Jump to content

चंद्रशेखर गाडगीळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चंद्रशेखर गाडगीळ ( इ.स. १९४८; मृत्यू: २ ऑक्टोबर, २०१४) हे एक मराठी गायक व पार्श्वगायक होते. त्यांनी पडित सदा​शिवबुवा जाधव यांच्याकडून किराणा घराण्याच्या गायकीची तालीम घेतली.[]

याशिवाय पं. हृदयनाथ मंगेशकर, यशवंत देव, पं. गोविंदप्रसाद जयपूरवाले, पंडित मनोहर चिमटे, यांसारख्या दिग्गजांकडेही त्यांनी गायनाचे शास्त्रशुद्ध धडे घेतले होते. चंद्रशेखर गाडगीळ यांनी मराठी संगीतामध्ये ५० वर्षे अविरत कार्य केले. ‘निसर्ग राजा ऐक सांगतो’, ‘कोण होतीस तू काय झालीस तू’, ‘कानाने बहिरा मुका परी नाही’ ही त्यांची गाजलेली गाणी. त्यांनी अनेक भजनांनाही संगीत दिले.

पार्श्वगायनाची संधी

[संपादन]

गायिका रश्मी यांच्यासमवेत चंद्रशेखर गाडगीळ यांनी ‘रश्मी ऑर्केस्ट्रा’ची स्थापना केली.[] ‘मेलडी मेकर्स’ या ऑर्केस्ट्राचे ते हुकमी गायक होते. एका कार्यक्रमाला उपस्थित असलेले संगीतकार राम कदम यांनी ऑर्केस्ट्रांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या या गायकास, त्यांचा आवाज ऐकून व्ही. शांताराम निर्मित झुंज या चित्रपटात संधी दिली. या चित्रपटासाठी त्यांनी उषा मंगेशकर यांच्यासमवेत गायिलेली ‘निसर्गराजा ऐक सांगतो’ आणि ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ ही गीते लोकप्रिय झाली. ‘अरे कोंडला कोंडला देव’, ‘अरूपास पाहे रूपी तोच भाग्यवंत’, ‘अजून आठवे ती रात्र पावसाळी’ ही गीते रसिकांच्या स्मरणात आहेत.[]

सुखदुख की हर माला

[संपादन]

कुदरत सिनेमातील सुखदुख की हर माला... हे त्यांनी गायलेले शीर्षक गीत त्यांच्या पहाडी आवाजाची ओळख ठरले. हेच गाणे चित्रपट निर्माते चेतन आनंद यांनी महंमद रफींकडून गाऊन घेतले. महमंद रफींना चंद्रशेखर गाडगिळांबद्दल समजले तेव्हा ते गाण्याच्या तीन कडव्यांचे रेकॉर्डिंग झाल्यावर रागावून स्टुडिओ सोडून निघून गेले. नवोदित गायकाची कला मारणे रफींना पसंत नव्हते. मूळ गाण्यात ४ कडवी आहेत.

गीतकार शांताराम नांदगावकर यांच्या ’रजनीगंधा’ आणि ’घे मंत्र नवा’ या दोन्ही कार्यक्रमांचे ते खास गायक होते.

संगीत दिग्दर्शक

[संपादन]

राम कदम, आर.डी. बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, रवींद्र जैन या संगीतकारांबरोबर चंद्रशेखर गाडगीळ यांनी काम केले आहे. फक्त गायक म्हणूनच नव्हे तर संगीतकार म्हणूनही गाडगिळांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. हिंदीमध्ये राजेश खन्नाच्या अनेक चित्रपटांतील गाण्यांना गाडगीळ यांनी स्वरसाज चढवला आहे.

अन्य

[संपादन]

मुंबई दूरदर्शनकरता त्यांनी गायलेले 'कानाने बहिरा मुका परी नाही' हे गाणेही गाजले. हरहुन्नरी, उदयोन्मुख कलाकारांच्या पाठीशी उभे राहणारे, हिंदी उर्दू शेर आणि गझलांचे ते दर्दी अभ्यासक होते.

नवरे सगळे गाढव, जानकी, राजमाता या चित्रपटांत चंद्रशेखर यांची गाणी होती.

शापित गंधर्व

[संपादन]

चंद्रशेखर गाडगीळ यांनी ’शापित गंधर्व’ नावाचे आत्मकथनपर पुस्तक लिहिले आहे. पुस्तकाचे शब्दांकन प्रा. प्रज्ञा देशपांडे केले आहे. मात्र हे पुस्तक प्रसिद्ध होण्यापूर्वीच गाडगिळांचे निधन झाले.

