वेस्ट बँक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वेस्ट बँक (जुड़िया आणि समारिया) हा मध्यपूर्वेतील एक वादग्रस्त भूभाग आहे. वेस्ट बँक व गाझा पट्टी हे दोन पॅलेस्टाईनचे प्रांत मानले जातात. वेस्ट बँक प्रांत जॉर्डन नदीच्या पश्चिम काठावर वसला आहे. वेस्ट बँकच्या उत्तर, पश्चिम व दक्षिणेला इस्रायल देश आहे व पूर्वेला जॉर्डन आहे. १९४८ ते १९६७ दरम्यान वेस्ट बँक जॉर्डनच्या ताब्यात होता, पण १९६७ साली झालेल्या इस्रायल-अरब युद्धानंतर इस्रायलने वेस्ट बँकवर कब्जा मिळवला.

वेस्ट बँक प्रदेश एकूण ५,६४० वर्ग किमी क्षेत्रफळ जमिनीवर वसला आहे व त्याची लोकसंख्या २३,४५,००० आहे ज्यातील बहुतांशी लोक अरब मुस्लिम आहेत. वेस्ट बँक सध्या कोणत्याच देशाचा सार्वभौम भाग नसल्यामुळे त्याची सुरक्षा व्यवस्था इस्रायलच्या ताब्यात आहे.

रामल्ला ह्या वेस्ट बँकमधील शहरात पॅलेस्टिनियन नॅशनल ऑथोरिटीचे मुख्यालय आहे. बेथलहम, जेरिको, नाब्लुस, हेब्रॉन, अल-बिरेह ही वेस्ट बँकमधील काही महत्त्वाची शहरे आहेत.