शिंपी (पक्षी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शिंपी (शास्त्रीय नाव:ऑर्थोटोमस सुटोरियस) हा छोटा पक्षी आहे. याला हिंदी मध्ये दर्जी तर इंग्लिशमध्ये कॉमन टेलरबर्ड अशी नावे आहेत.

हा पक्षी साधारण १३ सें. मी. आकाराचा, उत्तम घरटे विणणारा पक्षी म्हणून ओळखला जातो. वरून हिरवा, खालून फिकट पांढरा आणि डोके तांबुस, शेपटीतून दोन अणकुचीदार पिसे निघालेली असतात व हा आपली शेपटी वर ठेवतो. वीण काळात नराची ही पिसे जास्त लांब होतात. शिंपी पक्षी अतिशय सक्रिय आहे. एकट्याने किंवा जोडीने कीटक शोधत आणि पिची, पिची, पिची असा काहीसा आवाज काढत सर्वत्र फिरत राहतो.

शिंपी पक्षी हिमालयाच्या १५०० मी. उंचीपर्यंतच्या परिसरापर्यंत संपूर्ण भारतभर आढळतो तसेच तो पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि म्यानमार या ठिकाणीही आढळतो. आकार आणि रंगाच्या थोड्या फरकाने याच्या किमान पाच उपजाती येवढ्या भागात आहेत.

लहान कीटक, त्यांची अंडी आणि अळ्या तसेच विविध फुलातील मध हे शिंपी पक्ष्याचे मुख्य अन्न आहे. एप्रिल ते सप्टेंबर हा काळ याचा वीणीचा काळ असून झाडांची पाने, गवत, कोळ्याचे जाळे, कापसाचे धागे वगैरे साहित्य वापरून तयार केलेले याचे घरटे व्यवस्थित शिवलेले असते. मादी एकावेळी निळसर पांढऱ्या किंवा लालसर पांढऱ्या रंगाची आणि त्यावर तपकिरी ठिपके असलेली, ३ ते ४ अंडी देते. अंडी उबविण्याचे काम एकटी मादी करते पण घरटे बांधणे, पिलांना खाऊ घालणे वगैरे कामे नर-मादी मिळून करतात.

चित्रदालन[संपादन]