शांतीवाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शांतीवाद (Pacifism) हे एक तत्त्वज्ञान आहे जे युद्ध आणि हिंसेचा विरोध करते. भारतीय धर्मांमध्ये (हिंदू धर्म, बौद्ध धर्म, जैन धर्म) 'अहिंसेचे' जे तत्त्वज्ञान आहे तोच शांतीवाद आहे. आधुनिक युगात फ्रांसच्या ईमाइल अर्नाद (Émile Arnaud (१८६४–१९२१)) याने १९०१ मध्ये सर्वप्रथम हा शब्द उचलला होता.

पहिल्या महायुद्धापूर्वी जागतिक स्तरावर शांततावादी संघटनांच्या सदस्यांकडून युद्ध आणि सशस्त्र संघर्ष यांच्या विरोधात जे विचार व्यक्त केले जात होते, त्या विचारसमुच्चयाला ‘शांतिवाद’ असे म्हणले जाऊ लागले. सर्वप्रथम या संज्ञेचा वापर फ्रेंच मुत्सद्दी एमील आर्नो याने १९०१ साली ग्लासगो (स्कॉटलंड) येथे भरलेल्या दहाव्या जागतिक शांतता परिषदेमध्ये केला. पहिल्या महायुद्धाच्या काळात बर्ट्रंड रसेलसारख्या विचारवंतांनी युद्धाला विरोध म्हणून युद्ध प्रयत्नांना कोणतेही सहकार्य न करण्याचा व्यक्तिगत पातळीवर घेतलेला निर्णय शांतिवादाचाच आविष्कार होता. विसाव्या शतकात झालेल्या दोन जागतिक महायुद्धांच्या कालखंडात युद्धाला प्रतिबंध करण्याच्या दिशेने जे विचार व्यक्त करण्यात आले आणि जे प्रयत्न झाले, ते सर्व शांतिवादाच्या संकल्पनेचाच आविष्कार मानले जातात.

जगातील विविध जनसमूह, राष्ट्रे किंवा सामाजिक संबंध यांत ‘चिरंतन शांतता’ हे एक सकारात्मक मूल्य मानून नजीकच्या भविष्यकाळात ते साध्य करता येईल, या विश्वासापोटी केलेल्या सर्व कृती, आखलेले कार्यक्रम हे व्यापक अर्थाने शांतिवादी उक्ति-कृतींचेच स्वरूप आहे. सर्वसामान्यांच्या दृष्टीने ‘शांतिवाद’ म्हणजे युद्धाच्या समूळ उच्चाटनाची चळवळ आहे. अर्थात केवळ आंतरराष्ट्रीय संबंधांत हिंसेचा त्याग, शांततामय मार्गाने संघर्षाची सोडवणूक, शस्त्रसंभाराला विरोध आणि जागतिक पातळीवर शांततामय सहजीवनाचे वातावरण निर्माण करणे, एवढेच शांतिवादाचे उद्दिष्ट नाही. शांतिवाद ही संकल्पना यापेक्षा व्यापक आहे. यात व्यक्ति-व्यक्तींमधील परस्परसंबंधांमध्ये हिंसेचा त्याग करणे, दुसऱ्याच्या अस्तित्वाचा हक्क मान्य करणे, परमताबाबतची सहिष्णुता यांसारख्या मूलभूत नैतिक मूल्यांचा समावेश होतो.

प्राचीन काळात युद्ध, सशस्त्र कलह, हिंसाचार इ. गोष्टींना नैसर्गिकच मानले जाई. त्याकाळी मानवीसंबंधांत शांतिवादाची प्रेरणा नव्हती त्यामुळे सशस्त्र हिंसक संबंधांना पर्याय देण्याचा विचारही तेव्हा पुढे येऊ शकला नाही. प्रसिद्ध जर्मन तत्त्वज्ञ इमॅन्युएल कांटच्या मते दोन भिन्न वंशीय गटांतील किंवा टोळ्यांतील शांततामय संबंध ही नैसर्गिक अवस्था नसते ती जाणीवपूर्वक, प्रयत्नपूर्वक प्रस्थापित करावी लागते. दीर्घकालीन युद्धातून होणारा विध्वंस आणि समाजात येणारे दुबळेपण यांतूनच भूतदयावादी प्रेरणा निर्माण झाल्या व त्यातून शांतिवादाचा विचार लोकजीवनातील एक अधिकृत मूल्य म्हणून पुढे येऊ लागला. हत्या, हिंसाचार, युद्धे यांचा निषेध व शांतीचा पुरस्कार बहुतेक सर्वच धर्मांनी केलेला आहे. मात्र प्रत्येक धर्माच्या शांतिवादाच्या प्रेरणा व कल्पना एकसारख्या आहेत असे मात्र नाही. तसेच शांतिवाद हा केवळ धार्मिक विचार नाही. बळ अथवा शिक्षेचे भय हा समाजाचा आधार आहे, हे तत्त्व शांतिवाद्यांना मान्य नाही. प्रसिद्ध रशियन तत्त्वज्ञ लीओ टॉलस्टॉयच्या विचारांचा हाच आधार आहे. व्यक्तिगत, सामूहिक तसेच संघटनात्मक पातळ्यांवर शांतिवादाचा पुरस्कार पूर्वीपासून करण्यात आल्याचे दिसते. उदा., इंग्लंडमधील क्वेकर पंथीय (सतरावे शतक) हे शांततेचे पुरस्कर्ते होते. पहिल्या जागतिक महायुद्धकाळात बर्ट्रंड रसेल, सी.ई.एम. जोड यांनी युद्धास विरोध केला होता. एच.आर.एल. शेपर्ड यांनी युरोपात ‘पीस प्लेज मूव्हमेंट’ स्थापन केली होती (१९३६). महात्मा गांधींचे सत्याग्रहाचे व अहिंसेचे तत्त्वज्ञान हा आधुनिक शांतिवादाचा एक महान आविष्कार आहे.

