वर्ग:भारतीय व्यंगचित्रकार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
 राजेंद्र सरग हे एक हास्‍यव्‍यंगचित्रकार म्‍हणून ओळखले जातात. चिंतन आदेशसह अनेक दिवाळी अंकांमध्‍ये त्‍यांची विनोदी व्‍यंगचित्रे प्रसिध्‍द होतात. पण ते केवळ विनोदीच व्‍यंगचित्रे रेखाटत नाहीत तर गंभीर व्‍यंगचित्रेही रेखाटतात. मृत्‍यू आणि वृध्‍दाश्रम या विषयावरील त्‍यांची तीनशेहून अधिक व्‍यंगचित्रे आहेत. ‘मृत्‍यू माझा सखा’ या मासिकांत तसेच लोकसत्‍ताच्‍या ‘हास्‍यरंग’ पुरवणीत या विषयावरील काही व्‍यंगचित्रे प्रसिध्‍द झाली आहेत. दिवाळी हा आनंदाचा सण असतो. या काळात ‘मृत्‍यू’ या सारख्‍या गंभीर विषयावर व्‍यंगचित्रे प्रसिध्‍द करण्‍यास नकार देणारे संपादक आहेत. मात्र ‘चिंतन आदेश’ने ‘अखेरचा प्रवास- चिरनिद्रा’ या विषयावर विशेषांक प्रसिध्‍द करण्‍याचा केलेला प्रयत्‍न निश्‍चितच स्‍वागतार्ह आहे. 
      मृत्‍यू अटळ असतो. मृत्‍यू ही नैसर्गिक घटना आहे. जीवनाचा प्रवास प्रत्‍येक जण करीत असतो. तो कुठे, कधी संपणार आहे, हे मात्र कोणीच सांगू शकत नाही. त्‍यामुळे येणारा प्रत्‍येक दिवस आनंदाने जगणे, एवढेच आपल्‍या हाती असते. जे यात यशस्‍वी होतात, त्‍यांनाच ‘जीवन कळले हो’, असे म्‍हणता येऊ शकते. जन्‍म-मृत्‍यू, आत्‍मा-परमात्‍मा, पाप-पुण्‍य, देव-दानव, स्‍वर्ग-नरक, भूत-हडळ, पुनर्जन्‍म-मोक्ष याबाबत प्रत्‍येक धर्माची विचारधारा आहे. या विचारधारेला धक्‍का न लागू देता, कोणाच्‍या भावना न दुखावता राजेंद्र सरग यांनी रेखाटलेली व्‍यंगचित्रे कधी कधी हसवून जातात तर कधी गंभीर करुन जातात. व्‍यंगचित्रे केवळ करमणूकच करत नाहीत तर जीवनविषयक तत्‍वज्ञानही शिकवून जातात, या उक्‍तीचा प्रत्‍यय अशी व्‍यंगचित्रे पाहिल्‍यावर येतो. (चित्र क्रमांक 1) बागेत बसलेले दोन ज्‍येष्‍ठ नागरिक जीवन-मृत्‍यू या विषयावर चर्चा करत आहेत. त्‍यातील एक जण म्‍हणतो, ‘अमर झालो तर जगण्‍यात काही अर्थच उरणार नाही’. या एका वाक्‍यातच जीवन का जगावे, याचा संदेश मिळतो. मानव अमर झाला तर त्‍याला कशाचीच भीती उरणार नाही. अशा परिस्‍थितीत तो स्‍वैरपणे वागणार. दुस-यांच्‍या सुख-दु:खाचा अजिबात विचार करणार नाही. मृत्‍यूच्‍या भीतीने सध्‍या काहीका असेना सत्‍य, सदाचार, सद्भावना, माणुसकी, समभाव यांचा जीवनात अंगिकार केला जातोय. जीवनाचे मोल हे मृत्‍यूमुळेच कळतेय. अन्‍यथा बेजबाबदारपणा आणि त्‍यातून येणारी आपत्‍ती यांना पारावार राहिला नसता. अमर नसणे म्‍हणजेच मृत्‍यूचे स्‍मरण आणि हेच स्‍मरण जीवनाची सार्थकता कशात आहे, याची जाणीव करुन देत असते.
