शरद केशव साठे
शरद केशव साठे | |
---|---|
कार्यक्षेत्र | सूची |
प्रसिद्ध साहित्यकृती | मराठी ग्रंथसूची, अमृतानुभवाचा पदसंदर्भकोश |
शरद केशव साठे (जन्म १३ डिसेंबर १९४० - मृत्यू ०१ ऑक्टोबर २०१५) हे मराठी ग्रंथसूचिकार म्हणून प्रसिद्ध आहेत. शंकर गणेश दाते ह्यांनी इ. स. १८०० ते १९५० ह्या काळात प्रकाशित झालेल्या मराठी ग्रंथांची विषयवार सूची तयार करून प्रकाशित केली होती. त्यापुढील कालखंडातील मराठी ग्रंथांची सूची करण्याचे काम राज्य मराठी विकास संस्थेने साठे ह्यांच्याकडे सोपवले आणि श्री. साठे ह्यांनी इ. स. १९५१ ते १९८५ ह्या कालखंडातील मराठी ग्रंथांची विषयवार सूची ४ खंडांत (मराठी ग्रंथसूची खंड २ ते ६) तयार केली.
शरद साठे ह्यांचे शब्दसूचिकार्य
[संपादन]शरद साठे ह्यांनी १९९५पर्यंत विविध तऱ्हेच्या शब्दसूची रचण्याचे काम केलेले होते [१]. अमृतानुभवाचा पदसंदर्भकोश (१९८९) हा कोश मराठी संशोधन-मंडळ व मुंबई विद्यापीठ ह्यांनी संयुक्तपणे प्रकाशित केला. पदसंदर्भकोशात ग्रंथात आलेल्या प्रत्येक शब्दाची नोंद असते तो ग्रंथात कुठे आला आहे ह्याचा पत्ता दिलेला असतो आणि तो शब्द ज्या ओळीत वापरलेला आहे त्या ओळीचा मजकूरही दिलेला असतो. त्यामुळे शब्दाच्या वापराचा संदर्भ त्वरित कळून येतो. इतकेच नव्हे तर ग्रंथातील पुनरुक्त शब्द, त्यांची वारंवारता, ग्रंथातील अनन्य शब्द ह्यांचीही माहिती मिळते.
श्री. साठे ह्यानी केलेली इतर कामे म्हणजे ज्ञानेश्वरीची ओवीसूची (१९९४, ज्ञानदेवी ह्या त्रिखंडात्मक प्रकाशनाच्या तिसऱ्या भागात समाविष्ट), मर्ढेकरांच्या कवितांची चरणसूची आणि शब्दसूची (अप्रकाशित), ज्ञानेश्वरपंचकाच्या अभंगांची चरणसूची आणि शब्दसूची (अप्रकाशित1) तसेच ज्ञानेश्वरांच्या चांगदेवपासष्टीची चरणसूची आणि शब्दसूची (अप्रकाशित). हे काम करायला त्यांनी ११ वर्षांतील जवळजवळ ७००० तास वेचल्याचे नोंदवले आहे [२].
मराठी ग्रंथसूची भाग ३ ते ६ (१९५१ ते १९८५)
[संपादन]जून १९९५मध्ये गरवारे महाविद्यालय, पुणे येथे राज्य मराठी विकास संस्थेद्वारे आयोजलेल्या कोश व सूची ह्या विषयांवरील चर्चासत्रात डॉ. सरोजिनी वैद्य ह्यांनी ग्रंथसूचीच्या कामाची निकड आपल्या भाषणात मांडली होती. साठे ह्यांनी १९९६ च्या जानेवारीपासून मराठी ग्रंथसूचीच्या पुढील कालखंडाचे काम करण्याची जुळवाजुळव सुरू केली.
साठे ह्यांच्या ग्रंथसूचीची वैशिष्ट्ये
[संपादन]साठे ह्यांच्या ग्रंथसूचीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी सूचीला जोडलेल्या विविध निर्देशसूची. ग्रंथसूचीतील ग्रंथवर्णनाच्या भागात ग्रंथांची माहिती विषयवार दिलेली असते. पण इतर तऱ्हेने माहिती शोधता येण्यासाठी निर्देशसूची आवश्यक असतात. साठे ह्यांनी ग्रंथकार-निर्देश-सूची, ग्रंथनाम-निर्देश-सूची, विषय-निर्देश-सूची ह्यांबरोबरच प्रकाशक-निर्देश-सूची, प्रकाशन-स्थळ-निर्देश-सूची, अनुवादित-ग्रंथ-निर्देश-सूची, ग्रंथमाला-निर्देश-सूची, टोपण-नाव-निर्देश-सूची अशा विविध निर्देशसूची आपल्या ग्रंथसूचींना जोडल्या आहेत.
ह्याच बरोबर विविध तक्तेही परिशिष्ट म्हणून दिले आहेत. उदा. संबंधित कालखंडात कोणत्या विषयावर किती ग्रंथ झाले हे दर्शवणारा विषयवार ग्रंथनिर्मितीचा तक्ता, कोणत्या भाषांतील किती ग्रंथ मराठीत अनुवादित झाले दे दर्शवणारा भाषावार अनुवादित ग्रंथांचा तक्ता (संस्कृत, हिंदी, गुजराती, इंग्लिश अशा भाषांचा अपवाद वगळता अन्य भाषांमधील ग्रंथ मराठीत थेट अनुवादित न होता त्यांच्या इंग्लिश भाषांतरांवरून अनुवादित होतात. त्यामुळे तक्त्यात रशियाई भाषेतून अनुवादित ग्रंथांची संख्या ४३ असली. तर ते ग्रंथ थेट रशियाई भाषेतून अनुवाद झालेले असतील असे नाही.), कोणत्या प्रकाशकाने किती ग्रंथ प्रकाशित केले हे दर्शवणारा प्रकाशकवार ग्रंथनिर्मितीचा तक्ता, कुठेल्या ठिकाणी किती ग्रंथ प्रकाशित झाले हे दर्शवणारा प्रकाशनस्थळानुसार ग्रंथनिर्मितीचा तक्ता इ.
संदर्भ
[संपादन]
संदर्भसूची
[संपादन]- साठे, शरद केशव (१९९७), "माझे शब्दसूचीचे काम", in वैद्य, सरोजिनी आणि इतर (ed.), कोश व सूची वाङ्मय : स्वरूप व साध्य, मुंबई: राज्य मराठी विकास संस्था