्वी ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात, १८४० मध्ये मुंबई-भिवंडी-नाशिक रस्ता सुरू झाला. कल्याण कसारा रेल्वे मार्गाचे काम १८५४ नंतर सुरू झाले. १ ऑक्टोंबर १८५५ पर्यंत कल्याण वासिंद रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले. मुंबई ते वासिंद या पहिल्या रेल्वेची जाहिरातThe Bombay Times मध्ये दिवाळीत देण्यात येऊन वासिंद कडे गाडी सोडण्यात येणार असल्याची बातमी देण्यात आली. ७ नोव्हेंबर १८५५ रोजी दुपारी १ वाजता बोरीबंदरहून (सीएसटी ) गाडी सुटणार आणि ३.३० वाजता वासिंडला पोहचून ती पुन्हा संध्याकाळी ६.१५ वाजता मुंबईला जाण्यास निघणार होती. मे १८५४ ते नोव्हेंबर १८५५ या कालावधीत कल्याण-वासिंद रेल्वे मार्ग पूर्ण होवून आदिवासी-जंगलपट्टीचा प्रदेश असणारया शहापूर तालुक्यात रेल्वे आली त्याला १५० वर्ष पूर्ण झाली आहेत. शहापूर तालुक्यातील विहीगाव-ईहेगावचा पूल हा त्यावेळचा चमत्कार मानला जात होता. शहापूर तालुक्यातील वासिंद हे सर्वात जुने स्थानक आहे. १९२९-३० च्या सुमारास विजेवर चालणाऱ्या गाड्या सुरू झाल्या थळघाट सुरू होण्यापूर्वी तसेच उपनगरीय रेल्वे मार्गाचे शेवटचे स्थानक असलेला कसारा, शहापूर तालुक्यात असून वासिंद, आसनगाव, आटगाव, खर्डी व कसारा ही रेल्वे स्थानके शहापूर तालुक्यात येतात. ब्रिटिश कालीन ग्रेट इंडियन पेनेन्सुला रेल्वे (GIP) म्हणजे सध्याच्या मध्य रेल्वेवर असणाऱ्या आसनगाव स्थानकाचे सध्याचे आसनगाव हे नाव अलीकडील असून त्याचे पूर्वीचे नाव शहापूर होते.आसनगाव स्थानकापासून शहापूर गाव २ कि.मी. अंतरावर तर आटगांव स्थानकापासून ५ कि. मी. अंतरावर आहे. ब्रिटिश काळात बांधलेले रेल्वे गुदाम, बुकिंग ऑफीस आजही कायम आहेत. रेल्वे व रस्ता वाहतुकींच्या सोयीमुळे शहापूरच्या विकासाला चालना मिळाली आहे. शहापूर नावाच्या उत्पातीविषयी निष्कर्ष लावणे अशक्य आहे. काही जेष्ठ नागरिकांच्या मते शहापूरचे मूळ नाव सिंहपूर आहे. सिंहपूरचा अपभ्रंश शहापूर झाले असल्याचे म्हंटले आहे. मुळात शहापूर हे गाव नंतरवसले असावे. कारण कल्याण नाशिक रस्ता माहुली किन्हई खिंड तानसा असा होता. ब्रीटिशकालात तानसा धरणाचे काम सुरू झाल्यानंतर हा रस्ता बंद झाला. तसेच जंगली श्वापद व चोऱ्या ह्यामुळे तेथील वस्ती उठून शहापूर गाव वसत गेले. बहुतांशीवस्ती माहुली परिसरात असल्याची माहिती मिळते. शिवकालीन व पेशवेकालीन कागदपत्रांमध्ये प्रामुख्याने माहुलीचा उल्लेख येतो. शिवकाव्यात माहुलीचा उल्लेख मलयाचल असा करण्यात आला आहे. पेशवाईच्या अस्तानंतर माहुली येथील वस्ती उठत गेली आणि शहापूर गाव वसत गेले. नावात शेवटी असलेला पूर शब्द लक्षात घेता परिसरावर हिंदू राज्यसत्तेचा प्रभाव नाकारता येत नाही.माहुली किल्लाव पुणधे येथील मंदिरावरून हा भाग शिलाहारांच्या प्रभावाखाली असावा. पुढेमध्ययुगात निजामशाही व आदिलशाहीने आपला प्रभाव निर्माण केला. शहाजीराजे सुद्धा आपले वर्चस्व माहुली किल्ला व परिसरावर निर्माण केले. त्यामुळे शहाजी राजांच्या प्रभावामुळे शहापूर नाव पडले कि पातशह्यांच्या प्रभावामुळे शहापूर नाव मिळाले कि सिंहपूरचा अपभ्रंश होवून शहापूर नाव निर्माण झाले याबाबत कोणताही कोणताही ठाम निष्कर्ष काढणे अशक्य आहे. पूर्वीचे सिंहपूर मुघलकाळात शहापूर झाले असावे.शहापूर नावाचे दुसरे एक वैशिठ्य म्हणजे आज शहापूर म्हणून ओळखला जाणारा तालुका पूर्वी म्हणजे सुमारे दीड शतकापूर्वी “कोळवण” तालुका म्हणून ओळखला जायचा. १८६०-६३ मधील “मिलिटरी डीपार्टमेंट डायरी” क्र. ९५७ मधील पृष्ठ ३२५ वर माहुली किल्ल्याचे वर्णन असून हा किल्ला कोळवण तालुक्यात असल्याचा उल्लेख आहे. यावरून शहापूर तालुका पूर्वी कोळवण तालुका म्हणून ओळखला जायचा. ई.