वर्ग:व्यंगचित्रकार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अप्रतिम रेखाटनासह मार्मिक भाष्‍याचा पुरेपूर वापर करणारे रवींद्र बाळापुरे

      रवींद्र बाळापुरे हे नाव मराठी व्‍यंगचित्रकारितेच्‍या क्षेत्रात गेल्‍या 30-32 वर्षांपासून गाजत आहे. विविध दिवाळी अंक, नियतकालिके आणि दैनिकांतून त्‍यांनी आपल्‍या व्‍यंगचित्रांच्‍या माध्‍यमातून मनोरंजन आणि प्रबोधनही केले आहे. सुंदर रेखाटन आणि त्‍याला समर्पक, मार्मिक टीपणी याच्‍या जोरावर त्‍यांनी व्‍यंगचित्रक्षेत्रात स्‍वत:चे एक वेगळे स्‍थान निर्माण केले आहे. शब्‍दविहीन चित्रे ही तर त्‍यांची खासियतच. मराठी व्‍यंगचित्रक्षेत्रात केवळ रेखाटनांवरच गाजलेले अथवा केवळ मार्मिक, चपखल कोपरखळींवर गाजलेले अनेक व्‍यंगचित्रकार आहेत. रवींद्र बाळापुरेंमध्‍ये मात्र या दोहोंचा अप्रतिम संगम झालेला पहावयास मिळतो. आकर्षक रेखाटन, एखादा विषय घेऊन त्‍याचा विस्‍तार करण्‍याची त्‍यांची हातोटी कौतुकास्‍पद आणि अभिनंदनीयच.
      रवींद्र बाळापुरे यांची ‘विनोदी स्‍ट्रेचर’, ‘हसरे स्‍ट्रेचर’, ‘रंगोत्‍सव’, ‘रंगीला रंगोत्‍सव’ आणि ‘हसरी शिवार वाणी’ ही व्‍यंगचित्रांचा संग्रह असलेली पुस्‍तके वाचण्‍यात आली. प्रत्‍येक पुस्‍तकात 25 हून अधिक एकसे बढकर एक हास्‍य-व्‍यंगचित्रे आहेत. ‘विनोदी स्‍ट्रेचर’ व ‘हसरे स्‍ट्रेचर’ मध्‍ये शब्‍दविहीन व्‍यंगचित्रे धमाल उडवून देतात. होळी, धुळवड, रंगपंचमीच्‍या निमित्‍ताने रेखाटलेली, त्‍या माहौलला जिवंत करणारी ‘रंगोत्‍सव’ व ‘रंगीला रंगोत्‍सव’ मधील व्‍यंगचित्रेही तशीच झक्कास. ते ज्‍या क्षेत्रात कार्यरत आहेत, त्‍यातील अनुभवांवर, आढळलेल्‍या विसंगतीवरही त्‍यांनी तटस्‍थपणे व्‍यंगचित्रे रेखाटली आहेत. ‘हसरी शिवार वाणी’ मध्‍ये त्‍याचा पानोपानी प्रत्‍यय येतो. अमरावतीच्‍या मेधा पब्‍लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेली ही पंचरंगी पुस्‍तके वाचकांना निखळ हास्यानंद देतात.
      हजार शब्‍द जे सांगू शकणार नाही ते एक व्‍यंगचित्र सांगून जाते, असे म्‍हणतात. ते चुकीचे नाही. या पुस्‍तकांतील प्रत्‍येक व्‍यंगचित्र हा लेखाचा स्‍वतंत्र विषय होऊ शकतो. इतकी ती आशयपूर्ण आहेत. त्‍यांच्‍या काही व्‍यंगचित्रांत सामाजिक वास्‍तवाचे प्रतिबिंब उमटलेले दिसते तर काही व्‍यंगचित्रांत वास्‍तवाचा अतिशयोक्‍तपूर्ण विस्‍तार केलेला आढळून येतो. आपल्‍या दैनंदिन जीवनात घडणारे, घडू शकणारे प्रसंग व्‍यंगचित्ररुपाने समोर आल्‍यावर खुदकन हसू फुटल्‍याशिवाय राहत नाही. त्‍यांचे प्रत्‍येक व्‍यंगचित्र प्रत्‍यक्षपणे-अप्रत्‍यक्षपणे काहीतरी सांगण्‍याचा प्रयत्‍न करते आणि विशेष म्‍हणजे वाचकांच्‍या मनाला ते भिडते..अनेकदा ते हसवते.. क्‍वचित प्रसंगी विचार करायला लावते. केवळ मनोरंजनच न करता वाचकाला अंतर्मुख करण्‍याचा व्‍यंगचित्रकाराचा गुण असतोच, रवींद्र बाळापुरे त्‍याला अपवाद कसे असतील ?
      प्रत्‍येक माणूस कधी ना कधी आजारी पडतोच. रुग्‍णाला, जखमीला रुग्‍णालयात नेण्‍यासाठी स्‍ट्रेचरचा वापर केला जातो. ही तशी म्‍हटले तर साधी कल्‍पना. पण बाळापुरेंनी त्‍या कल्‍पनेचा केलेला विस्‍तार पाहिल्‍यावर वाचक थक्‍क झाल्‍याशिवाय राहत नाही. जखमी, जादूगार, अतिरेकी, वेडा, नेता, क्रिकेटपटू, चोर, खिसेकापू, मुष्‍टीयोद्धा, साधू, राजा, भूतकथा वाचणारा वाचक अशी अनेकविध पात्रे कल्‍पून त्‍यांनी धमाल नि:शब्‍द व्‍यंगचित्रे रेखाटली आहेत.
      ‘रंगोत्‍सव’ व ‘रंगीला रंगोत्‍सव’ मधील व्‍यंगचित्रे शृंगाररसाने भरलेली आहेत. अजिबात अश्‍लीलता जाणवणार नाही, याची त्‍यांनी काळजी घेतलेली आहे. तोंड काळे करणे, रंग उधळणे या वाक्‍प्रचारांचा अत्‍यंत खुबीने वापर करुन काढलेली व्‍यंगचित्रे नावीन्‍यपूर्ण आणि सदाबहार वाटतात. राजकीय पक्षाच्‍या झेंड्याचा रंग न आवडणारा नेता, शिव्‍या देणारे पोलीस, हास्‍यकवी संमेलनातील कवी, पेशंट अशा वेगवेगळ्या

