सदस्य:Shailaja Deshpande/sandbox1

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.

नदी एक संस्था

हिंदू संस्कृती असो , किंवा ईजिप्त ची नाईल संस्कृती, वा यलो नदीवरची चीन संस्कृती किंवा टायग्रीस आणि युफ्रायतीस नद्यांच्या मधला मेसोपोटेमिया असो ,या  सगळ्या संस्कृत्या नदीच्या काठाने बहरल्या आणि नद्या लुप्त झाल्यावर त्याही लुप्त झाल्या. आजही नद्या लुप्त व्हायला लागल्या आहेत. फरक फक्त इतकाच आहे की, त्या काळी भौगोलिक आणि नैसर्गिक कारणांमुळे या नद्यांचे  प्रवाह बदलले किंवा  हवामानातील बदलामुळे त्या हळू हळू सुकत गेल्या. आज मात्र नद्यांच्या कोरड्या पडण्याला केवळ आणि केवळ मनुष्य कारणीभूत आहे. काय कारण असावे? या लेखातून थोडा आपल्या चुकांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आहे.

नद्यांची जगभरातली स्थिती काही अपवाद सोडता ( स्कॅन्डेनेविया मधील – नॉर्वे, फिनलंड सारखे देश, कोरिया, अमेरिकेमधल्या फक्त बोटावर मोजण्या इतक्या नद्या अथवा यूरोप मधील काही नद्या  सोडल्या तर सर्वत्र नद्यांची अवस्था अतिशय दारूण आहे. आपल्या देशाबद्दल बोलायचे झाले तर सह्याद्री मधल्या काही पश्चिमे कडे वाहणाऱ्या आणि ज्यावर अजून धरणे बांधली गेली नाहीयेत अश्या  – अगनाशिनी किंवा शास्त्री सारख्या  नद्या, किंवा हिमालयातल्या काही छोट्या नद्या सोडल्या तर, आपली अवस्था पण वाईट आहे.

नद्यांची हि अवस्था मूख्यत्वाने नदीची वाहती प्रणाली  समजून न घेतल्याने, तसेच तिचा उपयोग फक्त पाणी पुरवठा असा  सोयीस्कर समज करून घेऊन  धोरणे आखत गेल्यामुळे झाली असावी. या लेखात याचा थोडा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आहे.


देशाची भौगोलिक परिस्थिती

आपला देश हा उष्ण आणि समशीतोष्ण  कटिबंधात मोडतो. साहजिकच पृष्ठभागावरचे पाणी जेव्हा धरणात आणि कालव्यात साठवले जाते, तेव्हा बाश्पिभवनाने त्यातल्या बऱ्याच पाण्याचा अपव्यय होत असतो. आज तंत्रज्ञाने खूप प्रगती केली आहे.  जिथे शक्य होतील अशा ठिकाणी आणि जिथे धरण बांधण्या  योग्य जागा  नाहीत अशा ठिकाणीही  धरणे बांधली गेली. सिंचन क्षेत्रे वाढली.  पण तरीही पाण्यासाठी लोकांची वणवण थांबली नाही. शहरे आणि औद्योगिक क्षेत्रे सोडली तर जवळ जवळ सगळीकडे पाण्याचे दुर्भिक्ष पावसाळा संपल्यानंतर  भेडसावते. महाराष्ट्राबद्दलच बोलायचे झाले तर सह्याद्रीच्या रांगा मधून आपल्या जवळ जवळ सगळ्या मुख्य नद्यांचा उगम होतो. सह्याद्री रांगांच्या भौगोलिक रचनेमुळे, काही भागात अति पर्जन्य वृष्टी तर काही टिकाणी पर्जन्य छायेत असल्यमुळे अत्यल्प पाउस. काहीच भागात प्रमाणात पाऊस पडतो. पण भारत हा एक सुदैवी देश आहे, इथे  पावसाळा अतिशय नित्य नेमाने येतो


