ॲना सारा कुगलर
डॉ. ॲना सारा कुगलर (१९ एप्रिल, १८५६:आर्डमोर, माँटगोमरी काउंटी, पेनसिल्व्हेनिया - २६ जुलै, १९३०) ह्या अमेरिकेन वैद्यकीय मिशनरी होत्या. त्यांनी भारतामध्यल्या गुंटूरमध्ये हॉस्पिटलची स्थापना करून ४७ वर्षे रुग्णसेवा केली. या हॉस्पिटलला नंतर त्यांचे नाव देण्यात आले.
पूर्वजीवन
[संपादन]त्यांचा जन्म १९ एप्रिल १८५६ रोजी आर्डमोर, मॉन्टगोमेरी काउंटी, पेनसिल्व्हेनिया येथे झाला. चार्ल्स क्लूगर आणि हॅरिएट एस. शेफ हे त्यांचे पालक होत. ब्रायन मॉर मधील एका खाजगी शाळेत त्यांनी प्रवेश घेतला आणि फिलाडेल्फियातील फ्रेंड्स सेंट्रल हायस्कूलमधून पदवी प्राप्त केली. त्यानंतर १८७९ मध्ये पेंसिल्व्हेनियाच्या वुमन्स मेडिकल कॉलेजमधून त्या पदवीधर झाल्या. त्यानंतर त्यांनी नॉरिसटाऊन स्टेट हॉस्पिटलच्या महिला विभागात दोन वर्षे काम केले.
भारतातील सेवा
[संपादन]१८८२ मध्ये लुथेरन मिशनरीचे ॲडम डी रोव यांच्याकडून त्यांना भारतात महिलांना सेवा देण्यासाठी तातडीने वैद्यकीय मिशनरींची आवश्यकता असल्याचे पत्र प्राप्त झाले. त्यांनी अमेरिकेतील लुथेरन चर्चमधील जनरल पायनॉड ऑफ व्हाइमन होम अँड फॉरेन मिशनरी सोसायटीकडे भारतात जाण्यासाठीच्या खर्चासाठी अर्ज केला. चर्चने सांगितले की, या प्रकारची कामे करण्यासाठी अद्याप ते तयार नाहीत, परंतु भारतातील मुसलमान महिलांसाठी शिक्षक म्हणून कुगलर यांना भारतात पाठविण्यासाठी ते तयार झाले. डॉ. कुगलरनी ही नियुक्ती स्वीकारली कारण त्यांना खात्री होती की अखेरीस वैद्यकीय काम करण्यासाठी बोर्डाची संमती मिळेल. २५ ऑगस्ट, १८८३ रोजी त्या भारतासाठी रवाना झाल्या व २९ नोव्हेंबर १८८३ रोजी भारतात पोहचल्या. त्यांची आंध्र प्रदेश राज्यातील गुंटूर येथे नियुक्ती करण्यात झाली.
त्या मुसलमान महिलांना शिकवण्याच्या कर्तव्याव्यतिरिक्त त्या महिलांसाठी वैद्यकीय सेवाही देत. सुरुवातीला जाती आणि वंशांच्या मर्यादांमुळे त्यांचे कार्य मर्यादित झाले होते, गोरी स्त्री म्हणून त्यांना उच्चजातीय हिंदूं "अशुद्ध" मानत. अनेक निर्बंध असूनही गुंटूर येथे त्यांनी आपल्या पहिल्या वर्षात १८५ रुग्णांना घरी व २७६ महिला रुग्णांना जनानखान्यात जाऊन उपचार केले. त्यांचे ब्रीदवाक्य होते, येशूसाठी आम्ही आपल्या सेवसी. त्यानंतर त्यांची हिंदू मुलींच्या शाळेवर आणि बोर्डिंगची प्रभारी म्हणून नेमणूक झाली.
