वावडिंग
वनस्पतिशास्त्रीय नाव: Embelia ribes कुळ:Myrsinaceae
नाम:- (सं.) विडंग; (हिं.) बबेरंग, बाबरंग; (पं.) बब्रुंग; (नेपाळ) हिमळचेरी; (गु.) वावडींग; (क.) वायुविलंग; (ता.) वायुविळगम्; (सिंगाली) उंबेलिअ; (मुंबई) कर्कनी, वायवरंग, वायमिरी.
वर्णन:- वावडिंगाचा खूप लांब असा वेल असतो. दुसऱ्या झाडाभोवती विळखे घातल्याने वेलाची जाळी तयार होते.वेलाचे खोड सडपातळ पण खरखरीत असून त्यास पुष्कळ गाठी असतात. पाने दोन्ही टोकास निमुळती, फुले पांढरी व मोठाल्या तुऱ्यातुऱ्यांनी येतात; फळे मिऱ्यापेक्षां लहान असून त्यांचे गुच्छ असतात. वावडिंगे मिऱ्यांसारखी वा कबाबचिनीसारखी दिसतात. फळास देठासकट पांच पट्ट्यांचे एक पुष्पपात्र चिकटलेले असते व टोकाकडे लहान काटा असतो. रंग तांबूस उदी असून फळावर उभे पट्टे असतात. फळ जुने झाले की काळे पडते. फळ फोडल्यास आंत भुरकट लाल रंगाचा पुष्कळ मगज असतो व एक बी असते.
रसशास्त्र:- वावडिंग रूचकर पण जरासे कडवट आणि तुरट असते, त्यांत त्याच्या वजनाच्या अडीच टक्के असे एक अम्लधर्मी द्रव्य (Embelic acid एम्बेलिक् ऍसिड्= विडंगाम्ल) असते.
गुण:- वावडिंग हे उष्ण, दीपक, पाचक, जरासे आनुलोमिक व मूत्रजनक, उत्तम कृमिघ्न, वायुहर, बळ देणारे,विशेषतः, मेंदू व मज्जातंतूस ्शक्ती देणारे, रक्तशोधक रसायन आहे. ह्याने लघवीचा रंग लाल होतो व त्यांतील अम्लता वाढते. वावडिंगाची क्रिया शरीरांतील सर्व ग्रंथींवर, मुख्यत्वे रसग्रंथींवर होत असते. त्यामुळे सर्व जीवनविनिमयक्रियेस उतेजना मिळते. मात्रा:- १/२ ते १ तोळा. लहान मुलास १ ते २ वाल. मात्रा कमीजास्त झाल्यास हरकत नाही. कारण हे निरूपद्रवी औषध आहे. हे घेत असतां पथ्य करण्याची जरूर पडत नाही.
उपयोग:
- मनुष्याचे शरीरावर वावडिंग विलक्षण गुणकारी आहे. वावडिंग घेणाऱ्याला भूक लागते, अन्न पचते, शौचास साफ होते, वजन वाढते, त्वचेचा रंग सुधारतो, शरीर तेजःपुंज दिसते व मनास आल्हाद वाटतो.
- लहान मुलांच्या रोगांत तर हे दिव्य औषध आहे. मुले सुद्दढ राहण्यास अखंड वावडिंग दुधांत उकडतात व ते दूध देतात.
- आंकडी, फेफरें, अर्धांगवायु वगैरे मेंदू व मज्जातंतूच्या रोगांत वावडिंग लसणाबरोबर दुधांत उकडून, ते दूध देतात.
- त्वचारोगांत वावडिंग पोटात देतात व त्याचा लेप करतात. कधी धुरीहि देतात.
- तऱ्हेतऱ्हेचे कुष्ठरोग अन्न नीट पचन न झाल्यामुळे उद्भवतात. वावडिंगाने पचनक्रिया सुधारल्यामुळे व शौचास साफ झाल्यामुळे कुष्ठ बरे होतात आणि शिवाय वावडिंगाची त्वचेवर थोडीबहुत उत्तेजक क्रियाहि होत असते.
- हे फार मौल्यवान कृमिघ्न आहे. ह्या औषधाने कृमी मरून पडतात[१]
संदर्भ
[संपादन]- ^ ओषधीसंग्रह्- डॉ. वामन गणेश देसाई