जागतिक हवामान बदल सध्या थोडा बाजूला ठेऊया. आपण काय करतो आहे ते  पाहूया . पावसाचे पाणी लगेच वाहून जावे यासाठी केलेले  सिमेंटचे रस्ते, सिमेंटची गटारे,  सिमेंटी करण केलेले नाले, ओढे आणि आता तर भारतभर नद्यांचे काठ सुद्धा सिमेंटचे होणार आहेत. त्यासाठी कोट्यावधी रुपये खर्चून नदीचे नालीकरण होईल. .पूर येऊ नये म्हणून काही ठिकाणी उंच  भिंती पण बांधल्या जातील . अमेरिकेतल्या मिसिसिपी किंवा शिकागो सारख्या नद्या,  पॅरिस ची सेंन नदी बांध घालूनही पूर थांबवू शकले नाहीयेत. बिहारमध्येही नद्यांना असेच बांध घातले गेले पण पूर आटोक्यात येऊ शकले नाहीयेत.

काय चुकलं  आपलं ?                    


पारंपारिक ज्ञान

आपल्या देशाला खूप मोठी परंपरा आहे. त्या परंपरेत खूप मोठ ज्ञान साठून आहे.  दुर्दैव असं की या पारंपारिक ज्ञानाचा उपयोग करण्याची मानसिकता आपल्याकडे नाहीये. नदी  पण आपल्यासारखीच एक जिवंत संस्था आहे. हे आपल्या पूर्वजांनी खूप चांगल्या पद्धतीने ओळखले होते. आपल्यापेक्षा कितीतरी पटीने हुशार असलेल्या आपल्या पूर्वजांनी नदी साठी आणि नदीच्या पाण्याच्या वापराचे नियम इतके छान घालून दिले होते, त्यामुळेच की काय अगदी काही वर्षापर्यंत आपल्या नद्या अतिशय सुंदर स्वरूपात होत्या. फरक पडत गेलाय तो केवळ गेल्या १०० ते १५०  वर्षात. उपनिषदांचा दाखला द्यायचा म्हटलं तर असा लिहिल गेलं आहे की – जमिनीवर पडणाऱ्या पाण्याचे १२ भाग करावे. त्यापैकी ६ समुद्राला मिळू द्यावे. वृक्ष, प्राणी, पक्षी, कीटक अशा अमानवी सृष्टीसाठी ४ भाग ठेवावेत. बाकीचे उरलेले २ भाग माणसाने वापरावेत. पर्यावरणाचा आणि त्याचा समतोल राखण्याचा इतका सखोल विचार क्वचितच सापडेल. उपनिशदानी पुढच्या कित्येक पिढ्यांची तजवीज करून ठेवली होती आणि त्याचा उपभोग सर्व सृष्टी आजपर्यंत घेत आली होती.


दुर्दैवाने  आपल्याकडे नवनवीन तंत्रज्ञान आले, आपले तंत्रज्ञ , प्रकल्प नियोजक, सिंचन अधिकारी  तंत्रज्ञानात कुठेही कमी पडले नाहीत. तांत्रिक दृष्ट्या काळजीपूर्वक आयोजन करून मोठी धरणे, बंधारे, कालवे  यांचे नियोजन केले गेले. त्याप्रमाणे सर्व योजना उत्कृष्टपणे पार पडल्या.


फक्त एकच मोठी गोष्ट आपण पूर्ण विसरलो, की ज्या नदीच्या पाण्याच्या उपलब्धतेवर आपण सर्व नियोजन करत आहोत ते संसाधन नसून ती  एक संस्था आहे. नदी ही फक्त दोन कडांमध्ये वाहणारे उपलब्ध पाणी न्हवे. ही संस्था निसर्ग चक्राने आखून दिलेल्या जल चक्राच्या नियमानुसार चालते. यामध्ये कुठलेही अडथळे आले की ती संस्था कोलमडते. आणि नेमके हेच घडत गेले. फक्त निसर्गचक्रात याचे परिणाम हळूहळू दिसतात कारण हा परिणाम लाटेसारखा असतो. म्हणजे  लाट  एका जागी उमटते पण त्याचे परिणाम दुसर्या जागी दिसतात.


