"पहिला दिवाळी अंक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: इ.स. १८८५ मध्ये सुरू झालेल्य आणि का.र. मित्र... खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर ! |
(काही फरक नाही)
|
१४:३५, १७ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती
इ.स. १८८५ मध्ये सुरू झालेल्य आणि का.र. मित्र हे संपादक आणि मालक असलेल्या ’मनोरंजन’ मासिकाने मराठीतला पहिला दिवाळी अंक काढला होता.
हल्ली मराठी नियतकालिकांच्या सृष्टीत प्रतिवर्षी दिवाळी अंकांची पर्वणी असते. लेखक, प्रकाशक, संपादक व वाचक, सर्वांचाच उत्साह तेव्हा जणू शिगेला पोचतो; ललित वाङ्मयाच्या अनेक शाखांमधील प्रतिवर्षाच्या स्थितिगतीचे स्वरूप एकदम लक्षात येण्याला वाव मिळतो. ह्या योजनेला ‘मनोरंजन’ने चालना दिली.
‘मनोरंजन’ने आपल्या १९०१ च्या नोव्हेंबरच्या अंकात दिवाळीसंबंधी काही खास लेख घालून आणि अधिक कविता व गोष्टी देऊन दिवाळीनिमित्त आपला पहिला थोडा मोठा अंक काढलेला आढळतो.
असे असले तरी खर्या अर्थाने ‘मनोरंजन’ने १९०९ मध्ये मराठी नियतकालिकांच्या सृष्टीतील खरा पहिला दिवाळी अंक प्रसिद्ध केला. बालकवींची ‘आनंदी आनंद गडे’ चंद्रशेखर यांची ‘कवितारति’ ह्या प्रसिद्ध कविता, वि.सी. गुर्जर ह्यांचे ‘वधूंची अदलाबदल’ हे प्रसिद्ध प्रहसन आणि महाराष्ट्रातील तत्कालिन प्रसिद्ध लेखक, प्रकाशक, वकील, मुत्सद्दी, नट इत्यादींची छायाचित्रे ही ह्या अंकाची काही वैशिष्ट्ये होती.
पुुढील वर्षीच्या म्हणजे १९१० च्या ’मनोरंजन’च्या दिवाळी अंकातील ‘महाराष्ट्राला चिरस्मरणीय' अशा जवळजवळ एकशे-पंधरा ‘विभूतीं’ची दुर्मीळ छायाचित्रे व त्रोटक चरित्रे आणि ‘वधुवरांच्या लग्नाची वयोमर्यादा’ या विषयावरील विद्वानांचा परिसंवाद, हे दोन विशेष लक्षणीय गोष्टी होत्या.
मनोरंजनचे इतर खास अंक
‘मनोरंजन’ने १९१४ साली दिवाळी अंकाबरोबर खास ललित साहित्याला वाहिलेला ‘वसंत’ अंक काढायला सुरुवात केली. ‘मनोरंजन’ने आपल्या पहिल्या ‘वसंत’ अंकात प्रथमच आपल्या सर्व लेखक-लेखिकांची छायाचित्रे दिली होती.
‘मनोरंजन’चा १९११ सालचा अंक ‘दिल्ली दरबार विशेषांक’ होता. त्या अंकात श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा ‘आमचे बैठे खेळ’ हा प्रसिद्ध विनोदी लेख व विठ्ठल सीताराम गुर्जर यांची ‘हरवलेली आंगठी’ ही गोष्ट प्रसिद्ध झाली होती. ‘आमचे महाराष्ट्रीय राजपुरुष’ ही सचित्र चरित्रमाला हे सदर अंकाचे विशेष आकर्षण होते.
ह्या 'खास' अंकांच्या क्षेत्रातील ‘मनोरंजन’ची वाङ्मयाच्या व समाजेतिहासाच्या दृष्टीने उल्लेखनीय कामगिरी म्हणजे त्याने प्रसिद्ध केलेले व्यक्तिविशेषांक : १९१६ साली काढलेला आगरकर खास अंक, १९१८ साली काढलेला महर्षी कर्वे ज्युबिली खास अंक व १९१९ साली काढलेला हरिभाऊ आपटे खास अंक. हे खास अंक पुढे ‘रत्नाकर’, ‘प्रतिभा’, ‘पारिजात’, ‘ज्योत्स्ना’ यांच्या काळात प्रसिद्ध झालेल्या तशा प्रकारच्या अनेक अभ्यसनीय खास अंकांचे अग्रदूत ठरले. त्यातील लेखन मोठ्या आस्थेने जमवलेले व संपादित केलेले आहे. त्यातील बहुमोल लेखांबरोबर त्यातील दुर्मीळ छायाचित्रे व त्यात आगरकर व हरिभाऊ आपटे ह्यांच्या हस्ताक्षरांचे नमुने दिले होते. ‘मनोरंजन’ने व्यक्तिविशेषांकाप्रमाणेच राजकारण, समाजकारण, धर्मकारण, वाङ्मय ह्यांपैकी कोणत्याही क्षेत्रातील एखादी व्यक्ती दिवंगत होताच त्या व्यक्तीच्या निधनाची वार्ता एका अंकात देऊन त्याच्या पुढील अंकात तिच्या कार्याची यथार्थ कल्पना देणारा सचित्र लेख देण्यात कधीच कसूर केली नाही.
न्यायमूर्ती रानडे, नामदार गोखले, दाजी आबाजी खरे ह्यांच्यापासून ते थेट केशवसुत, गडकरी, बालकवी, रेव्हरंड टिळक ह्या वाङ्मयसेवकांपर्यंत सर्वांवर ‘मनोरंजन’मध्ये मृत्युलेख लिहिले गेले आहेत व ते सगळे मृत्युलेख वाचनीय आहेत.