Jump to content

स्त्रीवादी साहित्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्त्रियांचे, स्वतःच्या वेगळेपणाची जाणीव प्रकर्षाने व्यक्त करणारे व स्वत्वाचा शोध घेऊ पाहणारे साहित्य म्हणजे स्त्रीवादी साहित्य होय. साहजिकच पुरुषी साहित्याहून ते स्वरूपतः वेगळे ठरते तथापि स्त्रीवादी साहित्य याचा अर्थ केवळ स्त्रीनिर्मित साहित्य नव्हे, तर पुरुषकेंद्री विचारव्यूहातून मुक्त अशा परिप्रेक्ष्यातून कोणीही — स्त्री वा पुरुषाने — निर्माण केलेले साहित्य म्हणजे स्त्रीवादी साहित्य असेही व्यापक अर्थाने म्हणता येईल. वास्तविक साहित्याच्या आविष्कारातील कोणत्या साहित्याला स्त्रीवादी साहित्य म्हणता येईल, हा एक गुंतागुंतीचा प्रश्न आहे परंतु एवढे निश्चित म्हणता येईल, की मानव म्हणजे पुरुष स्त्री हे त्याचे उपांग ह्या विचाराला छेद देणारे, त्याबद्दल प्रश्न उपस्थित करणारे, त्यातील जटिलता,धूसरता यांची जाणीव करून देणारे साहित्य स्त्रीवादी साहित्य म्हणता येईल. बाईच्या असण्याचा, होण्याचा — म्हणजेच अस्तित्वाचा, स्वत्वाचा व अस्मितेचा — समग्रतेने वेध घेणारे,तिच्या आत्मशोधाचा प्रवास वाङ्मयीन आविष्कार म्हणून मांडणारे लेखन स्त्रीवादी म्हणता येईल परंतु स्त्रियांच्या दुःखाच्या करुण कहाण्या पराभूत नियतिवादी दृष्टिकोणातून मांडणारे,त्यांच्याविषयी केवळ दया, सहानुभूती निर्माण करणारे, तसेच उद्धारकाच्या भूमिकेतून केलेले लिखाण हे स्त्रीवादी साहित्य म्हणता येणार नाही. स्त्रीच्या देहात्मतेभोवती गूढता उभारून मूळ दडपणुकीचे वास्तव धूसर करणारे साहित्य स्त्रीवादाच्या कसोट्यांना उतरणारे नव्हे.

स्त्रीवाद ही एक समाजपरिवर्तन घडवू पाहणारी ‘ राजकीय ’ जाणीव आहे. या स्त्रीवादी जाणिवेचा विविध दृष्टिकोणांतून, भिन्न भिन्न पातळ्यांवरचा आविष्कार स्त्रीवादी साहित्यात आढळून येतो.उदारमतवादी, मार्क्सवादी, समाजवादी, उत्तर-आधुनिक अशा अनेक विचारप्रणालींमध्ये स्वतःची भर घालून, स्त्रीवादी भान स्त्री-पुरुष विषमतेच्या प्रश्नांची मीमांसा करते. म्हणून काळाच्या प्रत्येक टप्प्यावर स्त्रीवादाची भिन्न रूपे तर दिसतातच परंतु त्यांच्यात अनेकदा परस्परविरोधही आढळून येतो. ह्याचेच प्रतिबिंब वेगवेगळ्या काळांत लिहिल्या गेलेल्या स्त्रीवादी साहित्यात दिसते. ह्या भिन्न भिन्न स्त्रीवादी जाणिवा व्यक्त करणारे साहित्य म्हणजे स्त्रीवादी साहित्य. पुरुषाच्या आधाराशिवाय स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाला परिपूर्णता येऊ शकते आणि प्रेमाइतकीच, माणसासारखे जगण्याची भूक स्त्रीलाही असते हे दर्शविणारे आणि स्त्री म्हणून घडताना आलेल्या विविध अनुभवांना अभिव्यक्त करणारे साहित्य म्हणजे स्त्रीवादी साहित्य. पुरुषप्रधानतेला विरोध करणारे आणि स्त्रीचे माणूस म्हणून चित्रण करणारे साहित्य, मग ते पुरुषाने लिहिले असले तरी स्त्रीवादी ठरेल कारण तत्त्वतः स्त्रीवादी जाणीव स्त्री व पुरुष दोघांमध्येही विकसित होऊ शकते परंतु पुरुषी वर्चस्वाचा अनुभव बाई होऊन घेणे स्त्रीला अधिक समर्थपणे करता येते, असेही मानले जाते. त्यामुळे स्त्रियांचे लेखन अधिक नेमके, धारदार व प्रखर होते. जहाल स्त्रीवाद्यांच्या मते स्त्रियांची बाईपणाच्या भानातून निर्माण झालेली भाषा, प्रतीके, प्रतिमा खऱ्या अर्थाने विकसित होण्यासाठी काही काळ तरी जाणीवपूर्वक अलगतावादी भूमिका घेणे इष्ट ठरेल.

