वामन पात्रीकर
प्रा. वामन सदाशिव पात्रीकर (जन्म : २८ डिसेंबर १९३६; - १९ एप्रिल २००३) हे मराठीतले कथा-कादंबरीकार आणि मुलांसाठी नाटके लिहिणारे नाटककार होते.
वामन पात्रीकर हे नागपूरला आणि नंतर मुंबईत सरकारी तंत्रनिकेतन विद्यालयात स्थापत्य अभियांत्रिकीचे प्राध्यापक होते. मराठी लिखाणाची आवड असल्याने ते दररोज काहीना काही ललित लेखन करत. ’सत्यकथा’, ’किर्लोस्कर’ या मासिकांमधून आणि ’महाराष्ट्र टाइम्स’, ’लोकसत्ता’ या दैनिकांतून त्यांचे लिखाण प्रसिद्ध होत असे. हिंदी भाषेतील ’धर्मयुग’ आणि ’कादंबिनी’ या नियतकालिकांतही त्यांच्या कथा प्रकाशित झाल्या आहेत. ते अगदी सोपी, छोटी आणि अर्थपूर्ण वाक्ये लिहीत. त्यांच्या लेखनशैलीची विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, माधव गडकरी आणि गोविंद तळवलकर सारखे लेखक प्रशंसा करीत. पात्रीकरांचे ’विश्वातील विश्वे’ हे पुस्तक त्याकाळचे उत्तम खपाचे पुस्तक होते.
व्यक्तिमत्त्व
[संपादन]वामन पात्रीकर अत्यंत सुस्वभावी होते. आयुष्यात आलेल्या मानसिक आणि कौटुंबिक समस्या घेऊन लोक त्यांच्याकडे येत, त्यांचे विचार ऐकून समाधानाने परत जात. लोकांना उत्साही कसे करावे आणि त्यांच्यातील प्रेरणा कशी जागवावी याची त्यांना उत्तम जाण होती. मराठी लोकांनी नुसत्या नोकऱ्या करण्यात रममाण होण्यापेक्षा स्वतंत्र व्यवसायाभिमुख व्हावे असा त्यांचा सल्ला असे.
वामन पात्रीकरांचे चिरंजीव विनोद पात्रीकर, हे मुंबईतील Crescent Engineers नावाच्या बांधकाम सल्लागार कंपनीचे मालक आहेत.
निधन
[संपादन]वामन पात्रीकर हे मुंबईच्या लीलावती रुग्णालयात, त्यांच्या हृदयावरील शस्त्रक्रियेदरम्यान काही विपरीत घडल्यामुळे १९ एप्रिल २००३ रोजी निर्वतले.
पुरस्कार
[संपादन]- वामन पात्रीकरांच्या ’कलंदर बिलंदर’ला उत्कृष्ट बालनाट्यलेखनाचा नाट्यदर्पण पुरस्कार (१९८२)
- त्यांच्या ’जगबुडी’ कादंबरीला अनेक पुरस्कार मिळाले.
- ’सखाराम शिंपी’ला महाराष्ट्र सरकारचा बालवाङ्मयाचा पुरस्कार.
वामन पात्रीकर यांनी लिहिलेली पुस्तके
[संपादन]- अश्विनी (रूपांतरित; मूळ लेखक : ॲलेक्झेव्ह मिखाईल) (१९८३)
- कर्णजन्म
- कलंदर बिलंदर (बालनाट्य)
- काऊ काऊ दार उघड (बालनाट्य)
- किक (१९७७)
- जगबुडी (कादंबरी-१९८९))
- जयपाल आणि जादूगार (बालवाङ्मय-१९७९)
- जादुगार तीन दोन एक..(बालवाङ्मय)
- देव तारी त्याला...(बालवाङ्मय-१९७८)
- नदीकाठची चक्की
- नाटक पीडितों के लिये (हिंदी)
- फर्स्ट क्लास फर्स्ट (सहा व्यंगांकिका-१९९८)
- बाजारपेठ (एकांकिका)
- रंजक कथा, भाग १ ते ५ (बालवाङ्मय-१९९२)
- रुद्रवर्षा (कादंबरी-२००५)
- विश्वातील विश्वे (कथासंग्रह-१९९६))
- सखाराम शिंपी (बालनाट्य) (१९७८)
- सूर्यविलाप आणि इतर एकांकिका (१९७९)
- हिरव्या जगातला पिवळा वाघ (बालवाङ्मय-१९९३)
संदर्भ
[संपादन]विनोद पात्रीकरांचा लेख Archived 2013-08-26 at the Wayback Machine.