Jump to content

नानासाहेब सरपोतदार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नरहर दामोदर ऊर्फ नानासाहेब सरपोतदार (जन्म: नांदवली, रत्‍नागिरी जिल्हा, महाराष्ट्र, ११ फेब्रुवारी इ.स. १८९६, - पुणे, २३ एप्रिल इ.स. १९४०:) हे मराठी चित्रपटसृष्टीचे एक आद्य शिल्पकार समजले जातात. ते अभिनेते, लेखक व चित्रपट निर्माते होते. ते स्त्री-भूमिकाही करत.

नानासाहेब नोकरी करून शिक्षण घेण्यासाठी मुंबईला गेले, तेथून वयाच्या तेराव्या वर्षीच घर सोडून ते महाराष्ट्र नाटक मंडळीत जाऊन राहिले. तिथे वत्सलाहरण, सैरंध्री, दामाजी या चित्रपटांत छोटया-मोठया भूमिका केल्या. आईच्या आग्रहाखातर, शिक्षणासाठी ते एका नातेवाइकाकडे इंदूरला गेले. तिथेही अभ्यासात त्यांचे लक्ष लागेना. शेवटी नटश्रेष्ठ गणपतराव जोशी यांच्या ओळखीने २१ ऑक्टोबर १९१९ रोजी नव्यानेच स्थापन झालेल्या कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीत ते दाखल झाले.

१९२७ सालच्या विजयादशमीच्या मुहूर्तावर पर्वतीच्या पायथ्याशी, आदमबाग येथे एक रुपया भांडवलावर सरपोतदारांनी आर्यन फिल्म कंपनीची स्थापना केली. आठ आणे जमिनीचे भाडे व बाकी आठ आण्याचे पेढे, नारळ, हार, फुले घेऊन मुहूर्त केला गेला. पुढे चित्रपट प्रदर्शक, मुंबईच्या कोहिनूर थिएटरचे मालक बाबुराव कान्हेरे आर्यन फिल्म कंपनीच्या भागीदारीत आले. सरपोतदार अनुभवी नट, लेखक, दिग्दर्शक होतेच याशिवाय ते छायालेखनही शिकले होते. आता ते निर्मातेही झाले होते. हरहर महादेव हा आर्यनचा पहिला चित्रपट होता, पण चित्रपटाच्या नावावर ब्रिटिश सेन्सॉर बोर्डाने हरकत घेतल्यामुळे त्यांनी नाव बदलून निमक हराम केले.

नाशिकजवळच्या येवळे गावातील अंबू सगुण नावाची मुलगी मूकपटात बालकलाकाराची भूमिका करत असे. नानासाहेबांच्या आर्यन फिल्म कंपतीत प्रथम ती नायिका झाली व पुढे ललिता पवार या नावाने लोकप्रिय झाली. महाराची पोर हा चित्रपट सरपोतदारांनी लिहून दिग्दर्शित केला होता. अंबू ऊर्फ ललिता पवारने महाराजाच्या मुलीची भूमिका केली होती. हा चित्रपट पहायला सरोजिनी नायडू गिरगावातील मॅजेस्टिक सिनेमात आल्या होत्या. या चित्रपटाची महात्मा गांधी, मौलाना शौकत अली, बॅरिस्टर बाप्टिस्टा, अच्युत बळवंत कोल्हटकर आदींनी मुक्तकंठाने प्रशंसा केली होती. मद्रासच्या हिंदू, जस्टिस वृत्तपत्रांनी अग्रलेख लिहून सरपोतदारांचे कौतुक केले होते.

नवोदित कलाकारांना संधी

[संपादन]

नानासाहेब सरपोतदारांनी शाहू मोडक, ललिता पवार, राजा सॅंडो, रत्‍नमाला, भाऊराव दातार, पार्श्वनाथ आळतेकर, डी. बिलिमोरिया आदी कलावंतांना चित्रपटांत काम करण्याची पहिली संधी दिली.

मूकपटांची निर्मिती

[संपादन]

१९२८ ते १९३० या काळात नानांनी चोवीस मूकपटांची निर्मिती व दिग्दर्शन केले. यातील सहा मूकपटांची नायिका अंबू ऊर्फ ललिता पवार होती. यातील बहुतेक मूकपट चांगले चालले. १९३१मध्ये बोलपटांचा जमाना चालू झाल्यावर नानासाहेबांनी चित्रपटनिर्मिती थांबवली.