लोकसंख्या वाढली, माणसाच्या गरजा वाढल्या, विकास दराचा निकष लावून वेगवेगळ्या योजना आखल्या गेल्या, त्यासाठी प्रचंड पैसा खर्चही झाला. पाणी आणि पाण्याची उपलब्धता हे अग्रस्थानी ठेऊन विकास दराचे निकष लावून विकास कामे केली गेली.  पण पाण्याचा प्रश्न मात्र दिवसेनुदिवस वाढतच राहिला. आपल्या लालसा हे कारण आहेच. पण आपण आज फक्त नदी या संस्थेला समजण्यात काय चूक केली  इतकेच पाहूया.

            मानवनिर्मित जलचक्र

जितका जास्त मानवी हस्तक्षेप तितक्या खराब नद्या हे समीकरण आता झाले आहे . वरील चित्रात बारकाईने पाहिल्यास – पिवळे बाण फक्त चांगल्या पाण्याचे स्त्रोत दर्शवतात, म्हणजेच नदीच्या उगमाजवळ, पिण्याच्या पाण्याच्या शुद्धीकरण प्रकल्पात आणि पावसाचे शेतीत किंवा माळरानावर थेट पडणारे पाणी सोडल्यास, लाल, तपकिरी आणि काळे बाण अशुद्ध पाण्याचे स्त्रोत दर्शवतात. हे देशभरातील प्रातिनिधिक चित्र आहे.


आज नदी ही एक जिवंत प्रणाली  आहे हे जगमान्य आहे, पण आपण मात्र अजून हे कबूल करण्यापासून खूप खूप दूर आहोत. आपण अजूनही फक्त आणि केवळ आधुनिक तंत्रज्ञानाने सर्व प्रश्न सुटतात, या भ्रामक कल्पनेत दंग आहोत. पर्यावरण शास्त्रज्ञ, भूगर्भ शास्त्रज्ञ , भूस्तर विज्ञान तज्ञ, भूजल शास्त्रज्ञ , पुरातत्त्व संशोधक  यांचे आडाखे आणि परिमाणे त्या त्या शास्त्रांवर आणि त्या त्या शास्त्रात केल्या गेलेल्या संशोधनावर बांधलेले असतात. कुठल्याही येऊ घातलेल्या मोठ्या  प्रकल्पांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड असते पण विज्ञानावर आधारित  आडाखे आणि संशोधनांचा  विचार क्वचितच केला जातो. जेव्हा आपण निसर्गनिर्मित नदी या संस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचे अडथळे – उदा. धरणे, कालवे, नदी काठ संवर्धन, मेट्रो सारखे नदी पात्रातले प्रकल्प इत्यादी गोष्टींचा मानवी विकासासाठी विचार करतो,  तेव्हा नदीचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून कधीच विचार केला जात  नाही, फक्त तांत्रिक गोष्टी लक्षात घेतल्या जातात . आजची परिस्थिती ओढवायला एक महत्वाचे कारण आहे की नदी ही संस्था म्हणून आपण कधी समजून घेतलीच नाही.


म्हणूनच नदी ही संस्था काय असते हे थोडेसे जाणून घेऊया थेट तिच्या जन्मापासून. सह्याद्री डोंगरातून वाहणाऱ्या सर्व नद्या किती वर्ष वाहत आहेत हे सांगितले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. सह्याद्री मधून वाहणाऱ्या नद्या जवळपास एक  ते दीड कोटी वर्ष वयाच्या आहेत. कारण सह्याद्रींचा जन्मच मुळी जवळ जवळ साडे सहा कोटी वर्षांपूर्वी झाला आहे. नद्यांना सुद्धा आपल्यासारखे बाल्य, तरुण आणि वृद्धावस्था असतात . कारण त्या जिवंत संस्था आहेत. हे सर्व शास्त्रातील संशोधनातून कळत गेले. पुरातत्त्व विभागाला नदी काठाने खूप पुरावे अजूनही सापडतात. त्यावरून कित्येक लाख वर्षापूर्वींचे पूर तसेच अवर्षण अशा कित्येक गोष्टींचे ज्ञान होते. पण आता जेव्हा आपण नदी काठ सिमेंटीकरण करत आहोत, यामध्ये हे सर्व पुरावे नष्ट होणार आहेत. आणि हवामान बदलाचा अंदाज करणेही जवळ जवळ अशक्य होणार आहे. पर्यावरण शास्त्र सुद्धा दृश्य निर्देशाकांवरून काही गोष्टी सांगू शकतो. जसे की नद्यांचे वय.

