Jump to content

सप्तपर्णी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Karayaja (Hindi- करायजा) (2443215022)
Asclepias syriaca 003
Pachypodium lamerei 01

सात पर्णदले म्हणजे सात संयुक्त पाने असलेला वृक्ष म्हणून या वृक्ष्याचे नाव सप्तपर्णी किंवा सातवीन. सरळ वाढणारे खोड, लवकर होणारी वाढ आणि फांद्यांची विशिष्ट ठेवण असलेले हे झाड सदाहरित म्हणजेच वर्षभर हिरवेगार राहणारे झाड म्हणून परिचित आहे. सदाहरित आणि आकर्षक ठेवण इत्यादींमुळे या वृक्षाची लागवड बाग-बगीचे, निवासी संकुल, कार्यालये, शाळा-महाविद्यालये, रस्त्याच्या दुतर्फा, इ. ठिकाणी मुद्दामहून केलेली आढळते.

अन्य भाषिक नावे

[संपादन]

"सप्तपर्णी' या वृक्षास त्यांच्या उपयुक्ततेनुसार आणि गुणानुसार अनेक नावे आढळतात. "ब्लॅक बोर्ड ट्री', "इंडियन डेव्हिल ट्री', "डीटा बार्क ट्री' मिल्कवूड पाइन ट्री, व्हाइट चेस वूड, पुलाई इ. इंग्रजी नावांनी आणि हिंदीत "चेतून' या नावाने "सप्तपर्णी' हा वृक्ष ओळखला जातो. कण्हेर, पांढराकुडा, पांढरा चाफा इ. वनस्पतींच्या "अपोसायनेशी' (Apocynacae) या कुळातील हा वृक्ष आहे. वनस्पतिशास्त्रात हा "अल्स्टोनिया स्कॉलरिस' (Alstonia scholaris) या नावाने ओळखला जातो. हा वृक्ष पश्‍चिम बंगाल या राज्याचा "राज्य वृक्ष' म्हणून मानला आहे.

साप्तपर्णी हा वृक्ष उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधात आढळतो. भारतीय उपखंड आणि दक्षिण- पूर्व आशियामध्ये कमी अधिक प्रमाणात हा वृक्ष पसरलेला आहे. काही खंडात आणि देशात या वृक्षाची मुद्दामहून लागवड केलेली आढळते. भारत, जपान, श्रीलंका, बांगलादेश, मलेशिया, ब्रह्मदेश, ऑस्ट्रेलिया, पॉलिनेशिया इ. ठिकाणी निमसदाहरित आर्द्र पर्णझडी जंगलामध्ये हा वृक्ष आढळतो. उंच वाढणारा हा वृक्ष ४० ते ६० फुटांपर्यंत वाढतो. या वृक्षाच्या वाढीसाठी आर्द्रतेचे वातावरण जास्त असलेले ठिकाणे, जास्त पाऊसमान, मध्यम ते भारी स्वरूपाची जमीन आणि जास्त तापमान नसलेली ठिकाणे उत्तम असतात. समुद्रसपाटीपासून ते १२५० मीटर उंचीपर्यंत हा वृक्ष आढळून येतो.

फुले

[संपादन]

या वृक्षास ऑक्‍टोबर- नोव्हेंबर या महिन्यांत फुले येतात. शेंगा मार्च महिन्यापर्यंत परिपक्व होतात. फुले रातराणीसारखी सुवासिक असतात. आलेली फुले चटकन दिसत नाहीत, मात्र फुलांच्या सुगंधावरून ती आल्याचे कळते. सप्तपर्णीचे हे वैशिष्ट्य आहे. विशेषकरून संध्याकाळी. पानांच्या दातीमध्ये पानांच्या वर, उंच देठावर आलेल्या हिरवट पांढऱ्या, पंचकोनी फुलांचे गुच्छ शोधल्यावरच सापडतात.

