Jump to content

स्मार्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


स्मार्त संप्रदाय हा वैदिक हिंदू धर्मामधील एक प्रागतिक, उदारमतवादी, सर्वधर्मसमन्‍वायी पंथ आहे. विष्णूला मानणारे ते वैष्णव, शिवाला मानणारे ते शैव, देवीला शक्ती मानून तिची उपासना करणारे ते शाक्त. अशा पंथांपेक्षा ही पंथ वेगळा आहे.

स्मार्त ब्राह्मण हे सर्व देवांना ब्रह्माचे रूप मानतात. स्मार्त म्हणजे स्मृति(मनुस्मृति-पराशरस्मृति वगैरे नव्हे!) आणि शास्त्रे मानणारे हिंदू. स्मार्त ब्राह्मणांना श्रौत-स्मार्त असेही म्हणले जाते. अर्थ असा की श्रुती(वेदा)वर आधारित ज्या स्मृती आहेत त्यांना मानणारे ते स्मार्त ब्राह्मण. अर्थात हे ब्राह्मण कर्मकांडे करणारे आणि म्हणून कर्मठ असतात. स्मार्त षड्‌दर्शन(सहा पद्धतींवर) आधारलेले तत्त्वज्ञान आचरतात. हे आचरण वेदोक्त असल्याने असांप्रदायिक आहे. ही विचारसरणी पूर्वमीमांसेत चर्चिली आहे. भगवद्‌गीतेतील सांख्य आणि योग या संकल्पना स्मार्तांना आपल्याशा वाटतात.

स्मार्तांच्या मते माणसाला आपापला देव निवडायचे स्वातंत्र्य आहे. म्हणूनच ते वैष्णव, शैव आणि शाक्त लोकांपेक्षा भिन्न आहेत. पण अशा प्रकारे एकच देव मानणाला मात्र त्यांचा विरोध नाही, आणि म्हणूनच ते उदारमतवादी आहेत. स्मार्त ब्राह्मण सूर्याला स्वतंत्र देव मानतात, तर शैव किंवा वैष्णव त्याला शिवाचे किंवा विष्णूचे रूप मानतात.

आदि शंकराचार्यांनी ज्या षण्मताचा प्रचार केला त्याला स्मार्त आचरतात. म्हणजे गणेश, शिव, शक्ती, विष्णू, सूर्य आणि स्कंद या सहाही देवता एकाच ब्रह्माची रूपे आहेत, यावर स्मार्त ब्राह्मणांची श्रद्धा आहे.

स्मार्त ब्राह्मण प्रामुख्याने दक्षिणी भारतात आहेत. त्यांच्या प्रमुख धार्मिक संस्था

[संपादन]
  • कांची मठ
  • गोवर्धन मठ
  • गौडपादाचार्य मठ
  • ज्योतिर्मठ
  • द्वारका पीठ
  • शांकरमठ (हे भारतभर पसरलेले आहेत.)
  • शृंगेरी शारदा पीठ
  • ज्ञानेश्वरी पीठ
  • करवीर पीठ
  • संकेश्वर मठ
  • चित्रापूर‌ मठ

स्मार्त मताला मान्यता असलेल्या अन्य संस्था

[संपादन]
  • चिन्मय मिशन
  • डिव्हाइन लाइफ सोसायटी
  • रामकृष्ण मिशन
  • षण्मुखानंद सभागृह, माटुंगा(मुंबई)

स्मार्त ब्राह्मणांमधल्या काही उपजाती

[संपादन]
  • अय्यर
  • उडुपी
  • तेलंगी ब्राह्मण
  • नियोगी

महाराष्ट्रातले स्मार्त ब्राह्मण

[संपादन]
  • कऱ्हाडे ब्राह्मण
  • गौड सारस्वत ब्राह्मण (शेणवी)
  • कुडाळदेशकर गौड ब्राह्मण (आद्यगौड)
  • चित्पावन ब्राह्मण (कोंकणस्थ)
  • दैवज्ञ ब्राह्मण (कोकणातील मराठी सोनारांची जात)
  • देशस्थ यजुर्वेदी ब्राह्मण

स्मार्त आणि भागवत एकादश्या

[संपादन]

एकादशीला उपवास करण्याची प्रथा आहे. असा उपास करणाऱ्यांमध्ये दोन भेद आहेत. स्मार्त आणि भागवत. त्यासाठी दोन प्रकारच्या एकादश्या मानल्या जातात. भागवत धर्म पाळणारे, वारकरी इत्यादी लोक भागवत एकादशी, तर स्मृतींना मानणारे स्मार्त एकादशी पाळतात. एखाद्या महिन्यात दशमीचा, एकादशीचा वा द्वादशीचा क्षय असेल किंवा द्वादशीची वृद्धी असेल तर त्या महिन्यात बहुधा, स्मार्त आणि भागवत अश्या दोन एकादश्या दोन स्वतंत्र दिवशी येतात. दर महिन्याच्या प्रत्येक पक्षात अश्या दोन एकादश्या दोन वेगवेगळ्या दिवशी येतीलच असे नाही. पण जेव्हा एखाद्या पक्षात येतात तेव्हा, त्या एकादश्यांच्या निर्णयाचे नियम खाली क्रमवार दिले आहेत.

१. एकादशीच्या सूर्योदयापूर्वीच्या ९६ मिनिटांत जर दशमी असेल, आणि, (अ)सूर्योदयापूर्वीच दशमी संपली तर दशमीचा, व (आ)सूर्योदयानंतर संपली तर एकादशीचा क्षय असतो. तेव्हा त्यापुढच्या द्वादशीच्या दिवशी भागवत आणि त्याच्या आधीच्या दिवशी स्मार्त एकादशी आहे असे समजतात..

२. द्वादशीचा क्षय झाला असेल तर एकादशी व द्वादशीच्या युग्माच्या दिवशी भागवत आणि त्याच्या आधीच्या दिवशी स्मार्त एकादशी आहे असे मानले जाते.

३. द्वादश्या जर दोन असतील तर पहिल्या द्वादशीच्या दिवशी भागवत आणि त्याच्या पूर्वीच्या दिवशी स्मार्त एकादशी धरतात.

४. एकादश्या जर दोन असतील दोन्ही पक्ष दुसरी एकादशी धरतात.

५. वरील चार अपवाद वगळता, एरवी सूर्योदयाची जी एकादशी असेल ती स्मार्त आणि भागवत अशा दोन्ही पक्षांची एकादशी समजतात.

६. पहिल्या दिवशी येणाऱ्या (स्मार्त) एकादशीला नाव असते; भागवत एकादशीला नसते. पण त्या पक्षात लागोपाठच्या दोन सूर्योदयांना दोन एकादश्या येत असतील तर दुसरीला नाव असते.