"नारायणभाई देसाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: नारायणभाई महादेवभाई देसाई (जन्म : बलसाड, इ.स. १९२४; मृत्यू : १५ मार्च... खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर ! |
(काही फरक नाही)
|
१४:२५, १८ मार्च २०१५ ची आवृत्ती
नारायणभाई महादेवभाई देसाई (जन्म : बलसाड, इ.स. १९२४; मृत्यू : १५ मार्च, २०१५) हे सार्या जगाला 'गांधी कथाकार' म्हणून ते परिचित होते.
शिक्षण
नारायणभाई देसाई ह्यांचे बालपण साबरमती आश्रम आणि वर्ध्यातील सेवाग्राममध्ये गेले. ते खरे तर शाळेत गेलेच नव्हते. त्या अर्थाने औपचारिक शिक्षण त्यांनी घेतलेच नाही. पण तरीही एका विद्यापीठाचे ते कुलगुरू होते. गुजराथी, हिंदी, इंग्रजी आणि बंगाली अशा चार भाषा त्यांना उत्तम बोलता, वाचता, लिहिता येत होत्या. वडील महादेवभाई देसाई गांधीजींचे स्वीय सचिव आणि अनुदिनी लेखक होते. महादेवभाईंनी नारायणला शिक्षण पुरे, काही करणार असशील तर गांधींवरच कर, असा सल्ला देऊन उमलत्या वयातच त्यांच्यात गांधीवाद रुजवला. त्यामुळे साबरमती आश्रमातच लहानाचे मोठे झालेले नारायणभाई ऊर्फ बाबूभाई शाळेत न जाता आश्रमातले आचारविचार आणि व्ययवहार पाहत आणि अनुभवतच शिकत गेला. गांधीजींची तत्त्वे त्यामुळेच त्यांच्या नसानसांत भिनली आणि त्यांनी ती इतरांपर्यंत पोचवली. नारायणभाई गांधींच्या सान्निध्यातून शिकले आणि त्यांनी इतरांना गांधीवाद शिकवला.
भूदान चळवळ आणि पत्रकारिता
आचार्य विनोबा भावे यांच्या 'भूदान चळवळी'त नारायणभाई सक्रिय सहभागी झाले. संपूर्ण गुजराथ त्यांनी पायी पालथा घातला. त्या राज्याची घेतलेली जबाबदारी त्यांनी उत्तमपणे पार पाडली. श्रीमंतांकडील जमीन भूमिहीनांना देण्यासाठी त्यांनी अनेक जमीनदारांना विनंत्या-आर्जवे केली. याच काळात त्यांनी भूदान चळवळीचे 'भूमिपुत्र' हे मुखपत्र सुरू केले. १९५९ पर्यंत ते त्याचे संपादक म्हणून काम पाहात होते.
ग्रामस्वराज्य आणि अन्य सामाजिक, राजकीय कार्ये
गांधीजींचे ग्रामस्वराज्य त्यांना खुणावत होते आणि त्यामुळे त्याच्या विरोधात जाणार्या प्रत्येक गोष्टीला त्यांनी विरोध केला. अणुऊर्जेला तर त्यांचा विरोध होताच, पण आणीबाणीच्या विरोधातही ते ठामपणे उभे राहिले. जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांतीच्या संकल्पनेने ते भारले गेले. त्यासाठी ते झोकून देऊन काम करत होते.
सत्य आणि अहिंसा या दोन तत्त्वांसाठी ते सर्वशक्तीनिशी वेळोवेळी उभे राहिले. देशात उसळलेल्या जातीय दंगलींच्या वेळी नारायणभाई आणि त्यांचे सहकारी तेथे धावून जात. शहरांतील आणि गावांतील अशा अनेक धार्मिक गटांमध्ये जाऊन त्यांनी भडकलेल्या माथ्यांना गांधी शिकवणीने शांत करण्याचे प्रयत्न केले. त्यात त्यांना यशही आले.
