Jump to content

स.गो. बर्वे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(स. गो. बर्वे या पानावरून पुनर्निर्देशित)

सदाशिव गोविंद बर्वे (२७ एप्रिल, १९१४:तासगांव, सातारा जिल्हा, महाराष्ट्र - ६ मार्च, १९६७:पुणे, महाराष्ट्र) हे एक मराठी सनदी अधिकारी होते.[][]

बर्वे यांचे वडील आधी उपजिल्हाधिकारी आणि नंतर सांगली संस्थानाचे दिवाण होते. बर्वे यांचे शालेय शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल येथे नंतर अर्थशास्त्राचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. उच्च शिक्षणासाठी ते केंब्रिजला गेले आणि तेथून ट्रायपॉस म्हणजे बी ए, अर्थशास्त्र आणि आय. सी. एस. या तीनही परीक्षा उत्तीर्ण झाले. १९३६ साली भारतात परत येऊन अहमदाबादला ते उपजिल्हाधिकारी म्हणून सनदी सेवेत रुजू झाले.[ संदर्भ हवा ]

पुणे महापालिकेचे आयुक्त

[संपादन]

पुणे महानगर पालिका अस्तित्वात आल्यावर सुरुवातीची तीन वर्षे स.गो.बर्वे पालिकेचे आयुक्त होते. त्याआधी १५ ऑगस्ट १९४७ला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी ध्वजारोहण केले होते. पुणे शहरातील ८० फूट रुंदीचा जंगली महाराज रस्ता त्यांच्याच काळात बांधला गेला. हा पुण्यातला पहिला रुंद रस्ता. त्यांनी पुण्याभोवती रिंग रेल्वेची कल्पना मांडली पण मुंबईत आणि दिल्लीत बसलेल्या राज्यकर्त्यांनी ती पूर्णत्वास येऊ दिली नाही. राजकीय इच्छाशक्तीअभावी ती पूर्ण झाली नाही.[ संदर्भ हवा ]

गांधीहत्येनंतरची आपात्कालीन स्थिती

[संपादन]

स.गो. बर्वे यांच्या पूर्ण झालेल्या योजनांमध्ये पर्वती आणि हडपसर औद्योगिक वसाहती, संभाजी, पेशवे, शाहू ही उद्याने, संभाजी पूल व धार्मिक स्थळे हलवून कांही रस्ते रुंद करणे इत्यादी कामे झाली. गांधीहत्येच्या वेळी स.गो. बर्वे परदेशात होते. हत्येनंतर पुण्यात सुरू असलेल्या लुटालूट आणि जाळपोळीला आळा घालण्यासाठी ते तातडीने पुण्यात आले आणि त्यांनी संचारबंदी जाहीर केली. रस्त्यांवरून लष्कराची गस्त सुरू झाली आणि काही तासांतच दंगली आटोक्यात आल्या.[ संदर्भ हवा ]

नवी दिल्लीतील कारकीर्द

[संपादन]

१९५३ मध्ये भारताच्या तत्कालीन पंतप्रधानांनी फरीदाबाद शहराची नव्याने नियोजन करून उभारणी करण्याचे काम स.गो. बर्व्यांवर सोपवले. नंतर चिंतामणराव देशमुख यांनी त्यांना अर्थखात्याच्या कामासाठी बोलावून घेतले. या काळात आंतरराज्य विक्रीकर कायदा, खासगी विमा कंपन्यांचे LIC मध्ये विलीनीकरण झाले. पुढे १९५७ मध्ये ते सार्वजनिक बांधकाम खात्याचे सचिव झाले. या काळात कोयना धरण बांधायला जागतिक बँकेकडून कर्ज घेण्यासाठी अर्थखात्याचे प्रतिनिधी म्हणून ते अमेरिकेला गेले, कोयना धरणासाठी त्यांनी अडीच कोटी डॉलर्सचे कर्ज मंजूर करून घेतले.[ संदर्भ हवा ]

सरकारवर टीका

[संपादन]

प्रशासकीय काम करत असताना बर्व्यांना राज्यसरकारच्या शासन सुधारणा समितीवर काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी त्यांनी सत्ताधारी काँग्रेसवर सप्रमाण टीका केली. यशवंतराव चव्हाण यांनी ती टीका सकारात्मक रीतीने घेत त्यांना प्रोत्साहन दिले आणि सहकाऱ्यांना सुनावले. बदल घडवण्यासाठी स्वतः राजकारणात जावे असे त्यांना वाटू लागले होते. सकारात्मक बदल घडवायचा असल्याने आणि सत्ताधारी मंडळी रोजच्या संपर्कात असल्याने त्यांनी तत्कालीन काँग्रेसकडून निवडणूक लढवायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी सनदी नोकरीचा राजीनामा दिला.[ संदर्भ हवा ]

