विकिपीडिया:तमिळनाडू/मुख्यलेख
"तमिळनाडु" (लिहिण्याची पद्धत) तमिळनाड् (स्थानिक उच्चार) (तमिळः தமிழ்நாடு) अर्थ: "तमिळ लोकांचे राष्ट्र") हे भारतातील २८ राज्यांपैकी एक राज्य आहे.चेन्नै (पूर्वीचे नाव:मद्रास) हे सर्वात मोठे शहर तसेच राज्याची राजधानी आहे. तमिळनाडु भारताच्या सर्वात दक्षिणटोकावरील द्वीपकल्पावर वसले आहे. पश्चिमेस केरळ ,वायव्येला कर्नाटक,दक्षिणेस हिंदी महासागर व श्रीलंका,पूर्वेस बंगालचा उपसागर,तसेच केंद्रशासित प्रदेश पॉन्डिचरी (पुदुच्चेरी) आणि उत्तरेस आंध्रप्रदेश अशा त्याच्या चतु:सीमा आहेत. राज्याच्या वायव्येस निलगिरी पर्वतरांगा,अण्णामालै टेकड्या, पश्चिमेस पालक्काड, तर उत्तरेस पूर्वेघाट आणि पूर्वदिशेला असलेला बंगालचा उपसागर दक्षिणेस पाल्कची समुद्रधुनी ओलांडून हिंदी महासागरात मिसळतो. दक्षिणेकडील टोकावर असणार्या कन्याकुमारी ह्या प्रसिद्ध पर्यटनक्षेत्री तीन समुद्र एकमेकांत मिसळतानाचे दृश्य पहावयास मिळते. क्षेत्रफळाच्या दृष्टीने तमिळनाडुचा भारतात अकरावा क्रमांक लागतो तर लोकसंख्येनुसार सातवा क्रमांक लागतो. तमिळनाडु हे भारतातील सर्वात मोठे शहरीकरण झालेले राज्य आहे, तसेच भारताच्या औद्योगिक विकास दरात (जी.डी.पी.) त्याचे पाचव्या क्रमांकाचे स्थान आहे. भारतातील सर्वाधिक उद्योगधंदे व त्यांची कार्यालये(१०.५६ टक्के)असणारे राज्य म्हणून तमिळनाडुचा प्रथम क्रमांक लागतो. त्यामानाने देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी फक्त ६ टक्के लोक तमिळनाडूत राहतात.सर्वांगीण विकासात तमिळनाडु हे भारतातील एक अग्रगण्य राज्य म्हणून ओळखले जाते.