'पीस ब्रिगेड इंटरनॅशनल'ची स्थापना करण्यातही नारायणभाईंचा वाटा होता. 'वॉर रेझिस्टर्स इंटरनॅशनल'चे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. पाकिस्तानसोबतच्या शांतता प्रक्रियेत त्यांचे कार्य मोलाचे ठरले.
शैक्षणिक कार्य
आणीबाणीनंतर ते आपल्या मूळ गावी, वेदछी इथे आले आणि त्यांनी संपूर्ण क्रांतीचे बीज त्या गावात रोवले, गावात ‘संपूर्ण क्रांती विद्यालय’ उभे केले.
गांधी विचारांचा प्रसार करता करता, किंबहुना प्रसार करण्यासाठीच शिक्षण क्षेत्रात नारायणभाई देसाई यांनी स्वतःला गुंतवून ठेवले आणि शेवटपर्यंत ते तिथेच काम करीत राहिले. गांधीजींनी १९२० मध्ये सुरू केलेल्या गुजराथ विद्यापीठाचे काम ते करत असत. २३ जुलै २००७ पासून ते त्याच विद्यापीठाचे कुलगुरू झाले. नोव्हेंबर २०१४मध्ये त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला.
गांधी कथाकार
जगण्याची मूलभूत आणि मानवी तत्त्वे जितकी कोवळ्या वयात मुलांपर्यंत पोहोचतील, तितकी ती त्यांच्यात अधिक रुजतील, अशी नारायणभाईंची धारणा होती आणि त्या दृष्टीने लहान मुले आणि तरुण यांच्यासाठी त्यांनी पुस्तके, व्याख्याने यांपासून ते गांधी कथा, अशा वेगवेगळ्या माध्यमांतून महात्मा गांधी पोचवले.
गुजराथमध्ये २००२मध्ये दंगल झाली. त्यामुळे नारायणभाई खूप अस्वस्थ झाले. त्यांनी गांधी कथेच्या रूपात महात्मा गांधी आणले. वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये गांधी कथेचे प्रयोग त्यांनी केले. त्यांत गाणी होती, लोकांना जीवनात भेडसावणार्या समस्या मांडलेल्या होत्या. देशभर त्यांनी त्याचे प्रयोग केलेच, पण पार मेक्सिको, अमेरिका इथपर्यंत त्यांनी गांधी कथा पोचवली.
२००४ सालापासून नारायणभाईंनी विविध देशांत जाऊन गांधीजींविषयी ११८ व्याख्याने दिली. नव्या पिढीला गांधी स्वतःच्या भाषेत समजावून सांगण्याच्या हातोटीमुळे ते लोकप्रिय होते.
लेखन
नारायणभाईंना ज्या चार भाषा येत होत्या, त्या नुसत्या लिहिण्या-वाचण्यापुरत्या नाहीत, तर या भाषांत त्यांनी साहित्य निर्माण केले. ्त्यांनी चार खंडांत तीन हजार पानांचे गांधीजींचे चरित्र गुजराथीत लिहिले. त्याचे अनेक भाषांत अनुवाद झाले. या चरित्रासह त्यांच्या इतरही अनेक पुस्तकांना पुरस्कार मिळाले.
नारायणभाई गुजराथी साहित्य परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांनी कस्तुरबांच्या जीवनावर इंग्रजीत एक नाटक लिहिले होते. अमेरिकेत अदिती देसाई यांचा थिएटर ग्रुप त्याचे प्रयोग करत असे.
नारायणभाई देसाई यांनी लिहिलेल्या ’अज्ञात गांधी’ नावाच्या पुस्तकाचे सुरेशचंद्र वारघडे यांनी मराठीत भाषांतर केले आहे.
पुरस्कार
नारायणभाई देसाई यांच्या शांतता आणि अहिंसेसाठीच्या कार्यासाठी त्यांना 'युनेस्को'चा मदनजितसिंग पुरस्कार मिळाला.