आधुनिक काळातील शांतिवाद हा धार्मिक विचारांतील निरपवाद शांतिवादापेक्षा वेगळा आहे. शांतिवादाची बीजे धार्मिक विचार आणि तत्त्वज्ञानात असली, तरी आधुनिक शांतिवाद धार्मिक परंपरांपासून वेगळ्या स्वरूपात विकसित झालेला दिसतो. युद्धातून येणाऱ्या निर्घृणतेला, सामूहिक हत्यांना आणि मानवी प्रतिष्ठेला धक्का देणाऱ्या अमानुष कृत्यांना मानवतावादी भूमिकेतून होणारा विरोध हा आधुनिक शांतिवादाचा आधार आहे. शांतिवाद हे निःष्क्रियतेचे तत्त्वज्ञान नाही, तर समाजा-समाजातील, राष्ट्रा-राष्ट्रांतील हिंसात्मक संघर्ष टाळण्याचा तो विधायक विचार आहे. व्यक्तिगत पातळीवर स्वतः कोणतेही शस्त्र न बाळगणे, दूरान्वयानेदेखील युद्धाला कारण ठरणाऱ्या कृत्यात सहभागी होण्यास नकार देणे आणि कोणत्याही जीवघेण्या शस्त्राच्या वापराला साहाय्यभूत कृती करण्याला विरोध करणे, असा कृतिकार्यक्रम त्यात अभिप्रेत आहे. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने किमान बळाचा वापर किंवा प्रतिकाराचा अभाव महत्त्वाचा असेलही परंतु हे तत्त्व आपल्यापेक्षा समर्थ, प्रबळ, ताकदवान प्रतिस्पर्ध्याला स्वीकारायला लावणे अवघड असल्यामुळे राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी लष्कर आवश्यक ठरते. सर्व स्तरांवर सर्वकाळी युद्धाला विरोध हा आदर्शवाद झाला. प्रत्यक्ष व्यवहारात मात्र काही अपवादात्मक परिस्थितीत काही अटींवर युद्धाचा स्वीकार करावा लागतो. उदा., स्वसंरक्षणार्थ केलेले युद्ध, नास्तिक किंवा अश्रद्ध बंडखोरांविरुद्धचा संघर्ष, अन्यायाविरुद्ध इत्यादी.

देशांतर्गत राजकारणातील शांतिवादाचे स्वरूप थोडे वेगळे आहे. मानवी संस्कृतीच्या इतिहासात राज्यसंस्थेच्या संदर्भात कोणत्याही काळात बळाचा वापर केल्याशिवाय व्यवस्था निर्माण झालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. सार्वभौम सत्तेच्या आज्ञांमागे काही शक्ती असते केवळ इच्छाशक्ती पुरेशी नसते, व्यवस्था चालू ठेवण्यासाठी पोलीस दल, न्यायालये, प्रशासन अशी राज्यव्यवस्थेतील बले आवश्यक ठरतात. सत्ताधारी आणि सामान्यजन यांत अनेक वेळा अनेक बाबतींत संघर्ष निर्माण होण्याचा धोका असतो. यातून व्यवस्था टिकवून ठेवणे महत्त्वाचे असते. शांतिवादाचा या संदर्भातील अर्थ म्हणजे हे वाद, ताणतणाव, संवैधानिक पद्धतीच्या चौकटीत राहूनच सोडवावेत असा आहे. येथे हिंसाचारी चळवळींना प्रतिबंध अभिप्रेत आहे आणि त्यासाठी राज्यव्यवस्थेकडून किमान बल-प्रयोग क्षम्य मानला जावा, हा व्यवहार्य तडजोडीचा भाग आहे. अन्यथा व्यवस्था टिकून राहणार नाही.

नोंदी[संपादन]

1. Beals, A.C.F. History of Peace, Toronto 1931. 2. Heard, Gerald and Others, New Pacifism, London, 1937.

हे सुद्धा पहा[संपादन]