दत्तोपंत ठेंगडी
दत्तोपंत बापूराव ठेंगडी | |
---|---|
जन्म: | नोव्हेंबर ११, इ.स. १९२० आर्वी, ब्रिटिश भारत (विद्यमान आर्वी, वर्धा जिल्हा, महाराष्ट्र, भारत) |
मृत्यू: | ऑक्टोबर १४, इ.स. २००४ पुणे, महाराष्ट्र, भारत |
चळवळ: | कामगार चळवळ |
संघटना: | भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ, स्वदेशी जागरण मंच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ |
धर्म: | हिंदू |
वडील: | बापूराव |
दत्तोपंत बापूराव ठेंगडी (जन्म : आर्वी (वर्धा), नोव्हेंबर १०, इ.स. १९२०; - पुणे, ऑक्टोबर १४, इ.स. २००४) हे मराठी कामगार चळवळकर्ते, हिंदू तत्त्वचिंतक, राजकारणी होते. हे भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ, स्वदेशी जागरण मंच इत्यादी संस्थांचे संस्थापक होते. इ.स. १९६४-७६ या कालखंडात ते भारताच्या राज्यसभेचे सदस्यही होते.
दत्तोपंतांचा जन्म १० नोव्हेंबर १९२० रोजी, वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे झाला. शिशुवस्थेपासूनच दत्तोपंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघरूपी पाठशाळेचे विद्यार्थी होते. तेथूनच त्यांना देशभक्तीचे बाळकडू मिळाले. वयाच्या १५ व्या वर्षापासूनच त्यांनी समाजसेवेला प्रारंभ केला. आर्वी तालुका वानरसेनेचे दत्तोपंत १९३४ साली अध्यक्ष झाले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपुरात झाले. विशेष म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना दत्तोपंत गोळवलकर गुरुजींच्या घरीच निवासाला होते. साहजिकच त्यांच्यावर गोळवलकरांच्या विचारांचा प्रभाव पडला.
इ.स. १९४२ पासूनच दत्तोपंत ठेंगडींनी स्वतःला संघकार्याला वाहून घेतले. आजीवन अविवाहित राहण्याचा निर्णयही त्यांनी घेतला. त्याच वर्षी ते केरळ प्रांताचे प्रांत प्रचारक झाले. कम्युनिस्टांचे सरकार आणि संघाचा कट्टर विरोध अशा वातावरणात जिवाची बाजी लावूनच संघाचा प्रचार आणि प्रसार करावा लागत असे. ते आव्हान दत्तोपंतांनी स्वीकारले. केरळ प्रांतात सर्वदूर संघाचे जाळे विणण्याचे काम त्या वेळी त्यांनी केले.
१९४८-४९ मध्ये दत्तोपंत बंगाल आणि आसाम प्रांताचे प्रांत प्रचारक होते, संघदृष्ट्या दोन्ही प्रांतांची स्थिती केरळसारखीच होती. तेथेही दत्तोपंतांनी खंबीरपणे पाय रोवले व संघकार्य उभे केले. दत्तोपंतांची कुशाग्र बुद्धी, प्रामाणिकपणा, कार्याविषयी एकनिष्ठता, दूरदृष्टी सर्वांनाच प्रभावित करीत असे. गोळवलकर गुरुजींनी त्यांच्यातील या गुणांची अचूक पारख केली. गुरुजींनी दत्तोपंतांना कामगार क्षेत्रात काम करण्याची सूचना केली.
कामगार क्षेत्र दत्तोपंतांकरिता नवखे होते. १९२० पासून कामगार क्षेत्रात कम्युनिस्टांचे वर्चस्व होते. कामगार क्षेत्र राजकारणी लोकांच्या हातचे बाहुले बनले होते. कम्युनिस्टांचे कामगार क्षेत्रातील वर्चस्व पचनी न पडल्यामुळे, काँग्रेसने १९४८ साली इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (इंटक)ची स्थापना केली. या संघटनेशी दत्तोपंतांनी जवळीक साधली. कामगारांच्या समस्यांचे जवळून अवलोकन केले. १९५०-५१ मध्ये दत्तोपंत वरील संघटनेचे मध्यप्रदेशचे संघटनमंत्री होते.
कामगार क्षेत्राचे आंतर-बाह्य स्वरूप बघितल्यानंतर, २३ जुलै १९५५ रोजी भोपाळ येथे दत्तोपंतांनी भारतीय मजदूर संघाची स्थापना केली आणि कामगार क्षेत्रात नव्या पर्वाचा प्रारंभ झाला. कामगारांत राष्ट्राभिमान जागविण्याचे कार्य करताना भारतीय मजदूर संघ राष्ट्रहित आणि उद्योगहिताला अधिक प्राधान्य देईल, आणि कामगारांचे ज्वलंत प्रश्न हाताळताना आवश्यकतेनुसार समविचारी राजकीय पक्षाचा सहयोग घेईल, असे दत्तोपंतांनी पाहिले. भा.म. संघाचा सदस्य, कार्यकर्ता, पदाधिकारी कुठल्याही राजकीय पक्षाचा सदस्य, पदाधिकारी होणार नाही. तो कुठलीही निवडणूक लढविणार नाही. मात्र, समविचारी राजकीय पक्षाशी संबंधच ठेवू नये, असे दत्तोपंतांनी कुठेही म्हटल्याचे स्मरणात नाही. वरील पथ्ये पाळीत समविचारी राजकीय पक्षाशी मधुर संबंध प्रस्थापित केले जाऊ शकतात, अशी त्यांची धारणा होती.
