पुष्पा पागधरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पुष्पा चंद्रकांत पागधरे (माहेरच्या पुष्पा चामरे) या एक मराठी गायिका आहेत.

त्यांचा जन्म मुंबईत प्रभादेवी येथील महापालिका रुग्णालयात झाला.[१] त्यांचे मूळ गाव पालघर जिल्ह्यातील सातपाटी असून त्यांच्या वडलांचे नाव जनार्दन आणि आईचे नाव जानकी चामरे आहे. सातपाटीलाच त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्यांना गाण्याचे सुरुवातीचे शिक्षण शाळेतील आर. डी. बेंद्रे या शिक्षकांकडून विनाशुल्क मिळाले. पागधरे यांच्या कोळी समाजातील मुलींना त्या काळात गाण्याचे रीतसर शिक्षण घेणे सोपे नव्हते. पुष्पाताईंच्या वडलांचे मनोर, वाडा येथे भजनी मंडळाचे कार्यक्रम होत असत. त्यावेळी पाच-सात वर्षांच्या असलेल्या पुष्पा वडिलांबरोबर भाग घ्यायच्या.

मुंबईत आगमन[संपादन]

सातपाटीच्या शाळेतील एक शिक्षक भिकाजी नाईक यांच्या सेवानिवृत्तीच्या समारंभात पुष्पाताई जो आवडतो सर्वाना तोचि आवडे देवाला हे गाणे गायल्या. ते ऐकून मुंबईचे तत्कालीन महापौर बाबासाहेब वरळीकर यांनी पागधरेंना मुंबईला यायला सांगितले. वडिलांबरोबर त्या मुंबईला संगीतकार वसंत देसाई यांच्याकडे गेल्या. त्यांनी पुष्पा पागधरे यांची अब्दुल रहेमान खॉंसाहेब यांची भेट घडवून दिली. त्यांच्याकडे त्यांनी गझल, ठुमरीचे शिक्षण घेतले.

सुगम संगीताचे शिक्षण[संपादन]

पागधरे यानंतर दत्तगीते गाणारे गायक आर.एन. पराडकर यांच्याकडून भजने व भक्तिगीते आणि गोविंद पोवळे यांच्याकडून अन्य प्रकारचे सुमग संगीत शिकल्या. सातपाटी गावात स्थानिक मंडळींनी बसविलेल्या मंगळसूत्र या नाटकातील काही गाणी पुष्पाताईंनी संगीतबद्ध केली. या नाटकातील नायक चंद्रकांत पागधरे यांच्याशी त्यांचे लग्न झाले.

आकाशवाणीवर गायन[संपादन]

लग्नानंतर पुष्पा पागधरे यांना मुंबई आकाशवाणीवर (ऑल इंडिया रेडिओ, मुंबईवर) गाणी गाण्याची संधी मिळाली. पुढे इंदूर, गोरखपूर, ग्वाल्हेर, जम्मू, नवी दिल्ली, पाटणा, रांची, रायपूर, लखनौ, आदी विविध ठिकाणच्या कार्यक्रमांत त्या सहभागी झाल्या व तेथे त्यांनी हिंदी गाणी, गझल, भजने सादर केली.

गायक तलत मेहमूद यांच्याबरोबर गाण्याच्या कार्यक्रमासाठी त्यांनी मॉरिशसचा दौराही केला. गायक जयवंत कुलकर्णी यांच्या बरोबरही गाण्याचे अनेक कार्यक्रम केले.

पुष्पा पागधरे यांचा आवाज विरहार्त गाण्यासाठी अधिक अनुकूल असला तरी त्यांनी सर्व प्रकारची गाणी गायली आहेत. इंदिरा संत, वंदना विटणकर, यशवंत देव, देवकीनंदन सारस्वत आणि वा.रा. कांत या प्रतिभावान कवीच्या कविता पुष्पाताईंच्या आवाजत अधिक गहिर्‍या झाल्या आहेत.

पार्श्वगायन[संपादन]

पुष्पा पागधरे यांनी पार्श्वगायन केलेल्या चित्रपटांची नावे :-

 • अंकुश (हिंदी)
 • आयत्या बिळातर नागोबा
 • खून का बदला खून (हिंदी, संगीत दिगदर्शक ओ.पी. नय्यर)
 • ज्योतिबाचा नवस
 • देवा तुझा सोन्याची जेजेरी (संगीत दिग्दर्शक - राम कदम)
 • बीन मॉं के बच्चे (हिंदी, संगीत दिगदर्शक ओ.पी. नय्यर)
 • मुकद्दर की बात (हिंदी, संगीत दिगदर्शक ओ.पी. नय्यर)

पुष्पा पागधरे यांचे संगीत दिग्दर्शक[संपादन]

पुष्पा पागधरे यांनी अशोक पत्की, ओ.पी. नय्यर, बाळ पळसुले, यशवंत देव, राम कदम, राम लक्ष्मण, विठ्ठल शिंदे, श्रीनिवास खळे, सुधीर फडके, श्रीकांत ठाकरे, स्नेहल भाटकर अशा अनेक संगीतकारांकडे चित्रपट व गैर चित्रपट गाणी गायली.

