Jump to content

सुबाभूळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुबाभूळ (इंग्रजीत लुकेना; शास्त्रीय नाव - लुकेना लुकोसिफेला) हा एक जळणासाठी तसेच जनावरांच्या चाऱ्यासाठी उपयुक्त समजला जाणारा वृक्ष आहे. वि.वि. देशपांडे यांनी सन १९८० मध्ये लुकेनाचे बी फिलिपाइन्समधून आणले आणि मुंबईचे तत्कालीन नगराध्यक्ष बाबुराव शेटे यांना दिले.[ संदर्भ हवा ] त्याचवेळी त्यांनी ते बी भारताच्या अनेक भागांत पाठवले. त्यापूर्वी भारतात सुबाभुळाचे झाड नव्हते. हे सुबाभळीचे झाड ४ वर्षांत ६५ फूट वाढते.

सुबाभळीचे फायद्यांपेक्षा तोटेच अधिक

[संपादन]

भारतीय जंगलांमध्ये सुबाभूळ, अकेशिया, निलगिरी यासारखी झाडे भरमसाट संख्‍येत लावण्‍यात आली. वरून हिरवे दिसायला लागले खरे, पण खाली या झाडांचा काही उपयोग नव्‍हता. स्‍थानिक निसर्ग चक्रात या झाडांचे काहीच काम नव्‍हते. पक्षी, किडे, प्राणी, माणसे यांपैकी कोणाचेही या झाडांशी काही घेणे देणे नव्‍हते. त्‍यावरना खायला फळे मिळत,ना पाला,ना ढोली करण्‍याजोगी खोडे. निलगिरीच्‍या आजूबाजूला तर झुडपेही जगत नाहीत. सुबाभळीचा पाला खाल्‍ला तर घोड्यांचे केस गळतात, बकऱ्यांवरही अनिष्‍ट परिणाम होतात. सुबाभूळ लावण्‍याआधी याचा कशाचाच अभ्‍यास करण्‍यात आला नव्‍हता. आधीच झाडे तोडून बिघडवलेले निसर्गाचे चक्र विदेशी झाडांमुळे आणखी बिघडले.

पुण्याजवळच्या निगडी येथील दुर्गादेवी टेकडी मुळातच वनराईने नटलेली होती. पण त्या टेकडीवर बहुसंख्य झाडे विदेशी होती. विदेशी झाडांचे दुष्परिणाम कही वर्षांनी दिसू लागले. भरभर उंच होणारी निलगिरी, सुबाभळासारखी झाडे जमिनीतून प्रचंड प्रमाणात पाणी शोषू लागली आणि मग त्यांच्या आजूबाजू्ची झाडे पाण्याअभावी सुकू लागली. दुर्गादेवी टेकडीवर मोठ्या प्रमाणावर असलेले सुबाभूळ हे वृक्ष विदेशी असल्याने ऐन उन्हाळ्यामध्ये त्यांची पानगळ व्हायची. शिवाय त्यांचे आयुर्मानही संपले होते. त्यादृष्टीनेही हे वृक्ष कुचकामी ठरत होते. या वृक्षांचा पाचोळा लवकर विघटित होत नसल्याचे आढळून आले होते. त्यामुळे तत्कालीन आयुक्त दिलीप बंड यांनी टेकडी सुबाभूळच्या जागी देशी वृक्षांची लागवड करावी, असे सूचित केले. त्याचवर्षी म्हणजेच इ.स. २००५ साली मध्ये दहा हजार देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यानंतर प्रतिवर्षी टप्प्याटप्प्याने हजारोंच्या संख्येने नियोजनबद्ध पद्धतीने देशी वृक्ष लावले गेले. आता टेकडीला गर्द वनराईचे स्वरूप प्राप्त झाल्यामुळे मोरांचा संचारही वाढला आहे.

सुबाभळाची गळलेली पाने आणि ढाळलेल्या बिया यांचा निरुपयॊगी कचरा होतो. जमिनीवर पडलेल्या बियांपासून हजारो रोपे तयार होत असल्याने त्यांचे नियंत्रण करणे अतिशय कठीण जाते.