डिसेंबर १८८५ मध्ये त्यांना वैद्यकीय मिशनरी म्हणून नेमण्यात आले. त्यांनी ताबडतोब दवाखान्यासाठीचे नियोजन करणे सुरू केले व १८८९ साली त्या पोस्ट ग्रॅज्युएट करण्यासाठी अमेरिकेमध्ये परत आल्या. १८९१ साली त्या उच्च पदवी घेऊन तसेच रुग्णालय-इमारत आणि उपकरणे या साठीचे आर्थिक नियोजन करून त्या भारतात परत आल्या. स्वनिधी तसेच अमेरिकेतुन मिळालेल्या देणग्यांतून त्यांनी गुंटूरमध्ये १८ एकराचा भूखंड विकत घेतला. स्वनिधी, मिळालेल्या देणग्या आणि सहकारी मिशनऱ्यांपासून मदत घेऊन त्यांनी रुग्णालयाच्या इमारतिची उभारणी सुरू केली आणि उपकरणे जमवली.
फेब्रुवारी १८९३ साली एक लहान दवाखाना या जमिनीवर उघडण्यात आला. आणि नंतर त्याच वर्षी अमेरिकन इव्हँजेलिकल लुथेरन मिशन हॉस्पिटलची कोनशिला ठेवण्यात आली. २३ जून, १८९७ रोजी या ५० खाटांच्या हॉस्पिटलचे अनावरण झाले. त्या काळातील ते भारतातील सर्वोत्तम हॉस्पिटल मानले गेले. डॉ. कुगलर यांनी गुंटूरचे संस्थानिक एलोरचे भूयुंगा राव बहादूर यांच्या पत्नीवर उपचार केले तसेच त्यांचे बाळंतपणही केले, संस्थानिकांना मुलगा झाला. संस्थानिकांनी "राव चिन्नमागरी सतराम" हे हॉस्पिटलच्या समोरील विश्रामगृह हॉस्पिटला दान केले. नंतर या विश्रामगृहाचा वापर हिंदू कुटुंबे त्यांच्या नातेवाईकांवर उपचार दरम्यान रहाण्यासाठी करू लागले.
१८९५ मध्ये त्यांना शेवटी इतर मिशन कर्तव्यामधून मुक्त करण्यात आले आणि त्यांनी स्वतःला पूर्ण वेळ वैद्यकीय कार्यासाठी वाहून घेतले. हॉस्पिटलमधील आपल्या कर्तव्याव्यतिरिक्त त्यांनी दक्षिण भारतातील इतर गावांमध्येही दवाखाने उघडण्याचे काम त्यांनी केले. लहान मुलांच्या प्रभाग, प्रसूती वार्ड आणि रुग्णालयातील अन्या खोल्यांसाठी निधी उभारला आणि रेंटचिंतला या गावात हॉस्पिटल उभारले.
निधन
[संपादन]१९२५ साली त्यांना अतिश्रमाने थकवा आला व विश्रांतीसाठी त्या दोन वर्षे अमेरिकेला परत गेल्या. दोन वर्षाने त्या परत आल्या व वर्षाभरातच परत ॲनीमियाने आजारी पडल्या. २६ जुलै १९३० रोजी गुंटूर येथील आपल्या स्वतःच्या इस्पितळात त्यांचे निधन झाले. त्यांचे गंटूर येथे दफन करण्यात आले. अमेरिकेतील आर्डमोर येथील सेंट पॉल लुथेरन स्मशानभूमीत त्यांचे स्मारक उभारण्यात आले. त्यांनी मृत्यूच्या काही काळ आधी डॉ. आयडा स्कडरर व त्यांचे सहकारी आणि जवळचे सहकारी यांना सांगितले होते की " मला वाटते की मी पन्नास वर्षांपासून भारताची आहे आणि फक्त सत्तेचाळीस वर्षेच सेवा करू शकले, याची मला खंत आहे".
त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी ज्या प्रतिष्ठित इस्पितळाची स्थापना केली त्याचे नामकरण डॉ. कुगलर हॉस्पिटल असे करण्यात आले आहे. १९२८ मध्ये त्यांनी गंटूर मिशन हॉस्पिटल हे एक आत्मचरित्रात्मक पुस्तक लिहिले, ते भविष्यातील वैद्यकीय मिशनऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरले.
पुरस्कार
[संपादन]१९०५ आणि १९१७ असे दोनदा त्यांना कैसर-ए-हिंद मेडल पुरस्कार देण्यात आला.