शंकर गणेश दाते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शंकर गणेश दाते (१७ ऑगस्ट, १९०५[१] - १० डिसेंबर, १९६४[२]) हे एक मराठी लेखक, सूचिकार होते. इ.स. १८०० ते १९५० ह्या १५० वर्षांच्या कालखंडात प्रकाशित झालेल्या मुद्रित मराठी ग्रंथांची विषयवार सूची (मराठी ग्रंथसूची किंवा दातेसूची) त्यांनी दोन भागांत तयार करून प्रकाशित केली. ह्या दोन्ही खंडांत मिळून २६६०७ इतक्या मराठी ग्रंथांची नोंद झालेली आहे.

मराठी ग्रंथसूचीव्यतिरिक्त त्यांनी मराठी लोककथांचे संकलन केले आणि ग्रंथालयशास्त्रावर पुस्तके लिहीली. त्यांनी भारतीय साहित्याची राष्ट्रीय ग्रंथसूची १९०१-१९५१ भाग ३ ह्या ग्रंथातील मराठी विभागाचे संपादनही केले.

व्यक्तिगत माहिती[संपादन]

दाते ह्यांचा जन्म रत्‍नागिरी येथे झाला. त्यांचे मूळ घराणे राजापूर तालुक्यातील अडिवरे येथील होते. त्यांचे वडील हे मुंबईच्या कुलाबा वेधशाळेत हेडक्लार्क ह्या पदावर काम करत होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी व्यापारात चांगले यश मिळवले. पण १९१४ साली त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर दाते ह्यांचे काका आणि मोठे बंधू ह्यांनी दाते ह्यांचा सांभाळ केला.

पुणे येथील स. प. महाविद्यालयातून दाते ह्यांनी मराठी आणि संकृत ह्या विषयात पदवीसाठी नाव नोंदवले होते. पण लोकसाहित्य ह्या विषयाची आवड निर्माण झाल्याने ते त्या विषयाकडे वळले आणि त्यांनी लोककथांचे संकलन प्रकाशित केले.

१९३४पासून त्यांनी मराठी ग्रंथसूचीचे काम हाती घेतले आणि एकट्यानेच काम करून १९६१ साली ते पूर्ण केले. त्यानंतर मराठी नियतकालिकांची सूची करण्याचे त्यांनी ठरवले होते. त्यासाठीची सामग्रीही जमवली होती. मात्र १० डिसेंबर, १९६४ रोजी वयाच्या साठाव्या वर्षी कर्करोगाने त्यांचे निधन झाले.[३]

मराठी ग्रंथसूची (भाग १ व २)[संपादन]

दाते ह्यांनी १९३४ साली मराठीतील प्रकाशित ग्रंथांची विषयवार सूची करण्याचे काम हाती घेतले आणि २७ वर्षे खपून ते काम १९६१ साली पूर्ण केले. इ. स. १८०० ते १९५० ह्या १५० वर्षांतील मराठी ग्रंथांची विषयवार आणि शास्त्रीय पद्धतीने सूची करून त्यांनी प्रकाशित केली. तसे करताना दाते ह्यांनी सूचीत नोंदवलेले प्रत्येक पुस्तक पाहून मग त्याची नोंद करण्याचे धोरण स्वीकारले होते. मराठी ग्रंथसूची हे मराठी भाषेत कोणकोणत्या विषयावर कोणकोणते ग्रंथ प्रकाशित झाले हे जाणून घेण्यासाठीचे उपयुक्त साधन आहे.

ग्रंथसूचीत ग्रंथाविषयी दिलेली माहिती[संपादन]

मराठी ग्रंथसूचीत प्रत्येक ग्रंथाविषयी पुढीलप्रमाणे माहिती नोेंदवलेली आढळते. ०१. ग्रंथकाराचे नाव, ०२. ग्रंथाचे नाव, ०३. आवृत्ती, ०४. प्रकाशनस्थळ, ०५. प्रकाशक, ०६. पृष्ठसंख्या, ०७. आकार, ०८. चित्रांची माहिती, ०९. मूल्य ह्या माहितीसोबतच मुद्रक आणि मुद्रणस्थळ ही माहितीही ह्या सूचीत नोंदवलेली आहे. तसेच ग्रंथाविषयीची महत्त्वाची इतर माहिती उदा. अनुवादित ग्रंथ असल्यास मूळ ग्रंथ, ग्रंथकार इ. टिपेत नोंदवलेली आहे. प्रत्येक ग्रंथाविषयीची ही माहिती ग्रंथ-वर्णन-कोश ह्या विभागात विषयवार विभागून दिली आहे.

नोंदींच्या वर्गीकरणासाठी ग्रंथालयशास्त्रात वापरण्यात येणारी मेलविल डयुई ह्यांची दशांश-वर्गीकरण-पद्धती वापरली आहे. काही ठिकाणी उदा. चरित्रे काही विशेष शीर्षकांचा वापर करून त्याविषयीचे सर्व ग्रंथ एकत्र सापडण्याची सोय केली आहे. उदा. शिवाजी महाराजांची सर्व चरित्रे. सूचीच्या प्रारंभी दशांश-वर्गीकरण-पद्धतीचे वर्ग आणि उपवर्ग ह्यांची माहिती देण्यात आली आहे. तसेच सूचीच्या शेवटी लेखकाचे नाव, ग्रंथाचे नाव, विशेष शीर्षक ह्यांच्या निर्देशसूची दिलेल्या असून त्यायोगे सूचीतील ग्रंथ शोधण्याची सोय करून दिलेली आहे.

संदर्भ व टीप[संपादन]

  1. ^ पुजारी & २००४ पृ. ४.
  2. ^ पुजारी & २००४ पृ. ५.
  3. ^ वैद्य & २००० पृ. सहा-सात.

संदर्भसूची[संपादन]

  • पुजारी, अर्चना (२००४). "शंकर गणेश दाते यांचा जीवनपट" (PDF). ज्ञानगंगोत्री. वर्ष ५, अंक १ (जून-जुलै-ऑगस्ट २००४): पृ. ४-५. Archived from the original (PDF) on 2022-01-08. २२ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
  • वैद्य, सरोजिनी (२०००) [१९४४]. "ग्रंथसूची आणि सूचिकार यांविषयी...". मराठी ग्रंथसूची. (१८००-१९३७) भाग १ (पुनर्मुद्रण ed.). मुंबई: राज्य मराठी विकास संस्था. pp. पृ. चार-आठ.

बाह्य दुवे[संपादन]