शतपावली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जेवण झाल्यानंतर अन्नपचन व्हावे म्हणून दहा-पंधरा मिनिटे चालणे याला शतपावली असे म्हणतात. 'उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म' असे समर्थांनी यथार्थपणे म्हटले आहे. वैद्यकीय शास्त्रानेदेखील आहाराला आरोग्यासाठी एक मूलभूत अंग मानले आहे. किंबहुना शास्त्रशुद्ध आहार हा आरोग्ययज्ञासाठी आवश्यकच आहे. यज्ञाची तयारी करण्यासाठी आणि तो झाल्यावर जशा काही गोष्टी धर्मशास्त्राप्रमाणे करायच्या असतात, तशाच आहाराबाबतसुद्धा आहेत. रोजच्या जेवणापूर्वी आणि जेवल्यावर काय करावे आणि काय करू नये, याबाबत वैद्यकीयदृष्ट्या काही संकेत पाळणे आवश्यक समजले जाते. जेवणानंतर काही विशिष्ट गोष्टी पाळल्यास नक्कीच उपयोगी ठरू शकतात. 'भुक्त्वा शतपदं गच्छेच्छनैस्तेन तु जायते।' म्हणजे जेवल्यावर थोडे चालणे असे म्हटले आहे.

शतपावली[संपादन]

भोजनानंतर मंदगतीने अर्धा ते पाउण तास पायी फिरून आल्यास, अन्नपचन व्हायला मदत होते. हे चालणे थोडे थोडे थांबत केले तरी हरकत नसते. आरोग्याला ते उत्तमच ठरते. साठ सत्तर वर्षांपूर्वीच्या काळात जेवल्यावर घरात किंवा अंगणात शंभर पावले चालण्याचा प्रघात होता. अनेक लोक रात्री रामरक्षा म्हणत अंगणात येरझारा घालत असत. करत असत. हे जेवणानंतरचे चालणे म्हणजेच शतपावली. दुपारच्या आणि रात्रीच्या दोन्ही जेवणांनंतर शतपावली केल्यास फारच उत्तम. आजच्या धावपळीच्या जीवनातसुद्धा, दुपारी ऑफिसमध्ये जेवण झाल्यावर थोडेसे म्हणजे शंभर पावले फिरून येणे अजिबात अवघड नाही. मात्र रात्रीच्या जेवणानंतर लोळत लोळत टीव्ही पाहत घरी थांबण्यापेक्षा शतपावली केलेली अधिक चांगली. शतपावली भरभर चालून करायची नसते. सावकाश आणि जास्तीतजास्त १०-१५ मिनिटे चालणे उत्तम असते. काही लोक आपल्या कुत्र्यांना फिरायला घेऊन जातात, हीदेखील एक चांगली सवय मानली जाते.

फायदे[संपादन]

  • शतपावली केल्यावर आपल्या शरीरात ‘एंडॉर्फिन’ नावाचे संप्रेरक स्त्रवते. त्यामुळे एक आनंदी आणि समाधानी मूड तयार होतो.
  • शतपावलीच्या योगे जठरातील अन्न हळू हळू आतड्यामध्ये सरकू लागते आणि पचनक्रियेचा वेग वाढतो.
  •  आंबट ढेकर, पोटातला गुबारा, पोटातील आम्लता हे त्रास कमी होण्यास मदत होते.
  • जेवणानंतर शतपावली केल्यामुळे शरीराच्या १०० कॅलरीज खर्च होऊन वजनवाढ आटोक्यात राहते, त्यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह,उच्च कोलेस्टेरॉल यांचे नियंत्रण सोपे राहते.
  • रात्री भोजनोत्तर शतपावली केल्यास वेळेवर आणि शांत झोप लागते.
  • चालताना काही विचार, काही समस्या मनात असतील त्यांची उकल होऊ शकते.
  • दुसऱ्या दिवशीच्या कामांची आखणी मनातल्या मनात करता येते, त्यामुळे वेळेचे नियोजन उत्तम होते.