सरकारशी संबंध कसे असावेत, याबाबत दत्तोपंतांचे विचार अधिक स्पष्ट होते. ते म्हणायचे- केंद्रात अथवा राज्यात कुठल्याही पक्षाचे सरकार असू देत, ज्या प्रमाणात सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल त्याच प्रमाणात भा. म. संघ प्रतिसाद देईल. हा भा.म. संघाचा धोरणात्मक निर्णय समजावा. राजकीय उद्दिष्टे साध्य करून घेण्यासाठी कामगार आणि समस्त जनतेला वेठीस धरून संप करणे दत्तोपंतांना मान्य नव्हते. दत्तोपंतांनी तत्त्वाशी कधीच तडजोड केली नाही. सामाजिक आणि कामगार क्षेत्रात बहुमोल कार्य केल्याबद्दल भारत सरकारने दत्तोपंतांना 'पद्मभूषण' ही उपाधी देण्याची घोषणा केली. परंतु, दत्तोपंतांची तत्त्वे इथेही आडवी आलीत. हा सन्मान विनम्रपणे नाकारताना राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात दत्तोपंत म्हणतात- जोपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना 'भारतरत्न' उपाधी देऊन सम्मानित केले जात नाही, तोपर्यंत आपण दिलेली उपाधी मला स्वीकारता येणार नाही. दत्तोपंतांची ती इच्छा अजूनही पूर्णत्वाला गेली नाही.
दत्तोपंतांचे कार्य मजदूर क्षेत्रापुरते मर्यादित राहिले नाही. त्यांनी कृषी क्षेत्रातही उडी घेतली. भारत कृषिप्रधान देश असूनही कृषीकडे दुर्लक्ष केले जात आहे, हे लक्षात आल्यावर दत्तोपंतांनी १९७९ साली भारतीय किसान संघाची स्थापना केली. तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी डंकेल प्रस्तावावर स्वाक्षऱ्या केल्यानंतर, ग्राम आधारित अर्थव्यवस्थेच्या पूर्ततेसाठी आणि स्वदेशीचा पुरस्कार करण्यासाठी १९९१ साली दत्तोपंतांनी स्वदेशी जागरण मंचाची स्थापना केली. ग्राहकांची पिळवणूक होऊ नये म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची स्थापना करण्यात दत्तोपंतांचे बहुमोल सहकार्य लाभले. प्रांतभेद, जातिभेद, भाषा आदी भेदांमुळे आपला देश आतल्या आत पोखरला जात आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी दत्तोपंतांनी १९८५ साली सामाजिक समरसता मंच आणि १९९२ साली सर्व पंथ समादर मंचाची स्थापना केली. दत्तोपंतांनी आशिया, युरोप आणि आफ्रिकेतील अनेक देशांचा प्रवास केला. आंतरराष्ट्रीय श्रम संघटन, जिनीव्हा येथे भारतीय कामगारांचे नेतृत्व केले. १९९३ साली स्वामी विवेकानंद दिग्विजय दिनानिमित्त शिकागो येथे दत्तोपंतांचे प्रभावी भाषण झाले. दत्तोपंत १९६४ ते १९७६ या कार्यकाळात खासदार होते. ससंदेत त्यांनी केलेली विविध विषयांवरील वक्तव्ये आजही प्रेरणा देतात. दत्तोपंतांनी इंग्रजी, हिंदी व मराठीमध्ये जवळपास १०४ पुस्तके लिहिली. त्यांचे 'थर्ड वे' आणि 'कार्यकर्ता' ही पुस्तके अजरामर झालीत. साधी राहणी, उच्च विचारसरणी, अभ्यासू वृत्ती, स्पष्ट विचार आदी गुणांमुळे दत्तोपंत आजही सर्वांच्या स्मरणात आहेत. विविध पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी जे विचारधन दिले, ते भारतीय मजदूर संघासाठी आजही मार्गदर्शक आहे. दत्तोपंतांनी आपल्या हयातीतच धोरणात्मक निर्णय घेतला होता की, व्यक्तीचा कधीही जयजयकार न होता केवळ भारतमातेचा होईल. व्यक्तिपूजा दत्तोपंतांना मान्य नव्हती. कथनी आणि करनीमध्ये दत्तोपंतांनी कधीच फरक केला नाही.
दत्तोपंत ठेंगडी यानी स्थापन केलेल्या संस्था
[संपादन]- भारतीय मजदूर संघ
- भारतीय किसान संघ
- स्वदेशी जागरण मंच
- सामाजिक समरसता मंच
- सर्व पंथ समादर मंच
- अखिल भारतीय ग्राहक पंचायत
दत्तोपंत ठेंगडी यांनी लिहिलेली पुस्तके
[संपादन]- आपले बाबासाहेब
- कार्यकर्ता
- चेंजिंग होरायझन अँड इमर्जिंग चॅलेंज (इंग्रजी, सहलेखक - वरदानंद भारती)
- थर्ड वे (इंग्रजी)
- वक्तृत्वाची पूर्वतयारी
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |