Jump to content

"श्रीपाद द्वारकानाथ वैद्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. श्रीपाद द्वारकानाथ वैद्य (जन्म : इ.स. १९२६; निधन : २५ ऑक्टोबर, इ.स....
(काही फरक नाही)

१६:१४, २२ मे २०१६ ची आवृत्ती

डॉ. श्रीपाद द्वारकानाथ वैद्य (जन्म : इ.स. १९२६; निधन : २५ ऑक्टोबर, इ.स. २०११) हे एक मराठी ‘कलावन्त बागवान’ (Landscape Architecture) होते. ते पुणे महापालिकेत उद्यान अधीक्षक होते. तेथून मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्रात गेल्यावर तेथील बगिचाला आकर्षक करायचा काम त्यांच्याकडे आले. सर होमी भाभा यांच्या उत्तेजनाने वैद्यांनी फ्रान्समधील व्हर्साय युनिव्हर्सिटीचा लॅण्डस्केप आर्किटेक्चरचा अभ्यासक्रम १९५८ साली पुरा केला. मुंबईत परतल्यावर त्यांनी कामाला सुरुवात केली. इटालियन पद्धतीची बोगनवेलीची बाग, ‘पार तेर’ ह्या फ्रेंच धर्तीवर मांडणी केलेली कर्दळीची बाग, इंग्लिश पद्धतीचा चालत फिरण्यासारखा पार्क, झेन पद्धतीची जपानी बाग, अशा जगातील विविध पद्धतींनी अणुशल्क्ती केंद्राची बाग वैद्यांनी सजवली. त्यांच्यामुळेच भाभा अणुसंशोधन केंद्राचा संपूर्ण परिसर निसर्गाच्या हिरवाईने नटलेला दिसतो.

श्रीपाद द्वारकानाथ वैद्यांनी अणू केंद्राची उद्याने उभारण्याव्यतिरिक्त काश्मीरमधील मुघल गार्डन्सचा अभ्यास केला आणि त्यांची देखभाल कशी करायची याचा सल्ला शेख अब्दुल्ला सरकारला दिला. याशिवाय त्यांनी आरेखन केलेल्या आणखी काही बागा म्हणजे वरळीची नेहरू सेंटरची बाग, पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान, घारापुरी लेण्यांचा परिसर इत्यादी. चित्रकलेच्या जाणकारीमुळे सर होमी भाभांनी त्यांना चित्रनिवड समितीवरही घेतले होते.

वृक्षांचा समग्र अभ्यास करून सौंदर्यदृष्ट्या कोणते वृक्ष कुठे लावावेत ह्यावर त्यांचा कटाक्ष असे. विकासकामात कधी ना कधी वृक्ष काढण्याची वेळ येते. मलबार हिल येथील अशाच एका पर्जन्यवृक्षाबाबत डॉ. भाभांच्या सांगण्यावरून त्यांनी तो जिवंत वृक्ष तेथून स्थलांतरित करून पेडर रोडवरील अणू केंद्राच्या केनिलवर्थ ह्या गृहसंकुलात स्थानापन्न केला. अशा अनेक वृक्षांना वैद्यांनी आपल्या ज्ञानाचा व अनुभवाचा उपयोग करून जीवनदान दिले आहे.

वैद्यांचे स्मरण म्हणून इंडियन सोसायटी ऑफ लॅण्डस्केप आर्किटेक्चर ह्या संस्थेतर्फे त्यांच्या नावाने दर वर्षी एक स्मृतिव्याख्यान आयोजित केले जाते.