पानशेतची धरण फुटी

[संपादन]

पण सेवामुक्त होण्याआधीच १२ जुलैला पानशेतची दुर्दैवी घटना घडली. त्यावेळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मदत-पुनर्वसन कार्यासाठी स.गो. बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली त्याच दिवशी समिती नेमली. पुराच्या दुसऱ्या दिवशीपासून अडीच महिने ते कार्यालयातच रहायला गेले, सोबत साताठ कर्मचारीही होते. पहिल्या चार दिवसांत वीज आणि पाणीपुरवठा सुरळीत झाले. खडकवासल्याचा मुख्य स्रोत बंद झाला आणि बंधाऱ्याच्या दुरुस्तीला वेळ लागणार हे दिसत होते. मुळशी धरणातून पुण्यात पाणी आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयोग तीन महिन्यात पूर्ण झाला. दोन आठवड्यात तीन लाख लोकांना प्रतिबंधक लस टोचून झाली. १०० केंद्रात ३६,००० नागरिकांना निवारा मिळाला. पूरस्थिती नियंत्रणात आणतानाच सर्व सरकारी विभागांचा ताळमेळ राखत त्यांनी प्रशंसनीय काम केले. त्यामुळे त्याचे हेच काम पुणेकरांच्या अधिक लक्षात राहिले.[ संदर्भ हवा ]

पुण्याची पुनर्बांधणी करण्याचे अपुरे स्वप्न

[संपादन]

पुण्याच्या पुनर्वसनाची बर्व्यांची कल्पना भव्य होती. एवीतेवी सर्व वाहून गेलेच आहे तर पु्णे अधिक नियोजनबद्ध रीतीने पुन्हा नव्याने बनवावे असा त्यांचा आग्रह होता. दिल्ली आणि चंदीगडचे नियोजन त्यांच्यासमोर होते. सनदी अधिकारी फक्त सुचवू शकतात. शेवटी अदॊरदृष्टी राजकारण्यांनी ठरवले तसेच झाले. त्यांनी बर्व्यांच्या स्वप्नांना सुरूंग लावला. तत्कालीन परिस्थितीत लवकर होईल ते करायचे ठरले - त्यामुळे पुणे काही फार बदलले नाही. पण जे काही थोडेफार नियोजन झाले ते लोकमान्यनगर - लाल बहादूर शास्त्री रस्ता आणि सहकारनगर येथील पुनर्वसनातून झाले.[ संदर्भ हवा ]

स.गो. बर्व्यांचा राजकारण प्रवेश

[संपादन]

यानंतर यशवंतराव चव्हाणांनी स.गो. बर्व्यांना थेट राजकारणात आणले. १९६२ च्या निवडणुकीत शिवाजीनगर - पुणे येथून ते आमदार झाले. आणि महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुद्धा.[ संदर्भ हवा ]

पुढे वसंतराव नाईक मंत्रिमंडळात ते उद्योगमंत्री झाले. मुंबईचा औद्योगिक बोजा कमी करून जिल्हा स्तरावर महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MIDC) स्थापण्याची कल्पना त्यांचीच. या कामाचा झपाटा मोठा होता. पुण्याजवळ १०,००० एकर जमीन संपादन करून भोसरी MIDC सुरू झाली. त्यातून दीड लाख रोजगार तयार झाले. ठाण्याची वागळे इस्टेट आणि इतर अनेक औद्योगिक वसाहती, मुंबईतले खाडी पूल, दोन्ही एक्स्प्रेस हायवेज या महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी मंजूर करून घेतल्या. या कामाची दखल घेत पंतप्रधान लाल बहादुर शास्त्रींनी त्यांना नियोजन मंडळावर उद्योग विभागाचे सदस्य म्हणून नेमले.[ संदर्भ हवा ]

१९६७ मध्ये त्यांनी ईशान्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवली. त्यावेळचे विद्यमान खासदार व्ही.के.कृष्ण मेनन याना नाकारून काँग्रेसने बर्वे यांना तिकीट दिले. त्यामुळे नाराज झालेल्या मेनन यांनी अपक्ष लढायचे ठरवले. अपक्ष असूनही ते तुल्यबळ होते. पण अचानक शिवसेनेने मराठीच्या मुद्द्यावर बर्व्यांना पाठिंबा दिला अन् बर्वे खासदार म्हणून निवडून आले. केंद्रात उद्योग खाते मिळाले असते तर त्यांनी दूरगामी बदल घडवले असते हे निश्चित. दुर्दैवाने निवडणूक निकालाच्या दिवशीच म्हणजे ६ मार्च १९६७ रोजी निवडणुकीच्या प्रचारातील अतिश्रमाने त्यांचे हृदयक्रिया बंद पडून निधन झाले. ही बातमी समजल्यावर ग.दि. माडगूळकर लिहिते झाले,[ संदर्भ हवा ]