व्‍यक्‍तिमत्‍वांचा त्‍यांनी वापर केला आहे. होळीनिमित्‍त होणारी वृक्षतोड थांबावी, वृक्षसंवर्धन व्‍हावे, यासाठी व्‍यंगचित्रकार म्‍हणून सहजतेने ते संदेश देऊन जातात.

      ‘हसरी शिवार वाणी’ मध्‍ये शेतीविषयक धमाल व्‍यंगचित्रे आहेत. अनेक व्‍यंगचित्रकार केवळ शहरी भागातील जीवनपध्‍दतीवर, समस्‍यांवरच व्‍यंगचित्रे रेखाटतात, असा अनेकदा आरोप होतो. अनेक व्‍यंगचित्रकार ग्रामीण भागातूनच शहरात गेले आहेत, मात्र त्‍यांना आपल्‍या भागाचा विसर पडतो. मात्र, रवींद्र बाळापुरे यांनी ग्रामीण जीवन आणि कृषि संस्‍कृतीवर रेखाटलेली व्‍यंगचित्रे अजोड म्‍हणावी अशीच आहेत. शेतकरी आत्‍महत्‍या, नापिकी, अनियमित पर्जन्‍यमान, पाणीटंचाई अशा भीषण समस्‍या भेडसावणा-या ग्रामीण भागात हास्‍याचे शिवार फुलवण्‍याची ताकद त्‍यांच्‍या व्‍यंगचित्रांतून पहावयास मिळते. कृषि क्षेत्रातील नावीन्‍यपूर्ण प्रयोगांची माहिती शासन विविध माध्‍यमांतून देत असते, मात्र टीव्‍हीवरील असे कार्यक्रम न पहाता चावडीवर जाणारा आणि चित्रहाराच्‍या वेळी परत येणारा आबा मुलांच्‍या नजरेतून सुटत नाही, तसाच व्‍यंगचित्रकाराच्‍या नजरेतूनही सुटत नाही. कृषि क्षेत्रातील समस्‍यांवर सकारात्‍मक पध्‍दतीने मार्मिक भाष्‍य करण्‍यामुळे ‘हसरी शिवार वाणी’ तील व्‍यंगचित्रे हा एक प्रकारचा सांसकृतिक ठेवा झाला आहे.
      रवींद्र बाळापुरे यांना राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कृषिविषयक परिस्‍थितीची अचूक जाण आणि भान असल्‍यामुळेच त्‍यांनी रेखाटलेली व्‍यंगचित्रे एकूणच परिस्‍थितीवर मार्मिक भाष्‍य करु शकतात. त्‍यामुळेच ही व्‍यंगचित्रे वाचकांच्‍या मनाला भिडतात.

राजेंद्र सरग जिल्‍हा माहिती अधिकारी, अहमदनगर 9423245456 (व्‍यंगचित्रकार रवींद्र बाळापुरे यांचा मोबाईल 7507329721)

उपवर्ग

एकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.

"व्यंगचित्रकार" वर्गातील लेख

एकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.