Jump to content

विलिस टॉवर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


विलिस टॉवर ही अमेरिकेच्या शिकागो शहरातील एक गगनचुंबी इमारत आहे. विलिस टॉवर अमेरिकेतील सर्वात उंच इमारत आहे. ह्या इमारतीचे बांधकाम इ.स. १९७४ साली पूर्ण झाले व तेंव्हापासुन इ.स. १९८८ पर्यंत विलिस टॉवर जगातील सर्वात उंच इमारत होती. ह्या इमारतीत १०८ मजले आहेत व एकूण उंची ४४२ मीटर आहे. जेव्हा ही बांधली गेली त्यावेळी ही जगातील सर्वात उंच बिल्डिंग होती. या बिल्डिंगचे पूर्वीचे नाव 'सिअर्स टॉवर' असे होते पण इ.स. २००३ साली 'सिअर्स, रीबक & कं.'चे 'सिअर्स' नावाचे अधिकार संपले पण नवीन नाव काही लागले नाही. मार्च इ.स. २००९ मध्ये विलीस ग्रुप होल्डिंग्स ली., या लंडनमधील कंपनीने याचे अधिकार घेतले आणि दिनांक १६ जुलै इ.स. २००९ रोजी सकाळी १० वाजता याचे नाव विलिस टॉवर असे अधिकृत रित्या बदलले. जगातील असंख्य 'सिअर्स टॉवर'च्या चाहत्यांसाठी हा एक धक्का होता.

इतिहास

[संपादन]

'सिअर्स, रीबक अँड कं.' ही कंपनीऑ इ.स. १९६९ साली जगातील रिटेल क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी होती. त्यांची अनेक ऑफिसे शिकागो शहरामध्ये पसरलेली असून त्यात त्याकाळी ३,५०,००० लोक काम करत असत. 'सिअर्स, रीबक अँड कं.'च्या उच्च अधिकाऱ्यांनी आपले सर्व कर्मचारी एकाच ठिकाणी कामास बसतील, अश्या वास्तुरचनेवर विचार करण्यास आरंभ केला. या कल्पनेतून पुढची पावले टाकले गेली या इमारतीचे चित्र तयार झाले. कंपनीचा भविष्यकालीन विस्तार लक्षात घेता साधारण ३० लाख चौरस फूट एवढी जागा लागेल असा अंदाज करून विचार चालू झाला. भविष्यकालीन विस्तार होईपर्यंत मोकळी असलेली जागा छोट्या व्यावसायिकांना देण्याचा विचार झाला. त्यांना ती जागा परवडायला हवी असेल तर जागा लहान हवी. जागा लहान पण खिडक्या आणि बाहेरचे दृश्य मात्र चांगले दिसायला हवे, यासाठी प्रत्येक मजल्यावर कमी क्षेत्रफळाची पण जास्त उंच अशी इमारत बनवण्याची कल्पना पुढे आली. ९ मोठ्या नळ्या एकत्र करून जशी भौमितिक आकृती, तसे एक चित्र तयार झाले आणि मंजूरही झाले. सर्वांत खाली ५५००० चौरस फूट आणि हळूहळू वरती कमी होत जाणारे क्षेत्रफळ असे चित्र करताना ही इमारत १०० मजल्यांहून अधिक उंच होणार, असे लक्षात आले. फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन या संस्थेच्या नियमांचे पालन करत इ.स. १९६९ साली याचे काम सुरू झाले आणि मे, इ.स. १९७३ला पूर्ण झाले. त्याकाळी या इमारतीला १५ कोटी अमेरिकन डॉलर खर्च आला होता. हा सर्व खर्च 'सिअर्स, रीबक अँड कं.' ने उचलला होता. इ.स. १९८२ साली २ अँटेना तेथे बसवण्यात आले ज्यामुळे त्याची उंची १७०७ फूट झाली. दूरचित्रवाणी प्रसारण चांगले होण्यासाठी नंतर त्यातला एक अँटेना अजून वाढविल्यावर ती १७३० फूट, अर्थात ५२७ मीटर झाली.

पर्यटन सुविधा

[संपादन]

या इमारतीचा १३५३ फूट उंचीवर असलेला १०३वा मजला सार्वजनिक रित्या खुला असून तिथे पर्यटकांना नेण्यासाठी २६ फूट प्रतिसेकंद या वेगाने चालणारी लिफ्ट आहे. या मजल्यावरून भोवतालाचे विहंगम दृश्य न्याहाळण्यास 'द स्काय डेक' नावाने ओळखले जाणारी गच्ची आहे. आकाश स्वच्छ असेल, तर या गच्चीवरून शिकागो शहर व परिसरातला ५० मैल एवढ्या अंतरापर्यंतचा प्रदेश पाहता येतो. ईल्लिनोइस , इंडियाना, मिशिगन आणि विस्कॉन्सिन या ४ राज्यांतील बराचसा प्रदेश नजरेच्या टप्यात येतो.

या गच्चीवर पर्यटकांना उंचीवरील थरार अनुभवण्यासाठी संपूर्णतः काचेची बाल्कन्या बांधवल्या आहेत. जानेवारी इ.स. २००९ मध्ये यांचे काम चालू झाले. सुमारे ४ फूट बाहेर काढलेल्या या ३ बाल्कन्या संपूर्णपणे काचेच्या बनवल्या आहेत. प्रत्येक बाल्कनीत ५ टन वजन घेण्याची क्षमता आहे. २ जुलै इ.स. २००९ रोजी या बाल्कन्या सार्वजनिक वापरासाठी खुल्या करण्यात आल्या.

हे सुद्धा पहा

[संपादन]