श्रीक्षेत्र जाळीचा देव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जाळीचा देव हे भोकरदन तालुक्यातील एक गांव आहे. महानुभाव पंथामधील भाविकांसाठी अत्‍यंत महत्त्वाचे धार्मिक ठिकाण आहे. या ठिकाणी श्री चक्रधर स्‍वामी यांचे काही काळ वास्‍तव्‍य होते.

श्रीक्षेत्र जाळीचा देव  - अजिंठ्यापासून २८ आणि बुलडाण्यापासून २५ किलोमीटरवर महानुभाव पंथीयांचे "जाळीचा देव' हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. महानुभाव पंथांचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी बाराव्या शतकात महाराष्ट्रभ्रमण करत होते. ते श्री चक्रधर स्वामी गंगातीराकडून कनाशी, भडगाव, पाचोरा, शेंदुणी, चांगदेव, हरताळा येथे आले. हरताळा येथून स्वामी सावळदबारा येथे आले. येथून वालसावंगी (जि. जालना) येथे जाताना या घनदाट अरण्यात करवंदाच्या जाळीच्या सावलीत विश्रांती घेण्यासाठी ते थांबले. त्या ठिकाणी यांना दोन वाघिणीची पिल्ले दिसली. ते त्या पिल्लांना आपल्या मांडीवर घेऊन त्यांना प्रेमाने कुरुवाळू लागले. तेवढ्यात वाघीण त्या ठिकाणी आली व गर्जना करू लागली . स्वामींनी तिच्याकडे कृपाकटाक्ष टाकताच ती पाळीव कुत्र्याप्रमाणे स्वामींकडे पाहून शेपटी हलवू लागली. ही लिळा(घटना) वृक्षवेलींनी बहरलेल्या जाळीमध्ये स्वामी बसले असताना घडली. म्हणून या तीथथक्षेत्राला जाळीचा देव हे नाव पडले. वाघोदा (जि. जळगाव) येथील भक्त (कै.) लक्ष्मणराव पाटील आपला कुष्ठरोग चांगला व्हावा यासाठी सन १९३६मध्ये येथे आले. त्यांनी येथे एकवीस दिवस उपवास करून नामस्मरण केले. एकविसाव्या दिवसी पहाटे तीनला एक साधू त्यांना स्वप्नात दिसले. व म्हणाले तू मला सावली कर, मी तुझा रोग नष्ट करतो. त्यानंतर थोड्याच दिवसात श्री. पाटील निरोगी झाले. स्वप्नात परमेश्वराला दिलेले अभिवचन पूर्ण करण्यासाठी त्यांनी या स्थानाभोवतीची झाडे झुडुपे काढून १९३८मध्ये मंदिराच्या बांधकामास सुरुवात केली. त्यावेळी तेथे निजामच्या बादशाहाची राजवट असल्यामुळे येथील अधिकारी बांधकामासाठी मंजुरी देत नव्हते. तेव्हा (कै.) श्री. पाटील व तेथील पुजारी (कै.) दत्तूबुवा हैदराबादला जाऊन बांधकामाची परवानगी घेऊन आले. १९४२मध्ये सभामंडपाचे काम पूर्ण होऊन कलशारोहण समारंभ थाटात झाला.

नारळासाठी गुराख्यांना स्थान दर्शन लाभ -

स.न. १९२० ते १९२५ या काळात येथे कुणीही राहत नव्हते. जाळीच्या वेलांखाली दगड मातीचा ओटा मात्र बाधंलेला होता या आठवणी आजही सावळदेवा गावचे वृद्ध गुराखी सागंतात की पौर्णिमेचा दिवस असला की येथील गुराखी या स्थानावर आवर्जून जात, कारण या स्थानावर तुरळक भक्तांनी अर्पण केलेले नारळ असत.. साधारण चार ते पाच नारळ मिळायचे. सर्व गुराखी एकत्र येऊन हे नारळ फोडून खात.

जाळीचा देव, अजिंठा-बुलढाणा रोडवर अजिंठयांहून पूर्वेस २९ किमी आहे. १)छत्रपती संभाजीनगर ते जाळीचादेव १२१, किमी आहे, २).जळगाव ते जाळीचादेव ९३,किमी आहे, ३).जालना ते जाळीचादेव (सिल्लोड अजिंठा रोडने) १३२, किमी, बुलढाणा रोडने १३२ किमी, वालसांगवीहून ईशान्येस जनूना रोडने ९ किमी आहे, हा पायी मार्ग आहे, ४).बुलढाणा ते जाळीचा देव २५ किमी, ५). सिल्लोड ते जाळीचा देव 49 किमी आहे.

जाळीचा देव येथे जाण्यासाठी एस.टी.च्या बसेस मिळतात.

स्थान माहिती - १ आसन स्थान ... हे स्थान सह्याद्री पर्वतावर उत्तर सोंडेवर पूर्वाभिमुख मंदिरात आहे,

लीळा - चक्रधर स्वामी आपल्या परिभ्रमण काळात फिरत असताना पूर्वार्धात सावळदबाऱ्याहून भला मोठा सह्याद्रीचा पहाड चढून आले. नंतर तिथे काही काळ विश्रांती घेऊन ते पुढे वालसांगवीकडे गेले, (वि.स्था.पो.क्र.१५२१)

तात्पर्य- स्वामीनी जसा स्वतःचा थकवा घालविला त्याप्रमाणे त्यांना अनन्य भावाने शरण आलेल्या भक्ताचा शारीरिक मानसिक थकवा दूर करून आपल्याला असीम असा आनंद या स्थळी मिळतो.