     

         गंगा नदी- उगमापाशी                                                            मुठा नदी – उगमापाशी

दोन्ही नद्यांची उगम स्थाने बारकाईने पहिलीत तर हिमालयाची  दरी इंग्लिश V आकाराची आहे आणि सह्याद्रीची दरी इंग्लिश U आकाराची म्हणजे पसरट आहे. म्हणजे ही नदी कित्येक लाख वर्ष आपलं खोरं निर्माण करतीये, डोंगराला खोरत खोरत. त्यामुळे ती पसरट आहे. नदी खोरं म्हणजेच नदी, ओढे , नाले , उपनद्या  जे खोरतात  ते. सह्याद्री मधल्या पूर्व वाहिनी मुख्य नद्या – गोदावरी, कृष्णा, भीमा यांची खोरी पसरट दिसतील. कारण त्या जवळ जवळ ११०० ते १४०० कि. मी. वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळतात. पश्चिम वाहिनी नद्या मात्र डोंगरात उगम पावून थोड्या अंतरातच अरबी समुद्राला मिळतात. या छोट्या नद्यांच खोरं V आकारात दिसेल. पण निसर्ग हा वैविध्यान नटलेला आहे. सगळ्याच नद्या अश्या दिसतीलच असे नाही.

नदीला समजण्यासाठी ढोबळ मानाने आपण नदीचे तीन भाग करूया.

1.       नदीचा उगम

2.       नदीचा सखल प्रदेश

3.       नदीचे मुख


१.     नदीचा उगम

तो डोंगरावर होतो हे जरी खरं असलं तरी तो अगदी घाट माथ्यावरच होतो असे मुळीच नसतं. डोंगराच्या  पोटात साठवून ठेवलेले पाणी भूजल पातळीप्रमाणे झर्याच्या मुखातून बाहेर येते.डोंगरामधून मधून उगम पावणाऱ्या  सगळ्या नद्यांचा उगम एकतर झाडाच्या मुळातून तरी होतो किंवा दगडाच्या कपारीतून. जिथे झाडाच्या मुळातून होतो ती जागा जर सुरक्षित असेल आणि मानवी हस्तक्षेप नसेल तर तिथले पाणी सहसा आटत नाही. आजूबाजूच्या झाडीचा डोंगराच्या पोटात पाणी साठवायला खूप उपयोग होतो. जिथे हा उगम दगडाच्या कपारीतून होतो आणि आजू बाजूलाही पाषाण असेल तर हा झरा उन्हाळ्यात आटण्याची शक्यता असते, कारण बाष्पीभवन झपाट्याने होत असते.. नदीचं उगम कुठे होतोय, तेथे आजूबाजूला झाडी किती आहे, किती प्रमाणात पाषाण आहे, बाश्पिभवनाने पाण्याचा किती अपव्यय होतोय यावर नदीचे बारमाही वाहणे अवलंबून असते.  ढोबळ मानाने सह्याद्रीमधुन उगम पावणारे   उपनद्या  किंवा ओढे बारमाही असू शकतात. पण जर तिथे झाडीचा अभाव असेल आणि फक्त दगडी प्रदेश असेल  तर अर्थातच ते पावसाळ्यानंतर कोरडे पडणार.

 

पाषाणातून निघणारा उगम
झाडाच्या मुळातून निघणारा

          

वाहताना उगमाजवळ नदी छोट्या मुलासारखी अवखळ असते. डोंगर उतारावरून उड्या मारत धावत येते. इथे नदीचं पाणी सर्वात शुद्ध असतं. स्वच्छ सूर्यप्रकाश, पाण्याचा खळाळ आणि वेग यामुळे हवेतला प्राणवायू खूप प्रमाणात तिच्यात मिसळत असतो आणि नदीला निरोगी करत असतो. त्यामुळे जलचर आणि वेगवेगळ्या पाणवनस्पती इथे छान फोफावताना दिसतात. छोट्या छोट्या डबक्यामध्ये एक छान जीव साखळी आणि सुंदर अन्न साखळी तयार होते.