      प्रसारमाध्‍यमांशी संबंधित असल्‍याने राजेंद्र सरग यांनी या क्षेत्रातील अलिखीत नियम, शोकसंदेश छापून येण्‍यासाठी आग्रह धरणा-या मोठ्या व्‍यक्‍ती यांच्‍यावरही व्‍यंगचित्रे रेखाटली आहेत. ज्‍या माहितीविषयी खात्री नसते, तिची बातमी देतांना ‘कळते’, ‘समजते’, ‘अशी चर्चाआहे’ अशा शब्‍दांचा आधार घेतल्‍या जातो. पण (चित्र क्रमांक 2)मधील वार्ताहर एका पुढा-याची अंत्‍ययात्रा कव्‍हर करण्‍यासाठी गेला. पण पुढारी खरे वागत नसल्‍याचा अनुभव असल्‍यामुळे वार्ताहर बातमी देतांना तशी ‘रिस्‍क’ घेत नाही. न जाणो मेलेला पुढारी जिवंत झाला तर..
      एखाद्या मोठ्या व्‍यक्‍तीच्‍या अंत्‍ययात्रेत अथवा श्रध्‍दांजली सभेत वार्ताहर दिसल्‍यावर त्‍याला नमस्‍कार करणारे, त्‍याची ख्‍याली-खुशाली विचारणारे अनेक जण भेटतात. या मागचा मूळ हेतू बातमी आपले नाव प्रसिध्‍द व्‍हावे, हाच असतो. काही जण हळूच त्‍याच्‍या हातात आपल्‍या शोकसंदेशाचा कागद ठेवतात. ‘येनकेन प्रकारे’ प्रसिध्‍दीचा हव्‍यास असणा-या अशा व्‍यक्‍तींचा समाचारही व्‍यंगचित्रांतून घेतलेला दिसतो.(चित्र क्रमांक 3 व 4)
      सध्‍या ‘ब्रेकींग न्‍यूज’ चा जमाना आहे. एक मोठी व्‍यक्‍ती आयसीयूमध्‍ये भरती आहे. तिचे कधी निधन होईल, हे सांगता येत नाही. अशा वेळी टीव्‍ही चॅनेलचा एक बातमीदार लक्ष ठेवून आहे. पण ही गोष्‍ट त्‍या मोठ्या व्‍यक्‍तीच्‍या लक्षात आलेली आहे. म्‍हणूनच तो बातमीदाराला खडसावतो. ‘दहा-दहा मिनिटांनी काय डोकावून पहातोस रे... जिवंत आहे मी अजून’ (चित्र क्रमांक 5)
      मोठ-मोठे बॅनर्स, होर्डींग्‍ज लावून स्‍वत:ची प्रसिध्‍दी करणारे अनेक महाभाग आहेत. ज्‍याची जितकी जास्‍त होर्डींग्‍ज तितकी ती व्‍यक्‍ती मोठी, असा एक समजच निर्माण झालेला आहे. या रागातून आपल्‍या कुत्र्याच्‍या वाढदिवसाचे होर्डींग लावून निषेध करणारेही आपल्‍या दिसतात. ज्‍या गावात दौरा असेल तेथे स्‍वागताची होर्डींग्‍ज लागलीच पाहिजेत, यावर या नेत्‍याचा कटाक्ष असायचा. त्‍याचे निधन झाल्‍यावर आपल्‍या नेत्‍याला असलेली होर्डींग्‍जची हौस लक्षात घेऊनच त्‍याच्‍या कार्यकर्त्‍याने अमरधाम स्‍मशानभूमीजवळ असेच होर्डींग लावले. निधन पावलेल्‍या आपल्‍या नेत्‍याचे अमरधामजवळ स्‍वागत करणारे बॅनर लावणारा कार्यकर्ता थोरच म्‍हणायला हवा. (चित्र क्रमांक 6)
      डॉक्‍टर म्‍हणजे देवाचेच रुप. रुग्णाला मृत्‍यूच्‍या दाढेतून परत आणणारा देवदूतच. आज-काल कटप्रॅक्‍टीस मुळे सेवाभाव असणारा हा पेशा बदनाम होत आहे. अर्थात याला काही अपवाद आहेत. नवीन कार्याची सुरुवात आपण मिठाई, पेढे वाटून करत असतो. तशीच काहीशी परिस्‍थिती या नवीनच प्रॅक्‍टीस सुरु केलेल्‍या डॉक्‍टरची झालेली आहे. त्‍याच्‍या ऑपरेशनचा पहिलाच दिवस अन् पहिलाच पेशंट. दुर्दैवाने जे व्‍हायला नको होते ते झाले. पेशंट दगावला. पण सकारात्‍मक विचारांच्‍या नवख्‍या डॉक्‍टराने ती वेळही साजरी केली. (चित्र क्रमांक 7)
