Jump to content

सोनकपाळी पर्णपक्षी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हरेवा
शास्त्रीय नाव
(Chloropsis aurifrons)
कुळ
(Chloropseidae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश गोल्डन फ्रंटेड लीफबर्ड
(Golden-fronted Leafbird)
संस्कृत पक्षगुप्त, पत्रगुप्त
हिंदी छोटा हरियल, हरीवा

सोनकपाळी पर्णपक्षी, हरेवा किंवा हिरवा बुलबुल साधारण १९ सें. मी. आकाराचा पक्षी आहे. नराचा मुख्य रंग गवतासारखा हिरवा असून माथा सोनेरी रंगाचा, हनुवटी आणि गळ्याचा भाग जांभळ्या आणि काळ्या अशा दोन उठावदार रंगाचे असतात. मादी नरासारखीच असते फक्त रंग फिकट असतात.

हरेवा हा समुद्र सपाटीपासून सुमारे २००० मी. उंच डोंगराळ भागापर्यंत भारतभर आढळणारा पक्षी असून बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार या देशातही हरेवा आढळतो. याच्या रंग आणि आकारावरून किमान ३ उपजाती आहेत.

हरेवा घनदाट जंगलात तसेच शेती जवळच्या दाट झाडांमध्ये राहणे पसंत करतो, यामुळे पानांच्या रंगासोबत हरेवाचा हिरवा रंग मिसळून जातो व तो झाडांच्या पानात दिसेनासा होतो. असे रंगगोपन होत असल्याने हरेवा दिसण्यापेक्षा ऐकू जास्त येतो. तो एक उत्तम नकलाकार आहे, बुलबुल, कोतवाल, दयाळ या स्थानिक पक्ष्यांसह स्थलांतर करून येणाऱ्या पक्ष्यांचेही हुबेहुब आवाज हरेवा काढतो.

फुलातील मध, फळे, कीटक आणि कोळी हे हरेवाचे खाद्य आहे. मे ते ऑगस्ट हा हरेवाचा वीणीचा काळ असून त्याचे घरटे उथळ, गवत, काटक्या, झाडाची कोवळी मूळे वापरून बनविलेले, उंच झाडावर, व्यवस्थीत लपविलेले असते. मादी एकावेळी सहसा २ अंडी देते.

चित्रदालन

[संपादन]