सदस्य:Chavanpooja1403

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुश्री दिब्यदर्शिनी प्रधान (८ ऑक्टोबर १९९७,ढेंकनाल) ही भारताची क्रिकेटपटू आहे. ती उजव्या हाताने ऑफस्पिन गोलंदाजी करते, आणि कधीकधी चांगली फलंदाजीही करते. महिलांच्या 23 वर्षाखालील चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धेत तिने इंडिया ग्रीन संघाचे नेतृत्व केले आणि संघाला अंतिम फेरीपर्यंत घेऊन गेली होती. [१]

युएईमधील महिला टी-२० चॅलेंजमध्ये व्हेलॉसिटी या खासगी क्रिकेट संघाकडून खेळण्यासाठी तिची निवड झाली होती. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये ती ओडिशा महिला अंडर-२३ संघाची कर्णधारही आहे. तिने एसीसी महिला इमर्जिंग टीम्स एशिया कप २०१९ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत ती भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारी खेळाडू ठरली. [२]

वैयक्तिक जीवन आणि पार्श्वभूमी[संपादन]

सुश्री दिब्यदर्शिनी प्रधान हिचा जन्म ८ ऑक्टोबर १९९७ रोजी ओडिशाच्या ढेंकनाल येथे झाला. तिने वयाच्या सातव्या वर्षी कॉलनीतील मुलांबरोबर मजा म्हणून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तिथूनच तिची खेळाबद्दलची आवड निर्माण होऊ लागली. सुरुवातीला तिच्या वडिलांनी तिला इतर खेळ खेळण्यास उद्युक्त करण्याचा प्रयत्न केला, कारण तिला किंवा तिच्या वडिलांना माहिती नव्हते की तेव्हा भारतीय महिला क्रिकेट संघ आहे वा मुलींना व्यावसायिकदृष्ट्या क्रिकेट खेळण्याची संधी मिळते. [३]

पण तोपर्यंत सुश्री दिब्यदर्शिनी क्रिकेटच्या प्रेमात पडली होती. १५ वर्षांची असताना तिला तिच्या वडिलांनी जागृती क्रिकेट क्लबमध्ये दाखल केले आणि त्यांनी तिचे प्रशिक्षक खिरोड बेहरा यांनी तिच्या प्रशिक्षणाची जबाबदारी घेतली. आजही तेच तिचे प्रशिक्षक आहेत.

या क्लबमधले नियोजनबद्ध प्रशिक्षण, त्याबरोबर सुश्रीचे कठोर परिश्रम, यांचे तिला फळ लवकरच लाभले. प्रधान विभागीय स्पर्धांमध्ये अल्पवयीन गटात ओडिशाचे प्रतिनिधित्व करू लागली.[४] तिचे म्हणणे आहे की तिच्या पालकांच्या पाठिंब्यामुळे ती आज इतकी यशस्वी झाली आहे. [५] क्रिकेटव्यतिरिक्त लोकप्रिय सिनेमे पाहणे आणि अभिनय तिचे आवडते छंद आहेत. अगदी तिने 'काना' नावाच्या एका क्रिकेटविषयक तामिळ चित्रपटात अभिनयही केला आहे.[६]

व्यावसायिक यश[संपादन]

सुश्री दिब्यादर्शिनी २०१२पासून तिची मायभूमी ओडिशाचे प्रतिनिधित्व करत आहे. ती आता मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धांमध्ये ओडिशा महिला अंडर-२३ संघाचे नेतृत्व करते. तिच्या या कामगिरीमुळेच तिला अंडर23 महिला चॅलेंजर्स ट्रॉफी 2019साठी इंडिया ग्रीन संघात जागा मिळवता आली. तिने काही उत्तम वैयक्तिक क्रिकेटच्या जोरावर तिच्या संघाला अंतिम सामन्यापर्यंत नेले, पण त्यांना इंडिया ब्लू संघाकडून पराभवाला सामोरे जावे लागले. [७]

२०१९ मध्ये एसीसी महिला उदयोन्मुख संघ आशिया चषक स्पर्धेतही ती भारतीय महिला क्रिकेट संघाकडून खेळली. त्या स्पर्धेत ती भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारी खेळाडू ठरली.

नंतर २०२० मध्ये युएईमध्ये महिला टी-२० चॅलेंजमध्ये खेळण्यासाठी व्हेलॉसिटी या खासगी महिला क्रिकेटच्या फ्रॅंचायझीने तिला निवडले. येथे ती दिग्गज भारतीय क्रिकेटपटू आणि भारतीय संघाची माजी कर्णधार मिताली राज यांच्या नेतृत्वात खेळली. भारतीय महिला क्रिकेट संघाकडून खेळणे आणि आपल्या देशासाठी क्रिकेट विश्वचषक जिंकणे, हेच आता सुश्री दिब्यदर्शिनीचे लक्ष्य आहे. [८]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Interview with Sushree Dibyadarshini - All-round prodigy from Odisha excited about Womens T20 Challenge and eager for national call". Female Cricket (इंग्रजी भाषेत). 2019-05-02. 2021-02-17 रोजी पाहिले.
  2. ^ "BBC News मराठी".
  3. ^ "BBC News मराठी".
  4. ^ "Interview with Sushree Dibyadarshini - All-round prodigy from Odisha excited about Womens T20 Challenge and eager for national call". Female Cricket (इंग्रजी भाषेत). 2019-05-02. 2021-02-17 रोजी पाहिले.
  5. ^ "BBC News मराठी".
  6. ^ "Interview with Sushree Dibyadarshini - All-round prodigy from Odisha excited about Womens T20 Challenge and eager for national call". Female Cricket (इंग्रजी भाषेत). 2019-05-02. 2021-02-17 रोजी पाहिले.
  7. ^ "Sushree Dibyadarshini". Cricinfo. 2021-02-17 रोजी पाहिले.
  8. ^ "BBC News मराठी".
सुश्री दिब्यदर्शिनी प्रधान
वैयक्तिक माहिती
Nationality भारत, ओडिशा राज्य, टीम व्हेलॉसिटी
जन्म ८ ऑक्टोबर १९९७
ढेंकनाल, ओडिशा
Sport
खेळ क्रिकेट