कॅमेरा
कॅमेरा हे प्रकाशाच्या साहाय्याने छायाचित्रे (क्षणचित्रे किंवा चलचित्रे) टिपण्याचे एक यंत्र आहे. पूर्वी अख्खी काळोखी खोली चित्रपटल म्हणून वापरून तिच्यात चित्रे प्रक्षेपित केली जात. लॅटिन भाषेत या रचनेस camera obscura (उच्चार : कॅमेरा ऑब्स्क्युरा), अर्थात 'काळोखी खोली' म्हणतात. कॅमेरा ऑब्स्क्युरा या शब्दापासून कॅमेरा या शब्दाची व्युत्पत्ती झाली. दृश्य वर्णपटातील उजेड किंवा इतर विद्युत चुंबकीय वर्णपटातील प्रकाशतरंगांच्या साहाय्याने कॅमेरा चित्र टिपतो.
फोटोग्राफी म्हणजे छायाचित्रण खरे तर प्रकाशचित्रण हा शब्द अधिक संयुक्तिक ठरेल, कारण फोटो काढताना छायेपेक्षा प्रकाशाचा अधिक विचार आणि वापर केला जातो. प्रकाशसंवेदी पृष्ठभागावर स्थिर किंवा गतिमान चित्रांची निर्मिती करणे म्हणजेच फोटोग्राफी किंवा छायाचित्रण. या प्रकाशसंवेदी पृष्ठभागासाठी रासायनिक लेप चढवलेली फिल्म/कागद किंवा विद्युत (इलेक्ट्रॉनिक) संवेदक वापरला जातो. या संवेदी पृष्टभागावर विशिष्ट कालावधीपुरता प्रकाश पडला की त्याची प्रतिमा कागदावर उमटते. हा कालावधी, प्रकाशाची तीव्रता इत्यादी परिमाणे नियंत्रित करण्याची प्रतिमा एका डब्यात बसवलेली असते आणि त्या डब्यालाच आपण कॅमेरा असेही म्हणतो.
कॅमेऱ्याचे भाग
[संपादन]- प्रकाशीय (ऑप्टिकल) भाग: यामध्ये मुख्यतः विविध प्रकारचे आरसे, भिंग आणि प्रिझमचा समावेश होतो. याद्वारे प्रकाशाच्या सामान्य शलाकेचे रूपांतर समांतर किरणांच्या शलाकेत केले जाते आणि ते किरण पुढे प्रकाशसंवेदी पृष्ठभागावर पाडले जातात.
- इलेक्ट्रॉनिकः इलेक्ट्रॉनिक भागामध्ये कॅमेऱ्याच्या विविध नियंत्रण कळींचा समावेश होतो. त्याद्वारे ऑप्टिकल आणि मेकॅनिकल संवेदकभागांना विविध विद्युत संदेश पाठवून त्यांचे नियंत्रण केले जाते. पूर्वीच्या काही कॅमेऱ्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक भागाचे काम मेकॅनिकल भागाद्वारेच विविध स्प्रिंगांच्या माध्यमातून केले जाई.
- मेकॅनिकल: यामध्ये आरसे, भिंग, लोलक, फिल्म यांचे प्रत्यक्ष नियंत्रण इलेक्ट्रॉनिक संदेशांच्या आदेशानुसार होते.
प्रकार
[संपादन]प्रकाशसंवेदी पृष्टभागानुसार प्रकार
[संपादन]- फिल्म: रासायनिक लेप चढवलेली एक पट्टी. फिल्मवर प्रकाशशलाका पडल्यावर तिची उलट्या रंगाची प्रतिमा त्यावर उमटते आणि नंतर ती अंधार असलेल्या खोलीत (डार्करूम) विकसित करावी लागते. नंतर प्रत्यक्ष प्रकाशचित्रासाठी ही विकसित फिल्म विशिष्ट कागदावर छापली जाते.
- पोलरॉइड: काही कॅमेऱ्यामध्ये थेट रासायनिक लेप असलेला कागदाचा गठ्ठा वापरला जातो आणि प्रकाशचित्र घेतल्यावर लगेच त्याची प्रतिमा कागदावर उमटून चित्र बाहेर येते.