पावसाळा संपल्यावर शरद ऋतूत सप्तपर्णीला फुले येतात. फुलांचा बहार फार काळ टिकत नाही. फुले गळून पडल्यावर वीतभर लांब, बारीक चवळीसारख्या शेंगा जोडी-जोडीने व गुच्छांनी झाडावर लटकू लागतात. जुन्या मोठ्या सप्तपर्णीच्या झाडावर शेंगा लागडल्यावर ही झाडे जरा वेगळीच दिसतात. काही दिवसांनी या शेंगा वळून फुटतात व त्यातील पांढऱ्या धागे असलेल्या बिया वाऱ्यावर उडून जातात.

ही झाडे मुंबई शहरात दिसून येतात.

उपयोग

[संपादन]

हा वृक्ष दिसायला सुंदर असल्याने तॊ उद्याने, बागा, रस्त्याच्या दुतर्फा, दुभाजकांमध्ये आणि सरकारी कार्यालये, शाळा- महाविद्यालये यांच्या परिसरात लावतात. लाकडाचा उपयोगी पेपर निर्मितीसाठी, खोकी बनविण्यासाठी आणि पेन्सिल, आगकाड्या व पेटी, शाळेच्या पाट्या इत्यादी बनविण्यासाठी केला जातो.

ह्या वृक्ष्याच्या खोडाची साल कडवट तुरट असते. खोडाची साल आणि पाने विविध रोग, व्याधी बऱ्या करण्यासाठी आयुर्वेद, युनानी, सिद्ध इत्यादी परंपरागत औषधी पद्धतीत वापर केला जातो. आयुर्वेदात पंचकर्म शुद्धीसाठी सप्तपर्णी खोडाची साल वापरली जाते. ही साल मलेरियातील तापासाठी उत्तम असते. मलेरिया या खोडाच्या सालीपासून बरा होत असल्याने या वृक्षास "इंडियन सिंकोना" असेही म्हणतात. खोडाची साल हगवण, जुलाब, मलेरियातील ताप, फीट, अस्थमा, कातडी विकार, सर्पदंश इत्यादी बरे करण्यासाठी केला जातो. खोडाची साल दातदुखी, सांधेदुखी, मधुमेह यांवर आणि विषाणू प्रतिबंधक (ॲन्टी-वायरस) म्हणून वापरली जाते. खोडातून येणारा पांढरा चीक अल्सर बरा करण्यासाठी वापरला जातो.

सप्तपर्णी झाडाच्या सालीच्या चूर्णाचा वापर एका भारतीय औषध कंपनी "भारवी फार्मास्यूटिकलस्" ने "सिंकोना कंपाउंड टॅबलेट" या आयुर्वेदिक उत्पादनामधे केलेला आढळतो.

रासायनिक घटक

[संपादन]

या वनस्पतीमध्ये अनेक रासायनिक घटक असून त्यापैकी ३ मुख्य रासायनिक घटक Ditamine, Echitenine, Echitamine की जे अल्कलॉइड आहेत. त्यांचा वापर मलेरियावरील प्रसिद्ध औषध क्विनाईनचा पर्याय म्हणून केला जातो. क्विनाईन हे सिंकोना या वृक्षापासून प्राप्त केलं जाते. म्हणून सप्तपर्णी या वृक्षास "इंडियन सिंकोना" असेही म्हणतात.


{{विस्तार}]

बाह्य दुवा

[संपादन]

https://www.britannica.com/plant/Apocynaceae

https://www.easyayurveda.com/2013/10/08/saptaparna-alstonia-scholaris-benefits-usage-in-ayurvedic-treatment/

संदर्भ

[संपादन]
  • वृक्षराजी मुंबईची (पुस्तक, लेखक - डाॅ. कमलाकर हिप्पळगावकर), (प्रकाशक - मुग्धा कर्णिक)
  • वृक्षराजी मुंबईची (पुस्तक, लेखक - डाॅ. शरद चाफेकर), (प्रकाशक - मुंबई विद्यापीठ)