संथा
संथा हा शब्द मराठी भाषेत वेगवेगळ्या अर्थच्छटांनी वापरला जातो. गुरूकडून दीक्षा घेणे; आदर्श कार्यास/उद्दिष्टास/ध्येयास व्रत असल्याप्रमाणे अंगीकारणे; पाठ करण्याची (पठणाची)/ (लक्षात ठेवण्यासाठी) क्रिया, पाठाचे आवर्तन करण्याची क्रिया इत्यादीं अर्थच्छटांचा यात समावेश होतो. भारतातील विविध वेदादी पारंपरिक ग्रंथ विद्यार्थ्यांकडून मुखोद्गत करून घेण्याच्या पद्धतीसही संथा असे म्हणले जाते.
वेदाध्ययनातील संथा
[संपादन]मराठी विश्वकोशात शिक्षण पद्धतीचा परिचय करून देताना लेखक रा.म.मराठे यांच्या मतानुसार प्राचीन भारतात ग्रंथ कंठस्थ करण्याची विशिष्ट पद्धत होती; वेदत्रयींचे अध्ययन गुरूकडून संथा घेऊन होई.[१] तर पराग दिवेकर यांच्या "वेदाध्ययनातील- संथा देणे... म्हणजे काय?" या लेखातील व्याख्येनुसार वेदाध्ययनातील संथा देणे म्हणजे वेदपाठशाळेमध्ये वेद शिकविणारे गुरुजी समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना वेदमंत्राचे छोटे तुकडे पाडून, त्यांच्या मागे (७वेळा) घोकायला/म्हणायला सांगतात. याला प्राथमिक अर्थानी संथा देणे असे म्हणले जाते.[२]
मराठी विश्वकोशातील "परीक्षापद्धति, शैक्षणिक" या लेखात अकोलकर आणि गोगटे यांच्या मतानुसार प्राचीन भारतात परीक्षेची अशी तंत्रनिष्ठा व औपचारिक पद्धती नव्हती. गुरुगृही चालणाऱ्या अध्ययनात एक संथा जमली, की पुढची संथा मिळत असे.[३]
संथा म्हणणे
[संपादन]विद्यार्थ्यांनी संपूर्ण पाठांतर करण्याच्या विशिष्ट पद्धतीला संथा घालणे अगर संथा म्हणणे असे म्हणतात.[२] एखादा विषय / याज्ञिकातला प्रयोग/संहितेचा अध्याय (तोंड)पाठ करताना, संथा म्हणण्याचे १) चरणाची संथा २) अर्धनीची संथा ३) ऋचेची संथा ४) गुंडिकेची संथा हे चार टप्पे असतात. [२]
१) चरणाच्या पहिल्या संथेत, गुरुजी प्रथम समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना मंत्राचा एकेक चरण (तुकडा) दोनदा सांगतात. विद्यार्थी (पोथीत बघून) तो गुरुजींच्या मागून सात वेळा घोकतात. यात म्हणताना चूक झाली तर, सुरुवातीपासून पुन्हा म्हणतात. यात शुद्ध अक्षर, जोडाक्षर, त्याचे गुरुत्व, अनुस्वारांचे उच्चार, स्वराघात, ऱ्हस्व व दीर्घ/प्रदीर्घ स्वर, विसर्ग (आणि त्यांचे तसेच उच्चार) वगैरे शंभर टक्के शुद्ध होत आहेत की नाहीत, हे गुरुजी ऐकून, कसून तपासतात. हे वेदमंत्राचे पाडलेले एकेक चरण, सात वेळा घोकत संपूर्ण अध्याय वा स्तोत्र पूर्ण केले जाते. अश्या चार संथा' झाल्या की चरण' पूर्ण होतो. मंत्र आणि उच्चारणात अशुद्धी राहू नयेत म्हणून सगळी संथा गुरुजींसमक्षच होते. [२]
२) अर्धनीच्या संथेत, सामान्यतः मंत्राची अर्धी ओळ (म्हणजे २ चरण एकत्र) सात वेळा म्हटली जाते. आधी चरण पाठ झालेला असेल तर गुरुजी समोर नसले तरी चालते. एकामागून एक अर्धी ओळ पूर्ण ७ वेळा घोकत संपूर्ण अध्याय पूर्ण केला की अर्धनीची १ संथा होते. याचप्रमाणे पुढे अजून ३ संथा म्हटल्यानंतर या अर्धनीच्या चार संथा पुऱ्या होतात.[२]
३) ऋचेच्या संथेत, मागील अर्ध्या ओळीच्या संथेचा पुढचा भाग सुरू होतो. म्हणजे २ ओळींची संपूर्ण ऋचा, अधिक पुढच्या ऋचेचा पहिला चरण ..,तसे ७ वेळा म्हणतात. यातील पुढच्या ऋचेचा पहिला चरण घेण्याचे कारण असे की, यामुळे संपूर्ण अध्यायातल्या प्रत्येक ऋचेची पाठोपाठ येणाऱ्या ऋचेशी गुंफण तयार होते.