स. १८८० च्या सुमारास ब्रीटिशानी कोळवणचे रूपांतर शहापूरमध्ये केले व मोरवाडा पेठा प्रशासनाच्या सोयीसाठी शहापूर पासून वेगळा केला. सिंहपूर, माहुली कोळवण, अशी नावे शहापूरला होती असे लक्षात येते. शहपुरचे हवामान साधारणपणे उष्ण व दमट आहे. भरपूर पाउस व सदाहरित जंगले यासाठी तालुक्याला प्रसिद्धी मिळाली. ठाणे जिल्ह्यातील तानसा अभयारण्य याच तालुक्यात आहे. १९४१ मध्ये शहापूर येथे वनप्रशीक्षण विद्यालय स्थापन करण्यात आले. भरपूर पावसामुळे अर्थातच शेती हे उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. शेती उत्पादन जास्त असून “भाताचे कोठार” म्हणून शहापूर तालुका ओळखला जाई.ब्रिटिश काळात एक उत्तम बाजारपेठ म्हणून शहापूर प्रसिद्ध होते. औद्योगिक विकास मात्र होवू नाही.नो केमिकल झोन मुळे औद्योगिक विकासाला मर्यादा आहेत. तानसा, वैतरणा, भातसा नद्या हा या तालुक्यातील मुख्य जलस्रोत आहे. तानसानदी तालुक्यातील घाटमाथ्यावर उगम पावते. भातसानदिचा उगमही घाटमाथ्यावर असून ही नदी येथेउल्हास नदीस मिळते. वैतरणा नदीचा उगम त्र्यंबकेश्वर येथे झाला असून शहापूर तालुक्यात वाहते व नवघर येथे अरबी समुद्रास मिळते. भारंगीनदीचा उगम माहुली पर्वतावर असून पुढे ती भातसा नदीस मिळते. नद्यांची उपलब्धता आणि पर्जन्यमान यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करण्यासाठी ब्रिटिशकाळात धरणे बांधण्याची कल्पना पुढे आली.आणि स्वातंत्रपूर्व काळात प्रथम तानसा (आटगांव स्टेशन) आणि वैतरणा-मोडकसागर (खर्डी स्टेशन) ही धरणे बांधण्यात आली. तर भातसा धरण (आटगांव स्टेशन) १९६५ मध्ये बांधण्यात आले. तानसा, वैतरणा,भातसा ही मोठी धरणे तर जांभे, मुसई, डोळखांब, आदिवली,वेहळोली व खराडे, हे लघुपाटबंधारे प्रकल्प शहापूरमध्ये आहेत. याशिवाय जपानच्या मदतीनेउभा असलेला चोंढे जलविद्युतप्रकल्प तालुक्यातील डोळखांब येथे आहे.
भूगोल
[संपादन]शहापूर १९.४५ अ़क्षांश उत्तरेस व ७३.३३३ रेखांश पूर्वेस असून समुद्र सपाटीपासून ४५ मी. उंचीवर वसले आहे.
हवामान
[संपादन]येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.
शहापूरकर
[संपादन]विविध जाती धर्माचे लोक वर्षानुवर्षे शहापूरमध्ये एकत्र सुखाने नांदत आहेत. ह्यात प्रामुख्याने हिंदू, जैन, बौद्ध व मुस्लिम धर्मीय लोकांचा अंतर्भाव होतो. हिंदूंमध्ये प्रामुख्याने आगरी, कुणबी,मल्हार कोळी,महादेव कोळी, तेली, ब्राह्मण, वाणी, मराठा, लेवा पाटील आदिवासी, ठाकूर, कातकरी इत्यादी जातींचे लोक आहेत.
नोकरी हे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असल्याने रोज कामानिमित्त मुंबईस ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. उपनगरीय रेल्वे हे दळणवळणाचे प्रमुख साधन आहे. काही लोकांचा शेती हा व्यवसाय आहे. येथे प्रामुख्याने भात शेती केली जाते.शेतीप्रमाणेच तालुक्यात दुग्धव्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन हे व्यवसाय सुद्धा केले जातात.
दळणवळण
[संपादन]शहापूर हे तालुक्याचे मुख्यालय असून या तालुक्यामध्ये जवळजवळ 223 गावे येतात. त्यांपैकी किन्हवली, डोळखांब, शेणवा, वासिंद, कसारा ही बाजाराची प्रमुख ठिकाणे आहेत. तालुक्यात, नडगांव, अस्नोली,बामणे,शेई [तारमळे], खरीड[गगे], गुंड्याचा पाडा, टेंभूर्ली, माणगाव, धसई, अंदाड,आटगांव खर्डी,कसारा, चोंढा, नेहरोली, गेगाव, शेंद्रुण, अल्याणी, दहिवली,दहिवलीपाडा, लेनाड खुर्द ,बुद्रुक ,कसारा,डोळखांब, सावरोली, सोगाव, टाकीपठार, गुंडे, आपटे अशी गावे आहेत
पर्यटन स्थळे
[संपादन]- माहुली किल्ला, शिवगर्भ संस्कार भूमी, शहाजी राजे भोसले निवासस्थान
- अशोका धबधबा ,माहुली
- जांभे धरण
- मानसमंदिर,माहुली.
- शेलवली खंडोबाची प्रती जेजूरी
- पांडवलेणी पुणधे-आटगांव
- टाकीपठार तीर्थ क्षेत्र
- आजोबा पर्वत
- चोंढे धबधबा
- गंगा देवस्थान- गोदावरी सर्वप्रथम येथे आणली. मच्छिंद्रनाथ तपश्चर्या स्थान ६ महिने कालावधी.
- कुंडन धबधबा पर्यटन
शहापूर तालुक्यातील नद्या
[संपादन]- भातसा
- तानसा
- भारंगी
- मुरबी
- शाई
- वैतरणा