पुस्तकाच्या प्रकाशनाच्या दिवशी गाडगीळ यांच्या ’किमया अशीच केली’ या ध्वनिफितीचेही प्रकाशन झाले.[]

चंद्रशेखर यांनी गायलेली गाणी

[संपादन]
  • अजून आठवे ती रात (कवी - मधुसूदन कालेलकर, संगीत - राम कदम, चित्रपट - पारध)
  • अन्‌ हल्लगीच्या तालावर (कवी - जगदीश खेबूडकर, संगीत - राम कदम)
  • अरूपास पाहे रूपी (कवी - सुधीर मोघे, संगीत - बाळ बर्वे)
  • अरे कोंडला कोंडला देव (कवी - शरद निफाडकर, संगीत - राम-लक्ष्मण, चित्रपट - नवरे सगळे गाढव)
  • अष्टविनायका तुझा (दोन कडवी, चित्रपट - अष्टविनायक, गीत - जगदीश खेबूडकर, संगीत - अनिल-अरुण, सहगायक - अनुराधा पौडवाल, जयवंत कुलकर्णी, शरद जांभेकर, मल्लेश)
  • आज या एकांत काली (कवी - ग.दि. माडगूळकर, संगीत - राम कदम, चित्रपट - नाते जडले दोन जिवांचे)
  • कानाने बहिरा मुका परी नाही
  • कुणी माझ्या मनात लपलयं रे (चित्रपट - झुंज)
  • कोण होतीस तू काय झालीस (चित्रपट - झुंज)
  • घबाड मिळू दे मला (संगीत - राम कदम, चित्रपट देवकीनंदन गोपाला, सहगायक - पुष्पा पागधरे, राम कदम)
  • चल झुक झुक (चित्रपट - पांडोबा पोरगी फसली)
  • जगण्यासाठी आधाराची
  • जाई ग जाई (चित्रपट - पांडोबा पोरगी फसली)
  • दुख सुख की एक माला (हिंदी चित्रपट - कुदरत, संगीतदिग्दर्शक राहुलदेव बर्मन)
  • दूर का तू साजणी (चित्रपट - नाते जडले दोन जीवांचे)
  • देवमानुस देवळात आला
  • निसर्गराजा ऐक सांगते
  • पांडोबा पोरगी फसली (चित्रपट - पांडोबा पोरगी फसली)
  • माणसा रे माणसा ठेव (चित्रपट - पदराच्या सावलीत)
  • विठू माउली तू माउली जगाची माउलीत मूर्ती विठ्ठलाची (सहगायक - सुधीर फडके, जयवंत कुलकर्णी व सुरेश वाडकर; संगीत - अनिल अरुण, चित्रपट - अरे संसार संसार)

संस्था-स्थापना

[संपादन]

चंद्रशेखर गाडगीळ यांनी ‘स्कूल ऑफ म्युझिक’ या संस्थेची स्थापना केली आणि युवा संगीतकारांना, गायकांना त्यांनी व्यासपीठ मिळवून दिले. शास्त्रोक्त गाण्यापेक्षा श्रवणीय आणि संस्कारमय गाणे रसिकांपर्यंत पोहोचते यावर त्यांचा ठाम विश्वास होता. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी कॉपीराईट्स, रॉयल्टी या संकल्पना युवा कलाकारांना समजावून सांगितल्या.

पुरस्कार

[संपादन]
  • २०१० मध्ये गाडगीळ यांना ‘राम कदम कलागौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ House, Mehta Publishing (2014-09-01). Mehta Marathi GranthJagat - September 2014. Mehta Publishing House. p. 97.
  2. ^ "ज्येष्ठ गायक चंद्रशेखर गाडगीळ यांचे निधन". Lokmat. 2014-10-03. 2018-10-08 रोजी पाहिले.
  3. ^ "पार्श्वगायक चंद्रशेखर गाडगीळ यांचे निधन". Loksatta. 2014-10-03. 2018-10-08 रोजी पाहिले.
  4. ^ "शापित गंधर्व-Shapit Gandharva by Mr. Chandrashekhar Gadgil - Sanmitra Prakashan - BookGanga.com". www.bookganga.com. 2018-10-08 रोजी पाहिले.