गोंडी लिपी
गोंडी ही द्राविडी भाषांच्या आदिवासी बोलींपैकी सर्वांत मोठी बोली आहे. ती मुख्यतः मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, ओरिसा, उत्तर प्रदेश या राज्यांत बोलली जाते. गोंडीची अनेक स्थानिक रूपे आहेत. गोंडीचा पाया द्राविडी आहे.
सन १९८१ च्या जनगणनेनुसार आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, ओरिसा या राज्यांत मिळून गोंडी बोलणाऱ्यांची संख्या २ कोटी ४५ लाख १९ हजार ४६९ एवढी आहे. एकट्या महाराष्ट्रात ती ३५ लाख १९ हजार ३३१ इतकी आहे.
अतिप्राचीन गोंडवनात गोंडी लिपीने आणि गोंडी भाषेने एक समृद्ध राजभाषा म्हणून सन्मान प्राप्त केला होता.
समाजाशी सुसंवाद साधणारी गोंडी भाषा तिचे अतिप्राचीनत्व सिद्ध करते. हे सिद्ध करण्यासाठी गोंड समाजातले साहित्यिक मुन्शी मंगलसिंह मसराम यांनी गोंडी मुळाक्षरे हस्तलिखिताच्या स्वरूपात लिहिली. हे काम त्यांनी सन १९१८मध्ये केले, ते त्यांच्या मुलाने, म्हणजे एडी भावसिंग मसराम यांनी ’गोंडी लिपी‘ या नावाने २ जुलै १९५१ रोजी प्रसिद्ध केले.
१ जून १९५७ रोजी ‘आदर्श आदिवासी गोंडी लिपी बोध’ हे पुस्तक देवनागरी लिपीत प्रकाशित झाले. विठ्ठलसिंग धुर्वे यांनीही "गोंडी लिपी सुबोध‘ नावाचे पुस्तक गोंडी वाचकांसमोर १९८९मध्ये आणले.