Jump to content

विकिपीडिया:मासिक सदर/मे २०११

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कॉरल समुद्रातील लढाईतील कारवाया

कॉरल समुद्राची लढाई दुसर्‍या महायुद्धादरम्यान कॉरल समुद्रात लढली गेलेली आरमारी लढाई होती.

मे ४-८, इ.स. १९४२ दरम्यान झालेली ही लढाई जपानी आरमार व अमेरिका व ऑस्ट्रेलियाच्या आरमारांत लढली गेली. दोन्हीपक्षांकडून विमानवाहू नौकांचा वापर झालेली ही पहिलीच लढाई होती. तसेच या लढाई दरम्यान दोन्हीकडील नौकांनी शत्रूच्या नौका दृष्टिआड असताना त्यांच्यावर मारा केला.

आपल्या साम्राज्याची दक्षिण प्रशांत महासागरातील बचावात्मक आघाडी पक्की करण्यासाठी जपानी आरमाराने न्यू गिनीचे पोर्ट मोरेस्बी तसेच सोलोमन द्वीपांतील तुलागीवर हल्ला चढवून बळकावण्याचा घाट घातला होता. ऑपरेशन मो या नावाने शीगेयोशी इनोऊच्या नेतृत्त्वाखाली सुरू झालेल्या या मोहीमेत जपानी आरमारातील मोठ्या नौका सहभागी झाल्या. यात तीन विमानवाहू नौका व त्यांवरील विमानांचाही समावेश होता. अमेरिकेला या मोहीमेची खबर पकडलेल्या बिनतारी संदेशांतून कळली व जपानी आरमाराचे पारिपत्य करण्यासाठी त्यांनी फ्रँक जॅक फ्लेचरच्या नेतृत्त्वाखाली आपले दोन टास्क फोर्स तसेच एक ऑस्ट्रेलियन-अमेरिकन क्रुझर फोर्स धाडले.

३ मे आणि ४ मे दरम्यान हल्ला करुन जपानी सैन्याने तुलागीवर ताबा मिळवला. या दरम्यान अमेरिकेच्या यु.एस.एस. यॉर्कटाउन या नौकेवरील विमानांनी त्यांची अनेक छोटी जहाजे बुडवली. यामुळे जपान्यांना तेथील परिसरात असलेल्या अमेरिकेचा बळाचा अंदाज आला व त्यांनी आपल्याही विमानवाहू नौका रणांगणात उतरवल्या. ७ मेपासून दोन्हीकडील विमानवाहू नौकांवरील विमानांनी एकमेकांवर हल्ले सुरू केले. यात पहिल्याच दिवशी जपानचे शोहो हे छोटे विमानवाहू जहाज बुडले तर अमेरिकेने एक विनाशिका गमावली आणि एक तेलपूरक नौकेचे मोठे नुकसान झाले. या नौकेला नंतर जलसमाधी देण्यात आली. दुसर्‍या दिवशी जपानची शोकाकु ही विवानौकेला मोठे नुकसान पोचले तर अमेरिकेने आपली बुडत चाललेली यु.एस.एस. लेक्झिंग्टन या विवानौकेला जलसमाधी दिली. असे दोन्हीकडील आरमारांचे अतोनात नुकसान झाल्याने दोघांनी माघार घेतली व कॉरल समुद्रातून काढता पाय घेतला. विवानौकांवरील विमानांचे रक्षाकवच नाहीसे झाल्याने अ‍ॅडमिरल इनोउने पोर्ट मोरेस्बीवर चालून जाणार्‍या जपानी सैन्याला परत बोलावून घेतले व ही चढाई त्याने पुढे ढकलली.

गमावलेल्या नौका व सैनिक पाहता या लढाईत जपानचा जय झाला असला तरी व्यूहात्मक दृष्ट्या हा दोस्त राष्ट्रांसाठी विजयच ठरला. तोपर्यंतच्या जपानच्या बेधडक आगेकूचला येथे पहिली खीळ बसली. या लढाईत जखमी झालेल्या शोकाकु आणि आपली बहुसंख्य विमाने गमावलेली झुइकाकु या विवानौका यानंतर महिन्याभरात घडलेल्या मिडवेच्या लढाईत भाग घेऊ शकल्या नाहीत व त्यामुळे जपानचे दोस्त राष्ट्रांविरुद्धचे तोपर्यंत वरचढ असलेले पारडे तेथे समतोल झाले. तत्कारणी अमेरिकेच्या आरमाराला मिडवेच्या लढाईत विजय मिळवणे सोपे झाले. याचा फायदा घेत दोस्त राष्ट्रांनी दोन महिन्यांत ग्वादालकॅनाल आणि न्यू गिनीवर हल्ला केला. कॉरल समुद्रातील पीछेहाटीमुळे जपानला दोस्त राष्ट्रांच्या या आक्रमक हालचालीविरुद्ध जोरदार पावले उचलता आली नाहीत आणि येथून त्यांची पूर्ण दक्षिण प्रशांत महासागरातील रणांगणात पीछेहाट सुरू झाली. पुढे वाचा...