उगम / स्त्रोत  कुठूनही असला तरी पावसाळा सोडल्यास इतर महिन्यात नदीची धार छोटीच असते. याला base flow असे म्हणतात. हा base flow सहसा भूगर्भातून बाहेर येणाऱ्या पाण्यामुळे असतो. base flow असताना नदीचे पात्र संकुचित होते, परिणामी, आपण तेच नदीचे पात्र समजून त्यात खुशाल अतिक्रमणे करत राहतो. आणि नदी जेव्हा पूर्ण भरून दुथडी वाहायला लागते तेव्हा पूर आला म्हणतो. पण हे अजिबात खरे नाही. भौगोलिक आकृति विज्ञानानुसार नदीचे काठ नदीने कित्येक वर्षापासून खोदले आहेत. जेव्हा  तिने स्वतःने खोदलेले हे काठ ती ओलांडते तेव्हाच पूर येतो. असा पूर  खरं  तर  कित्येक वर्षानंतर येतो. आताच्या वारंवार पूर येण्याचे कारण म्हणजे आपण नदीची जागा अतिक्रमण करून काबीज केली आहे, तसेच पावसाचं पाणी जिरून जमिनीच्या पोटात जायला जमीनच ठेवली नाहीये. आता गायरान, पड जमिनीच काय पण शेत जमिनी सुद्धा “ नापीक जमिनी “ मध्ये  सोयीस्कर रित्या बदलून घेतल्या आणि दिल्या जातात. आणि पूर येतो म्हणून हाकाटी होते. “ चोराच्या उलट्या बोंबा” दुसर काय!

ओढा – जो ओढ देतो तो ओढा. याला वेग असतो, लहान मोठ्या गोष्टी खेचून वाहून नेण्याची ताकद असते. कारण याची भौगोलिक रचनाच तशी असते. ओढ्याला पाणी झटकन भरते. कारण याची नैसर्गिक प्रवृत्तीच ती आहे. पावसाळ्यात हा डोंगरावरून पाणी ओढतो, उन्हाळ्यात हा नदी आणि डोंगर यांचा दुवा बनतो. त्यामुळे ज्या भागांमध्ये भरपूर झाडी असते तिथे आपल्याला बारमाही ओढे वाहताना दिसतात. सहसा कोकणात असे ओढे दिसतात.

नाला – याला आपण नदीची नाळ म्हणूया. पावसाचं पाणी वाहून हा नदीपर्यंत पोचवतो.  नाले सहसा पावसाळ्यात भरून वाहतात. मग हळू हळू पावसाळ्यानंतर त्यांचे पाणी कमी होत जाऊन कोरडे पडतात. मात्र डोंगरावरून , टेकड्यांवरून वाहणारे पाणी, खनिज, पोषक द्रव्य  नदीला पोहोचविण्याच महत्वाच काम हे नाले करतात.


             

नदीकाठाचे सिमेंटीकरण केले की जिवंत झरे आणि भूजल पुनर्भरण कायमचे थांबते.

       

आज आपल्या खुपश्या नद्या समुद्राला मिळायच्या थांबल्या आहेत. कृष्णा, कावेरी    या सारख्या प्रमुख नद्या  समुद्रापर्यंत पोचतच नाहीत. आजचा विकास हा पूर्णपणे मानवकेंद्रित आहे. पण आज कुठलेही तंत्रज्ञान पाणी निर्माण करू शकले नाहीये. मग त्याचा संयमित वापर , शाश्वत नियोजन आणि त्याचे स्त्रोत संरक्षित करणे ही आजची नितांत गरज आहे. दुर्दैवाने आपण  ह्या जलचक्राचा समतोलच बिघडवलाय. पृथ्वीवर पडणारा प्रत्येक थेंब  केवळ आपल्यासाठीच आहे  अस मानव समजतो. समुद्राला मिळणारे नदीचे पाणी वाया जाते असे पण म्हटले जाते

नद्या समुद्राला मिळायच्या थांबल्या तर समुद्र आटण्याची क्रिया सुरु होते. त्यामुळे क्षारपट जमिनीचे क्षेत्र वाढले.  अरल समुद्र हे त्याचे जिवंत उदाहरण आहे.  प्रश्न उरतो, भारत यावरून काय धडा घेणार याचा.