मराठी व हिंदीव्यतिरिक्त त्यांनी ओडिया, गुजराथी, बंगाली, भोजपुरी, मारवाडी, आदी भाषांतूनही त्यांनी गाणी गायली असून आजवर गायलेल्या गाण्यांची संख्या सातशेहून अधिक आहे. त्यांपैकी

काही प्रसिद्ध गाणी[संपादन]

 • अग पोरी संबाल दर्याला तुफान आयलंय भारी (सहगायक - महंमद रफी; संगीत - श्रीकांत ठाकरे; गीतकार - वंदना विटणकर)
 • अहो अहो कारभारी हो
 • आज मी तुझ्यासवे (सहगायक - अरुण दाते, कवी - प्रभाकर पंडित, चित्रपट - तुमची खुशी हाच माझा सौदा)
 • आला पाऊस मातीच्या वासात
 • इतनी शक्ती हमे दे न दाता (हिंदी चित्रपट - अंकुश, सहगायिका - सुषमा श्रेष्ठ; संगीत - कुलदीप सिंह)
 • काय आणितोसी वेड्या
 • खळेना घडीभर ही बरसात (कवी वा.रा. कांत; संगीत बाळ कर्वे)
 • घबाड मिळू दे मला
 • जीव लावूनी माया कशी तुटली (संगीतकार - विठ्ठल शिंदे)
 • तुमच्यावर लई लई प्रेम करू वाटतंय मला (संगीतकार - विठ्ठल शिंदे)
 • तोतापुरी आंबा तोडू नका थांबा (चित्रपट - देवा तुझी सोन्याची जेजुरी)
 • नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी
 • नाच ग घुमा कशी मी नाचू (सहगायिका - उषा मंगेशकर, चारुशीला बेलसरे)
 • बाई या पाव्हण्याला, पाव्हण्याला लाजच नाही (चित्रपट - ज्योतिबाचा नवस)
 • बियावाचुनि झाड वाढते
 • मैत्रिणींनो थांबा थोडं
 • मोहरले मस्त गगन, सळसळतो धुंद पवन
 • येउनी स्वप्‍नात माझ्या (कवी - देवकीनंदन सारस्वत; संगीत - श्रीनिवास खळे)
 • राया मला जरतारी शालू आणा पैठणचा
 • राया मला पावसात नेऊ नका
 • रुसला का हो मनमोहना (चित्रपट - आयत्या बिळात नागोबा)
 • हा मदिर भोवताल स्वप्‍न-भारला (भावगीत, कवयित्री - वंदना विटणकर, संगीत - श्रीनिवास खळे)

विशेष गाजलेले गाणे[संपादन]

‘अंकुश’ चित्रपटातील ‘इतनी शक्ती हमे दे न दाता’ या गाण्याची लोकप्रियता अनेक वर्षांनीही कमी झालेली नाही. काही शाळांमधून आजही हे गाणे प्रार्थना म्हणून म्हटले जाते किंवा याची ध्वनिमुद्रिका लावली जाते. अनेकांच्या भ्रमणध्वनीवर हे गाणे ‘रिंगटोन’ किंवा ‘कॉलरट्यून’ म्हणून ठेवलेले आहे. पुषा पागधरे यांना हे गाणे जम्मू-काश्मीरमध्ये सैनिकांसमोर म्हणायची संधी मिळाली. नवी दिल्ली येथील पंजाब नॅशनल बॅंकेत कार्यालयीन कामकाजाला सुरुवात करण्यापूर्वी हे गाणे लावले जाते.

पुरस्कार[संपादन]

 • पुष्पा पागधरे यांना ‘बाई या पाव्हण्याला, पाव्हण्याला लाजच नाही’ (ज्योतिबाचा नवस), ‘रुसला का हो मनमोहना’ (आयत्या बिळात नागोबा) या दोन गाण्यांसाठी पार्श्वगायनासाठीचा महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला.
 • लता मंगेशकर पुरस्कार (२०१७)

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. ^ "'स्वर' पुष्पा!". लोकसत्ता. १० जुलै २०१६. १८ जुलै २०१६ रोजी पाहिले.