      आज प्रत्‍येकजण सुखाच्‍या शोधात आहे. आपापल्‍या पध्‍दतीने जो-तो असे मार्ग शोधतो. काही जण सत्‍संगाच्‍या मार्गाने जातात. अशाच एका बुवाम्‍हाराजांनी आपल्‍या भक्‍तांना उपदेश केलेला आहे. (चित्र क्रमांक 8)
      प्‍लँचेट म्‍हणजे मृत आत्‍म्‍याशी संवाद साधणे. हा अनुभव किती खरा, किती खोटा हे माहीत नाही. पण हे जर खरे असेल तर खूप काही गमती-जमती होऊ शकतात. यावरही राजेंद्र सरग यांनी व्‍यंगचित्रे रेखाटली आहेत. पतीच्‍या निधनामुळे विरह सहन न झालेली पत्‍नी प्‍लँचेटद्वारे त्‍याला पाचारण करते. हे पाहून त्‍याची पाचावर धारण बसते. जिवंत असतांना सुखात राहू दिलं नाही, आत्‍ता मेल्‍यानंतरही सुखात राहू देत नाही, अशीच त्‍या बिचा-या नव-याची भावना दिसतेय. (चित्र क्रमांक 9)
      स्‍वप्रतिमा अर्थात ‘सेल्‍फी’ ने अनेकांना वेड लावले आहे. हे वेड जीवघेणे ठरत आहे, तरीही त्‍याबाबत कोणीही जागरुक नाही. मनोविकार तज्‍ज्ञांनी या अतिरेकीपणाला ‘मानसिक आजार’ ठरवला आहे. (चित्र क्रमांक 10) ‘सेल्‍फी’ कुठं काढावी, याचे भान नसलेला हा तरुण आजच्‍या तरुणाईचे प्रतीकच ठरतो.
      वृध्‍दाश्रम आणि तिथले सदस्‍य यावरही राजेंद्र सरग यांनी व्‍यंगचित्रे काढली आहेत. मात्र या विषयावरील एकही व्‍यंगचित्र हसवत नाही. आजच्‍या समाजव्‍यवस्‍थेवर, कुटुंबव्‍यवस्‍थेवर कठोर टीका करणारी ही व्‍यंगचित्रे पाहिल्‍यावर डोळ्यांच्‍या कडा पाणावल्‍याशिवाय रहात नाही. धकाधकीच्‍या जीवनात जन्‍मदात्‍या आई-वडिलांकडे लक्ष न देऊ शकणारे मुले, त्‍यांना वृध्‍दाश्रमात पाठविणारे मुले, मातृत्‍व दिनी केवळ फोन करणारे असे अनेक प्रसंग सभोवताली पहावयास मिळतात. हाताचा पाळणा करुन वाढविलेला मुलगा आपल्‍या वृध्‍द आई-वडिलांना सांभाळू शकत नाही. त्‍यांच्‍या अंत्‍यसंस्‍कारालाही येऊ शकत नाही, असे अनेक विदारक प्रसंग त्‍यांनी चित्रबध्‍द केले आहेत. (चित्र क्रमांक 15) अशीच एक वृध्‍द माता.. ‘शेवटपर्यंत मुलाची वाट पहात होती... त्‍यामुळे मरतांना तिचे डोळे उघडेच होते..’ हे व्‍यंगचित्र पाहिल्‍यावर कोणत्‍याही माणसाचे काळीज गलबलल्‍याशिवाय राहत नाही.

कल्‍पना सरग -मार्कंडेय

दिशा संकुल- बी-9, रिलायन्‍स मार्केट शेजारी, जवाहर पोलीस स्‍टेशनजवळ, गारखेडा परिसर, ता. जि. औरंगाबाद 431005

"भारतीय व्यंगचित्रकार" वर्गातील लेख

या वर्गात फक्त खालील लेख आहे.