अशुद्धी आली किंवा नंतर तयार झालेली असल्यास लक्षात यावे म्हणून ऋचेच्या (पहिल्या) संथेवर, शिकविणाऱ्या गुरुजींचे (पुन्हा..) बारीक लक्ष असते. ह्या ऋचेच्या परत पुढे तीन संथा म्हटल्यानंतर या ऋचेच्याही एकंदर चार संथा पूर्ण होतात. [२]
४) गुंडिकेची संथा हा शेवटचा परंतु अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. आता मागे सांगितलेल्या ऋचेच्या संथेनी हिचे निम्मे काम- (गुंफणीद्वारे) केलेले असते. पण तरीही.., आता कितीही पाठ येत असले, तरी संथेतील पहिल्या ओळीपासून पोथीत पाहूनच सदर पाठांतराच्या अध्यायाचा एकेक अनुवाक अथवा वर्ग (पॅरेग्राफ) ७ वेळा म्हणून तो सगळा अध्याय पूर्ण करतात. ही झाली गुंडिकेची पहिली संथा. अश्या अजून तीन म्हणून, ह्या गुंडिकेच्या चार संथा पूर्ण करतात.
संथेत म्हणलेले सर्व चरण मुखोद्गत झाले आहेत याची खात्री करण्याच्या दृष्टीने गुंडिकेची संथा चालू असताना, साधारणपणे दुसऱ्या किंवा तिसऱ्या संथेपासून, विद्यार्थ्याची इच्छा अगर तयारी नसली तरी विद्यार्थ्यांना पोथीत न पहाताच, मान वर करून संथा म्हणावी लागते. कोणत्याही सर्वसामान्य क्षमतेच्या विद्यार्थ्याला यांतल्या शेवटच्या २ संथांमधे या पाठांतर पद्धतीमुळे, सर्वकाही बिनचूक तोंडपाठ येते. पण एखादे वेळी काही कमजोर विद्यार्थ्यांना अधिक कष्ट घ्यावे लागतात. अश्या ह्या एकंदर १६ संथा घातल्या की विद्यार्थ्याकडून अपेक्षित असलेला पाठांतराचा विषय तयार होतो. [२]
"अनोखा परिचय ऋग्वेद आणि उपनिषदांचा"चे लेखक रघुनाथ जोशी यांच्या मतानुसार वेदऋचांच्या लेखनात काही अक्षरांच्या खाली आडवी रेघ (उदा. क॒ ) 'अनुदात्त स्वर' तर काही अक्षरांच्यावर उभी रेघ (उदा. क॑ ) 'स्वरीत स्वर' दिलेली असते. ऋचांमधील ॒ ॑ या रेषांना स्वर म्हणले जाते परंतु मुळाक्षरातील स्वरांचा याच्याशी काहीही संबंध नसतो. ज्या अक्षरांना रेष नसते त्यांना 'उदात्त स्वर' म्हणतात. वेदांचे पठण करताना या स्वरांचा उपयोग केला जातो. ज्या अक्षराखाली आडवी रेष ॒ असते ती अक्षरे म्हणताना म्हणणारी व्यक्ती आपले डोके खाली वाकवते. ज्या अक्षरांवर उभी रेष ॑ असते ते म्हणताना म्हणणारी व्यक्ती डोके वर उचलते. यामुळे वेदऋचांचे पठण करणाऱ्यांना आपली डोकी त्यामुळे सारखी वर खाली हलवावी लागतात. लिहिलेली ऋचा तोंडाने स्पष्ट म्हणण्यासाठी यांचा उपयोग होतो तसेच वेदांचे सामूहिक पठण करताना सर्व पाठकांचा उच्चार कोणत्याही वेळी एका ठरावीक अक्षराचाच व्हावा असाही उद्देश यातून साध्य होतो.[४]
शिक्षा आणि प्रातिशाख्ये
[संपादन]श्रीधर केतकर यांच्या महाराष्ट्रीय ज्ञानकोशानुसार शिक्षा ह्याचा अर्थ “शिकणें”, विशेषतः पठण करणें (संथा घेणें) म्हणजे स्पष्ट उच्चार करून आघात वगैरे देऊन संहिता म्हणणें हा होय. [५]या वेदांगाचा प्रथमतः तैत्तिरीय उपनिषदांत नामनिर्देश आला आहे. शब्द व त्यावरील आघात, पदप्रमाण किंवा शब्दावयव व त्यावरील आघात आणि म्हणण्यातील स्वरमाधुर्य व शब्दसंधि असे शिक्षेचे सहाभाग तैत्तिरीय उपनिषद १, २ मध्ये सांगितले आहेत.