"आंबवडे (भोर)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: पुणे जिलह्यात भोर तालुक्यातील आंबवडे गाव हे वर्षासहलीसाठी एक उत... |
(काही फरक नाही)
|
००:३९, ७ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती
पुणे जिलह्यात भोर तालुक्यातील आंबवडे गाव हे वर्षासहलीसाठी एक उत्तम ठिकाण आहे. आंबवडे हे भोरचे संस्थानिक पंतसचिव यांचे गाव. हे गाव हिरडस मावळत येते. गावाला खेटून एक खळाळता ओढा वाहतो. या ओढ्याच्या काठावर दाट झाडीत शंकराचे एक प्राचीन देऊळ आहे.
पुणे बंगलोर महामार्ग -खेड शिवापूर. -खेड शिवापूर नंतर भोर फाट्याला उजवीकडे वळल्यावर भोर गाव लागते. भोरपासून १० किलोमीटरवर हे आंबवडे गाव आहे. इथपर्यंत येण्यासाठी भोरवरून एसटीची सोय आहे. डोंगरदरीतली ही वाट हिरव्यागार रानांमधून जाते.
झुलता पूल
आंबवडे गावातल्या ओढ्याच्या पलीकडच्या तीरावर दाट झाडी आहे, आणि या झाडीत नागेश्वराचे प्राचीन शिवालय दडले आहे. ओढा ओलांडण्यासाठी 'सर जिजीसाहेब सस्पेन्शन ब्रिज' नावाचा पूल आहे. १९३६ साली या झुलत्या पुलाची उभारणी झाली. याची रुंदी ४ फूट तर लांबी सुमारे दीडशे फूट आहे. पुलाच्या दोन्ही अंगास अर्धवर्तुळाकार कमानी आहेत. कमानीच्या माथ्यावर आणि शेजारी पुलाच्या बांधकामाचे तपशील सांगणारे फलक आहेत.
हा झुलता पूल भोर संस्थानचे राजे श्रीमंत रघुनाथराव शंकरराव पंडित पंतसचिव यांनी आपली आई श्रीमंत जिजीसाहेब पंतसचिव यांच्या स्मरणार्थ बांधला. यासाठी त्या वेळी १० हजार रुपये खर्च आला. १५ नोव्हेंबर १९३७ रोजी मिरजेचे राजे सर गंगाधरराव ऊर्फ बाळासाहेब पटवर्धन यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले.
समाधी आणि पुतळा
पलीकडच्या तीरावर एका मोठ्या इमारतीत मधोमध भोरच्या राजाची, शंकराजी नारायण सचिव यांची समाधी आहे. छत्रपती संभाजीमहाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याच्या सीमांचे रक्षण करण्यात या पंतसचिवांचा मोठा वाटा होता. या समाधीशेजारीच संस्थानच्या राणीसाहेब जिजीसाहेब यांचा शिल्पकार विनायक करमरकर यांनी घडवलेला अर्धपुतळा आहे.
नागेश्वराचे देऊळ
समाधी असलेल्या इमारतीशेजारून हे मंदिर थोडेसे खोलगट भागात आहे. जुन्या मोठाल्या वृक्षांच्या गर्दीतूनच वळणावळणाच्या पायर्या उतरून गेले की नागेेश्वराचे मंदिर येते. मंदिराच्या भोवती फरसबंदी प्रांगण, तट, ओवर्या, पाण्याची कुंडेे व पाण्याचे वाहते प्रवाह आहेत.
पश्चिमाभिमुख असलेले हे मंदिर एका उंच जोत्यावर उभे आहे. मंदिराच्या दर्शनी भागावरच एक लेख लावलेला आहे. लेखामध्येे नागसंस्कृतीतील लोकांचा हा देव असून, या मंदिराचा वेळोवेळी जीर्णोद्धार केल्याचा अल्लेख आहे.
मुखमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. प्रवेशद्वाराभोवती नाजूक शिल्पकाम केलेले आहे. आतील स्तंभही शिल्पकलेने नटलेले आहेत. बाहय़भिंतीवर उमलती कमळे, झाडांच्या पानांचे नक्षीपट उठवण्यात आले आहेत. हत्तीवर अंबारीत स्वार झालेली कुणी राजमान्य व्यक्ती, शरभ, मोर आदी शिल्पांची रचना आहे. शिखरही असेच कोरीव आहे.
आंबवडे गावाला वळसा घालत निघालेला तो ओढा इथे नागेश्वराजवळ एखाद्या धबधब्याप्रमाणे उड्या घेत धावत असतो. मंदिराभोवती पाण्याच्या कुंडांची रचना असल्याने पाण्याचे अनेक प्रवाह मंदिराभोवती खेळते आहेत.