चित्रपट दिग्दर्शन

[संपादन]

अर्देशीर इराणी यांच्या इंपीरियल कंपनीचा ‘रुक्मिणीहरण’ (१९३३) हा बोलपट नानासाहेबांनी दिग्दर्शित केला. यामध्ये डी. बिलिमोरिया, पंडितराव नगरकर, भाऊराव दातार यांनी भूमिका केल्या होत्या. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘देवकी’ या बोलपटात भाऊराव दातार, मिस दुलारी व राजा सॅण्डो होते. १९३८ साली ‘रवींद्र पिक्चर्स’साठी ‘संत जनाबाई’ व ‘सरस्वती सिनेटोन’साठी ‘भगवा झेंडा’ चित्रपटांचे दिग्दर्शन केले.

पूना गेस्ट हाऊस

[संपादन]

चित्रपट व्यवसाय हा बिनभरवशाचा धंदा आहे, हे ओळखून नानासाहेबांनी १९३६ च्या अनंत चतुर्दशीला लक्ष्मी रोडवरील सामान्यजनांना स्वस्तात पोटभर भोजन मिळावे, म्हणून ‘पूना गेस्ट हाऊस’ उघडून केवळ दोन आण्यांत राइस प्लेट चालू केली. स्वस्त आणि रुचकर अन्नपदार्थ, नानासाहेबांचा बोलका-मिष्कील स्वभाव यामुळे थोडयाच अवधीत ‘पूना गेस्ट हाऊस’ कलावंत आणि साहित्यिकांचे उतरायचे आणि भेटायचे आवडते ठिकाण बनले. नानासाहेबांच्या निधनानंतर पूना गेस्ट हाऊसचा कारभार त्यांचे चिरंजीव चारुदत्त सरपोतदार सांभाळू लागले.

लेखन

[संपादन]

नानासाहेब सरपोतदारांना चांगले साहित्य वाचायची आवड होती. ते लेखकही होते. मौज साप्ताहिकात त्यांनी काही परखड लेख लिहिले होते. नानासाहेबांनी लिहिलेली काही नाटके:-

  • उनाड मैना
  • चंद्रराव मोरे
  • बाजीरावचा बेटा, वगैरे.’ .

पटकथालेखन असलेले चित्रपट

[संपादन]
  • उडाणटप्पू (मूकपट, निर्मिती व दिग्दर्शन)
  • कल्याण खजिना
  • गनिमी कावा (मूकपट, निर्मिती व दिग्दर्शन)
  • चंद्रराव मोरे (दिग्दर्शन)
  • दामाजी (पटकथालेखन)
  • देवकी (दिग्दर्शन)
  • निमक हराम (आधीचे नाव- हरहर महादेव) (निर्मिती)
  • पतितोद्धार (मूकपट, निर्मिती व दिग्दर्शन)
  • पारिजातक (मूकपट, निर्मिती व दिग्दर्शन)
  • प्रभावती (मूकपट) (पहिले दिग्दर्शन)
  • भगवा झेंडा (दिग्दर्शन)
  • भवानी तलवार (मूकपट, निर्मिती व दिग्दर्शन)
  • भीमसेन (मूकपट, निर्मिती व दिग्दर्शन)
  • मराठ्याची मुलगी (मूकपट, निर्मिती व दिग्दर्शन)
  • महाराची पोर (लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती)
  • रक्ताचा सूड (दिग्दर्शन)
  • राजा हरिश्चंद्र (मूकपट, निर्मिती व दिग्दर्शन)
  • रायगडचे पतन (दिग्दर्शन)
  • रुक्मिणीहरण (दिग्दर्शन)
  • वत्सलाहरण (पटकथालेखन)
  • शहाला शह (पटकथालेखन)
  • संत जनाबाई (दिग्दर्शन)
  • सती सावित्री (पटकथालेखन)
  • सिंहगड (पटकथालेखन)
  • सुभद्राहरण (मूकपट, निर्मिती व दिग्दर्शन)
  • सैरंध्री (पटकथालेखन, पहिला चित्रपट)

सन्मान

[संपादन]

पुण्यातील आदमबाग रस्त्याला नानासाहेब सरपोतदारांचे नाव देण्यात आले आहे.