[५] धर्मकर्म किंवा धार्मिक विधी शिकविण्याप्रमाणें धर्माच्या दृष्टीने शिक्षेचीहि आवश्यकता वाटली. कारण एखादे यज्ञकृत्य बरोबर करावयाचें म्हणले म्हणजे त्यांतील कर्म माहीत असणे अवश्य असून शिवाय संहितातून परंपरेनें आलेलीं पवित्र सूक्तें जशींची तशींच बिनचूक बरोबर उच्चार करून म्हणावी लागत. परंतु ह्यावरून असे गृहीत धरल्यासारखें होते की, ज्या वेळीं शिक्षेवरील ग्रंथ अस्तित्वात आले त्या वेळेच्या पूर्वींपासूनच वेदांतील संहिता ह्या पवित्र मानल्या जात असून शिक्षाध्यापक आचार्यांनीं त्यांनां (संहितांनां) विशिष्ट स्वरूप आणले होते. परंतु वास्तविक पहाता असें दिसतें की ऋग्वेद संहितेंतील सूक्तें पूर्वीच्या कवींनीं जशीं तयार केलीं तशी आज सांपडत नाहीत.[५] जरी परंपरागत अध्यापकांनीं त्यांतील शब्द बदलले नाहीत तरी उच्चार, शब्दाचे अंत्य व आरभींचे स्वर, अर्धवट व्यक्त भाग गाळून टाकणें वगैरे बाबतींत त्यांनीं पूर्वीच्या पठनपद्धतींत विकार व भेद होऊ दिला.[५] उदाहरणार्थ, एका संहितेत “त्वंह्यग्ने” असें लिहिलेलं आढळते, परंतु वृत्ताच्या आधारावरून असे स्पष्ट सिद्ध होते कीं जुने पाठक “त्वंहि अग्ने” असें म्हणत असत. ह्यावरून वेदांतील संहिता ह्याच आधी झाल्या असल्या पाहिजेत. परंतु संहितापाठाशिवाय, शिक्षेंत सांगितल्याप्रमाणें म्हणावें लागत असल्यामुळें पदपाठ म्हणून एक निराळा आहे.[५] ह्यांत संहितापाठांत दिसून येणारें स्वर एकमेकांस जोडून न देता प्रत्येक शब्द निरनिराळा लिहिला आहे.[५] संहितापाठ व पदपाठ ह्यांतील भेद दाखविण्यासाठीं एक उदाहरण पुरें आहे. ऋग्वेद संहितेंतील एक मंत्र खालीं लिहिल्याप्रमाणें आहे.
अग्निः पूर्वेभिर्ऋषिभिरीडयोनूतनैरुत । स देवाँएह वक्षति ।।२।।
पदपाठाप्रमाणें हाच श्लोक खाली लिहिल्याप्रमाणें आहे.
अग्निः । पूर्वेभिः । ऋषिऽभिः । ईडयः । नूतनैः । उत। सः । देवान् । आ । इह । वक्षति ।।२।।
श्रीधर केतकर यांच्या महाराष्ट्रीय ज्ञानकोशानुसार पदपाठ हे शिक्षासंपन्न धर्मकारांचें, पक्षीं वैयाकरणी लोकांचें काम आहे.[५] कारण त्यांत संहितामंत्र व्याकरणदृष्टया परिच्छेद करून दिलेले आहेत.[५] तरीहि पण हे फार जुने आहेत. ऐतरेय आरण्यकांत ज्याचें नांव आलेलें आहे त्या शाकल्य नांवाच्या आचार्यांनीं ऋग्वेदाचा पदपाठ लिहिला असे म्हणतात.[५]
श्रीधर केतकर यांच्या महाराष्ट्रीय ज्ञानकोशानुसार शिक्षापंथाचें जुन्यात जुने काम म्हणजे संहितापाठ व पदपाठ होय.[५] ह्या वेदांगाचे जुन्यात जुने आज आपणांस उपलब्ध असणारे ग्रंथ म्हणजे प्रातिशाख्ये होत. ह्यांत पदपाठावरून संहितापाठ कसे तयार करावयाचें ह्या संबंधीं नियम आहेत. ह्यामध्यें उच्चार, आघात शब्दसंधींतील व वाक्यांतील आरंभींच्या किंवा अंत्य शब्दांचे स्वरांतील उच्चारभेद ह्यांची माहिती दिली आहे. श्रीधर केतकर यांच्या महाराष्ट्रीय ज्ञानकोशानुसार थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे संहिता म्हणण्याच्या पद्धतीचे पूर्ण विवेचन केलेलें आहे.[५] संहितेच्या प्रत्येक शाखेला अशा त-हेचें एक पाठपुस्तक होते; ह्यावरूनच त्यास प्रातिशाख्य असे नांव आलें. ऋग्वेदप्रातिशाख्य म्हणून एक आहे; ते आश्वलायनाचा गुरू शौनक ह्यानें लिहिले असावे. हा ग्रंथ पद्यमय असून पूर्वींच्या एखाद्या सूत्रपाठाची ही सुधारून वाढविलेली आवृत्ति असावी. हस्तलिखित ग्रंथांतून व उता-यांमधून त्यांस “सूत्र” अशी संज्ञा आहे. तैत्तिरीय प्रातिशाख्यसूत्र हें तैत्तिरीय संहितेचें सूत्र आहे.[५]