अजुनी कुंकुमतिलक कपाळी, सत्काराच्या गळ्यात माळा ।
राजमान्यता स्वीकाराच्या भरात आहे अजुन सोहळा ॥
तोच काय हे घडे अचानक, चैतन्याचे होय कलेवर ।
लक्ष मुखातिल जपनादाचा, होय हुंदका एक अनावर ॥॥

मुख्यमंत्रिपद हुकले

[संपादन]

स.गो. बर्वे यांनी सहकार, भारताचे नियोजन आणि आर्थिक धोरण, आणि सुशासानावर इंग्रजीतून ग्रंथलेखनही केले. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे साहित्यिक मनाचे, विद्वत्तेचा आदर करणारे नेता होते. बर्वे यांच्याबद्दल त्यांना विशेष आपुलकी होती. आपण केंद्रात गेल्यावर राज्यात विकासाचा वेग राखण्यासाठी बर्वेनी मुख्यमंत्रीपद सांभाळावे असे मत त्यांनी आपल्या निकटवर्तीयाना बोलून दाखवले होते. पण त्यांना मुख्यमंत्री करण्याने जातीची गणिते चुकणार होती. त्यामुळेच बर्व्यांना अजून मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली नाही.[ संदर्भ हवा ]

स.गो. बर्वे यांची स्मारके

[संपादन]
  • मुंबईत पूर्व/पश्चिम कुर्ला उपनगरात स.गो. बर्वे मार्ग नावाचा राजमार्ग आहे.
  • स.गो. रोड (ठाणे-पश्चिम)
  • स.गो. सभागृह (क्वीन्स गार्डन रोड, पुणे)
  • स.गो. बर्वे चौक (पुण्यातील वेधशाळेजवळचा मॉडर्न कॅफे चौक)
  • महापालिकेची स.गो. बर्वे शाळा, रास्ता पेठ (पुणे)
  • डोंबिवली परिसरातील मुलांना होमी भाभा विज्ञान परीक्षेसाठी मार्गदर्शन करणारे डोंबिवलीतील स.गो. बर्वे क्लासेस.[ संदर्भ हवा ]

समारोप

[संपादन]

अवघ्या ५३ वर्षांच्या आयुष्यात दूरदृष्टीने सार्वजनिक कामाचे डोंगर उभे करणारी स.गो. बर्वॆ यांच्यासारखी माणसे कमीच दिसतात. कुठेही काम करताना बर्व्यांनी सचोटी व निस्पृहता सोडली नाही. लक्ष्य गाठण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न ते करत राहिले. त्यामुळे अनेक उल्लेखनीय कामे उभी राहिली.[ संदर्भ हवा ]

आपल्या तुटपुंज्या कारकिर्दीत स.गो. बर्वे या सनदी अधिकाऱ्याने आधी सेवेत राहून आणि नंतर राजकारणात जाऊन केलेल्या कामाचे महत्त्व अजूनच ठळकपणे उठून दिसते. समाजासाठी काम करायचे तर प्रत्येकवेळी पैसाच लागतो असे नाही तर असलेले कायदे आणि तरतुदी व्यवस्थित वापरून बरीच चांगली कामे करता येऊ शकतात हे त्यांनी वेळोवेळी दाखवून दिले.[ संदर्भ हवा ]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Jan 11, Tanaji KhotTanaji Khot. "Work done, 58 yrs late!". Pune Mirror (इंग्रजी भाषेत). 2020-08-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २४ मे २०२० रोजी पाहिले. Text "Updated:" ignored (सहाय्य)
  2. ^ https://books.google.co.in/books?id=CEfWDwAAQBAJ&pg=PT77&lpg=PT77&dq=s+g+barve+pune+municipal&source=bl&ots=Wamx4ZcagL&sig=ACfU3U0mD_Rx7Dga70YL4GF13T3rL8iRqw&hl=en&sa=X&ved=2ahUKEwiu0vry_MvpAhUJzDgGHdCcBDcQ6AEwD3oECAUQAQ#v=onepage&q=s%20g%20barve%20pune%20municipal&f=false