२.     नदीचा सखल प्रदेश:

नदी जेव्हा  सखल भागात येते तेव्हा तिला आपला स्वतःचा वेग नसतो. वाट मिळेल तशी ती वाहत राहते. म्हणूनच नागमोडी वळणे घेत नदी वाहते. ही नागमोडी वळणे घेताना ती खूप काही निर्माण करत जाते. छोटी छोटी बेटे, रांजण खळगे, एका काठाला ती खोदत जाते आणि दुसर्या काठावर गाळ पसरत  जाते. नदीचा एक काठ म्हणूनच थोडा उंच भासतो आणि दुसरा काठ थोडा खाली. आपण जेव्हा रुंदीकरण खोलीकरण अश्या प्रकारची कामे करतो, तेव्हा या गोष्टींचे लक्ष ठेवणे खूप आवश्यक असते. वाहणे आणि पूर येणे हे नदीचे अविभाज्य गुणधर्म आहेत.

                      

नदीचे नैसर्गिक काठ                                               नदीचे नाल्यात रुपांतर


नदीचा  नैसर्गिक हिरवा पट्टा आणि नदीचे काठ-  हा नदीसाठी अतिशय महत्वाचा असतो.

 1. नदीकाठचे स्थिरीकरण,
 2. नदी काठाची सुपीक माती  धूप होण्यापासून थांबवणे,
 3. वरून वाहून येणारी माती नदी मध्ये जाऊ न देणे इत्यादी.
 4. झाडांची मुळे, गवत, झाडोरा आणि इतर छोट्या मोठ्या वनस्पती मिळून नदीमध्ये येणारे पाणी शुद्ध करण्याचे अतिशय महत्वाचे काम हा हरित पट्टा करतो.
 5. पूराच पाणी जमिनीत जिरवणे आणि पूर नियंत्रण.
 6. जैविक – जलचर, पाणपक्षी, सूक्ष्म जीव आणि त्यांची अन्न साखळी . तसेच अजैविक घटकांचे संतुलन – प्राणवायू, तापमान, सूर्यप्रकाश, बश्पिभावानाचा वेग कमी करणे  इत्यादी.

तिचे काठ जर आपण काढले किंवा अतिक्रमण केले तर तिची कार्यशक्ती कमी होते. वर सांगितलेली सर्व कार्ये थांबतात. तिचे काठ संरक्षित करणे हे नदीला जिवंत ठेवण्यासाठी फार आवश्यक आहे.


दुर्दैवाने नदीवरचे आक्रमण काठावरच होते. नदीमध्ये ढकलला जाणारा राडा रोडा   नदीकाठालाच होतो. कुठलेही शहर आणि सुधारणा प्रकल्प नदी काठांवरच होतात. त्याचे परिणाम आपल्याला दिसत आहेतच.केवळ आपल्या देशातच नाही तर जगभरातल्या जवळ जवळ सर्व नद्यांची स्थिती हीच आहे.नदीत प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडणे हे  पण नदीला मारायला कारणीभूत आहेच.


३.     नदीचे मुख

जगातील सारी जंगले एकत्र केली तरी त्यांचा विस्तार सागराच्या पाण्याखालील जंगलांपेक्षा  कमीच भरेल.

नदी जेव्हा सागराला मिळते तेव्हा नदीचे गोड पाणी आणि सागराचे खारट पाणी याचा एक अजब संगम होतो. तिथे लाटा झेपावत नाचत असतात. आणि तिथेच तयार होते, एक विशिष्ट प्रकारचे खारफुटीचे जंगल. त्या जंगलात असंख्य पक्षी, माश्यांचे ठावे, समुद्र साप सुखेनैव नांदत असतात. हीच खारफुटीची जंगले त्सुनामी सारख्या लाटांपासून आपले रक्षण करतात. आपलं सुरक्षा कवच आपणच काढून टाकतोय. स्वार्थापोटी हे शहाणपण आपण पूर्ण विसरलो आहोत .