श्रीधर केतकर यांच्या महाराष्ट्रीय ज्ञानकोशानुसार वाजसनेयी संहितेला कात्यायन ह्यानें केलेलें वाजसनेयी प्रातिशाख्यासूत्र व अथर्ववेद संहितेला शौनकपंथांपैकीं कोणी तरी केलेले अथर्ववेद प्रातिशाख्यसूत्र हीं जोडलेलीं आहेत.[५]
श्रीधर केतकर यांच्या महाराष्ट्रीय ज्ञानकोशानुसार आज उपलब्ध असलेला संहितापाठ प्रातिशाख्यांच्या रचनाकालापासून ते आजपर्यंत कित्येक शतके जशाचा तसाच राहिला आहे असे सिद्ध होते. [५]ऋग्वेदप्रातिशाख्यांतील नियमांत असेच गृहीत धरले आहे की, ऋग्वेदसंहितेतील दहा मंडलें आज आहेत तशीच असली पाहिजेत, एवढेच नव्हे तर त्यांतील सूक्तांचा अनुक्रम आज जसा आहे तसाच असला पाहिजे. शौनकाच्या अत्यंत बारीक नियमांवरून आज उपलब्ध असलेल्या छापील आवृत्तीमध्यें ऋग्वेदसंहिता पदशः व शब्दशः जशी आहे तशीच ती त्या काळीं होती ह्याविषयीं शंका रहात नाही.[५] अनुक्रमणी व तत्संबंधींचे दुसरे ग्रंथ ह्यांचें एवढें महत्त्व असण्याचे कारण इतकेच कीं, त्यांवरून वैदिक संहितापाठ, श्लोकसंख्या, रचना व स्वरूप ह्या बाबतींत आज जसा आहे तसाच फार प्राचीन काळीं होता हे सिद्ध होते.[५]
संदर्भ
[संपादन]- ^ रा.म.मराठे यांचे. "अध्यापन व अध्यापनपद्धति (खंड १)". मराठी विश्वकोशावरील अध्यापन व अध्यापनपद्धति -रा.म.मराठे यांचा लेख दिनांक १७ मार्च २०१५ भाप्रवे सायंकाळी ५ वाजता रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ a b c d e f g [पराग पुरुषोत्तम दिवेकर]. "वेदाध्ययनातील- संथा देणे... म्हणजे काय?". धागा लेख आणि (प्रतिसाद # भृशुंडी). १६/३/२०१५,रात्रौ ७ वाजता रोजी पाहिले. More than one of author-name-list parameters specified (सहाय्य); Check
|लेखकदुवा=
value (सहाय्य); Check|लेखकदुवा=
value (सहाय्य);|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ ग.वि.अकोलकर आणि श्री.ब.गोगटे यांचे. "परीक्षापद्धति, शैक्षणिक". मराठी विश्वकोशावरील परीक्षापद्धति, शैक्षणिक -ग.वि.अकोलकर आणि श्री.ब.गोगटे यांचा लेख दिनांक १७ मार्च २०१५ भाप्रवे सायंकाळी ५ वाजता रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^
लेखक: जोशी, रघुनाथ. ग्रंथाचे नाव: "अनोखा परिचय ऋग्वेद आणि उपनिषदांचा". pp. ३७, ३८ ग्रंथातील एकूण पृष्ठे ३५२. १७-०३-२०१५ रोजी पाहिले.
......ऋचातील या रेघांना स्वर हे नाव दिलेले आहे. ......ते.... स्वरित स्वर आणि काही अक्षरांवर असणारी मात्रा यांच्या लेखनात फरक असतो.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ a b c d e f g h i j k l m n o p केतकर, श्रीधर. वेदप्रवेश-वेदांगें. १७ मार्च २०१५ रोजी पाहिले.
पहिला परिच्छेद + आंतरजालावरून शोधलेली इतर माहिती
More than one of author-name-list parameters specified (सहाय्य)