पाश्चात्त्य देशांत स्त्रीवादाचा उदय साधारणपणे १ ९६० च्या आसपास झाला व भारतात स्त्रीवाद सु. १ ९७५ नंतर रुजला. असे असले, तरी स्त्रीवादी जाणीव तत्पूर्वी अस्तित्वात नव्हती, असे मात्र नव्हते.व्यक्तिगत पातळीवर स्त्रियांना आपल्या वाट्याला आलेल्या दुय्यमत्वाची, गौण स्थानाची जाणीव होतीच आणि ती त्यांच्या साहित्यातून व्यक्तही होत होती पण आपला हा अनुभव व त्याचा आविष्कार व्यक्तिगत आहे, असे त्यांना वाटत होते. त्याला संघटित चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले नव्हते. मात्र जे खाजगी आहे, ते राजकीय आहे हे भान स्त्रीजातीला आल्यानंतर स्त्रीवादी तत्त्वज्ञानाचा उदय झाला.

स्त्रीवादी जाणीव कशाला म्हणायचे, हे आधी स्पष्ट केले पाहिजे. जगभर प्रदीर्घकाळ जी पितृसत्ताक समाजव्यवस्था अस्तित्वात आहे, त्या व्यवस्थेने जैविक लिंगभेदाला ( सेक्स ) सांस्कृतिक लिंगभेदाचे ( जेंडर ) रूप दिले. आपले हितसंबंध जपण्यासाठी स्त्री-पुरुष यांच्यात एक विशिष्ट सत्तासंबंध रचला. या सत्तासंबंधात स्त्रीला गौण व दुय्यम ठरविले गेले. स्त्रीचा स्वभाव, लक्षणे, कार्यक्षेत्रे, कर्तव्ये या सत्तेने निश्चित केली व स्त्रीवर लादली. या गोष्टीची जाणीव म्हणजे स्त्रीवादी जाणीव होय. ‘ स्त्री ही स्त्री म्हणून जन्मत   नाही, तर ती घडवली जाते ’ ( वन इज नॉट बॉर्न अ वुमन, रादर वन बिकम्स अ वुमन ), हे फ्रेंच स्त्रीवादी लेखिका सीमॉन द बोव्हारचे विधान म्हणजे स्त्रीवादी जाणिवेचे महत्त्वाचे प्रमेय आहे.

स्त्रीवादी जाणीव ही स्त्री व पुरुष या दोघांत उदित होऊ शकते. पुरुष या जाणिवेचा समर्थक होऊ शकतो परंतु या जाणिवेचा अनुभव मात्र स्त्रीच घेत असते. स्त्री-पुरुष विषमतेचे भान येणे,ही या जाणिवेची पहिली अवस्था होय. पुरुषरचित स्त्रीत्वाच्या कल्पनेला नकार देणे, ही या जाणिवेची दुसरी अवस्था, तर एक व्यक्ती म्हणून स्वतःचा शोध घेता घेता स्त्रीत्वाचा शोध घेणे, ही स्त्रीवादी जाणिवेची यापुढील व अंतिम अवस्था म्हणता येईल. या अवस्थांमधून जात असताना स्त्री-पुरुष समतेच्या तत्त्वावर आधारलेल्या नवसमाजाची निर्मिती करणे, हे स्त्रीवादाचे उद्दिष्ट आहे. स्त्रीवादी जाणिवेच्या या तिन्ही अवस्थांचे आविष्कार वाङ्मयेतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर, वेगवेगळ्या कालखंडांत आढळून येतात.