- डिजिटल: यामध्ये पडलेल्या प्रकाशशलाकेचे रूपांतर संवेदकांद्वारे विद्युतभारात केले जाते आणि तो विद्युतभार एका विद्युत स्थायी स्मृतीमध्ये (इलेक्ट्रॉनिक स्टॅटिक मेमरी) साठवून नंतर संगणकाद्वारे त्यावर प्रक्रिया करता येते.
तंत्रज्ञानानुसार प्रकार
[संपादन]- पॉइंट अँड शूट: यामध्ये प्रामुख्याने एकच भिंग वापरले जाते आणि सोपे ऑप्टिक्स असते. हे तंत्रज्ञान प्रामुख्याने नवोदित आणि सामान्य, घरगुती उपयोगासाठी विकसित केले गेले आहे. सोपे तंत्र आणि वापरलेल्या भागांची स्वस्त उपलब्धता यांमुळे या प्रकारच्या कॅमेऱ्यांची किंमत कमी असते. तसेच सगळे नियंत्रण कॅमेरा स्वतःच ठरवत असल्यामुळे वापरण्यास हे कॅमेरे अतिशय सोपे असतात. पण नियंत्रणात मानवी हस्तक्षेपास वाव नसल्यामुळे किंवा फारच कमी असल्यामुळे हवी तशी प्रतिमा घेणे अवघड जाते. कुठला भाग अचूक फोकसमध्ये राहील याचे सर्व नियंत्रण कॅमेरा स्वतःच ठरवतो.
- एसएलआर (सिंगल लेन्स रिफ्लेक्स कॅमेरा): या प्रकारच्या कॅमेऱ्यामध्ये अतिशय अचूक ऑप्टिक्स, अचूक आणि योग्य तंत्रज्ञान वापरले जाते. ज्या वस्तूचे किंवा त्यानुसार भिंग (कॅमेरा लेन्स) बदलण्यास वाव असतो. तसेच या कॅमेऱ्याचे नियंत्रण अतिशय अचूकपणे करता येऊ शकते. त्याच अचूकतेमुळे या कॅमेऱ्याची किंमत थोडी (किंवा खूपच) जास्त असते. गरजेनुसार विविध लेन्स वेगळी विकत घेता येऊ शकतात. कुठला भाग अचूक फोकसमध्ये राहील याचे सर्व नियंत्रण फोटोग्राफरच्या हाती असते.
- याव्यतिरिक्त रेंजफाइंडर कॅमेरा आणि ट्विन लेन्स रिफ्लेक्स असेही काही कमी वापरात असलेले प्रकार आहेत. पण कालौघात वापरण्याच्या कठीणतेमुळे हे सर्व प्रकार मागे पडले आणि वरील दोन्ही प्रकार अधिक रूढ झाले.
प्रकाशसंवेदी पृष्टभागाच्या (फिल्म, सेन्सर) आकारानुसार
[संपादन]- लार्ज फॉरमॅट कॅमेरा: प्रकाशसंवेदी पृष्टभागाचा आकार ४”X५” किंवा अधिक असतो.
- ३५मिमी (फुल फ्रेम) कॅमेरा: प्रकाशसंवेदी पृष्टभागाचा आकार २४ मिमी X ३६ मिमी असतो. हा जागतिक प्रमाणित आकार आहे. इतर सर्व फोटोग्राफी साधने या आकाराला प्रमाण मानून बनवलेली असतात.
- मिडियम फॉरमॅट कॅमेरा: प्रकाशसंवेदी पृष्टभागाचा आकार २४ मिमी X ३६ मिमी पेक्षा अधिक आणि ४”X५” पेक्षा कमी असतो.
- क्रॉप्ड फोरमॅट कॅमेरा: यामध्ये बहुधा ३५ मिमीच्या आकारापेक्षा ६०-६५% आकाराचा प्रकाशसंवेदी पृष्टभाग असतो.
- ४/३ (फोर थर्ड्स) फोरमॅट कॅमेरा: ३५ मिमी आकाराच्या चार तृतीयांश आकाराचा प्रकाशसंवेदी पृष्टभाग असतो.