नदीच्या अवस्थेचे काही जैविक निदर्शक

नदी जेव्हा स्वच्च्छ, प्रवाही असते तेव्हा तिचे निर्देशक आपल्याला तिची अवस्था कशी आहे ते सांगतात. आणि नदी आजारी असेल तरी तेही निदर्शकच सांगतात. निसर्गाचे निर्देशक प्रयोग शाळेतल्या परीक्षांसारखे फसवे नसतात.

चांगल्या नदीचे निर्देशक

पक्षी – कवड्या, नदी सुरय, कमळपक्षी इत्यादी.

वनस्पती – पाण्याजवळ  नागरमोथा, वाळा,  लव्हाळ,  पाण्यात  कमळ, कुमुदिनी,  तर काठावर  जांभूळ, वाळुंज, उंबर, करंज इत्यादी

आजारी नदीचे निर्देशक

पक्षी – घार, कावळा, कबुतर, कुत्री, घुशी, उंदीर  इत्यादी

वनस्पती – नदी पृष्ठभाग व्यापलेल्या जलपर्णी, पानकणीस, आळू, हळदकुंकू, एरंड इत्यादी

मला वाटते या अवस्था सुधारायला  शासन आणि प्रशासन खूप महत्वाचे काम करू शकते. काही गोष्टींचा तर नक्कीच विचार करून त्याप्रमाणे नदी संरक्षणाचे काही कडक कायदे आणि त्यांची काटेकोर अंमलबजावणी केली तर खूप उपयोग होईल .

 1. डोंगरांवर कुठलीही विकास कामे  करण्यापूर्वी आधी तिथल्या पर्जन्यामानाबरोबरच  भूगर्भातील पाण्याचे नकाशे, आसपासची झाडी आणि जंगलांचे नकाशे आधी तयार करणे, त्यांना संरक्षित करणे.
 2. जिथे भूगर्भात पाणी मुरते आणि आणि जिथून पाणी बाहेर पडते त्या जागा सर्वात आधी संरक्षित करून कुठलाही विकास ( रस्ते सुद्धा) होऊ न देण्यासाठी आरक्षित करणे.
 3. पृष्ठभागावर तसेच भूगर्भात पाणी साठण्यासाठी आवश्यक झाडी आणि पाणी मुरण्यासाठी छोटे बांध  तयार करणे.
 4. नदीकाठचा हिरवा पट्टा अभाधित ठेवणे. कुठल्याही विकास कामांना नदी काठ आणि हिरवा पट्टा यात परवानगी देण्या आधी, पर्यावरण नकाशा तयार करणे.
 5. दोन नद्यांचे संगम, त्रिभुज प्रदेश, दुबाव प्रदेश, नदी काठचे हिरवे पट्टे, झरे यासारखे पर्यावरणीयदृश्य  आणि संवेदनशील बाबींचे रक्षण करण्याच्या दृष्टीने वेगळी नियमावली करणे. ती सर्व पातळ्यांवर  अमलात आणणे.
 6. सर्वात महत्वाचे शहरी नदीची आणि खेड्यातल्या नदीची व्याख्या  तयार करणे. वा त्यानुसार नदी वापराची नियमावली करणे.


नदीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलूया.  शासन आणि प्रशासनाबरोबर लोकसहभाग आणि विज्ञानाची जोड तितकीच महत्वाची आहे. ही परिस्थिती नागरिक नक्कीच बदलू शकतात. फक्त आपली पण आपल्या  नदीला सुधारण्याची शासन आणि प्रशासनाच्या बरोबरीने  जबाबदारी आहे हे समजून घ्यायला हवे.


गरज आहे ती फक्त एक महत्वाची गोष्ट समजण्याची. नदी हे संसाधन नसून ती तुमच्या आमच्या सारखीच एक जिवंत संस्था आहे. हे जेव्हा आपण प्रत्यक्षात उतरवू, आपल्या नद्यांना सुधारणे अवघड नाही.


शैलजा देशपांडे

Jeevitnadi –Living River Foundation

9822391941

www.jeevitnadi.org