Jump to content

लक्ष्मण बळवंत भोपटकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ल.ब. भोपटकर या पानावरून पुनर्निर्देशित)

धर्मवीर लक्ष्मण बळवंत भोपटकर, ऊर्फ अण्णासाहेब भोपटकर (इ.स. १८८० - २४ एप्रिल, इ.स. १९६०; पुणे, महाराष्ट्र) हे मराठी पत्रकार, हिंदुत्ववादी राजकारणी व वकील होते. हे केसरी वृत्तपत्राचे संपादक होते. तसेच हे महाराष्ट्र मंडळ शिक्षणसंस्थेचे संस्थापक व हिंदू महासभेचे माजी अध्यक्ष होते. ल.ब. भोपटकर हे व्यायामशास्त्रतज्ज्ञ होते. त्यांनी व्यायाम आणि व्यायामप्रकार यांच्यावर काही पुस्तके लिहिली आहेत. ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वकील होते. गांधी खून खटल्यातील सर्व आरोपींचे खटले भोपटकरांनी एक पैसाही न घेता चालवले.

स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग

[संपादन]

भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या काळात भोपटकरांनी ६ एप्रिल, इ.स. १९३० रोजी सोलापूर नगरपरिषदेवर राष्ट्रीय झेंडा फडकवला. तसेच ते इ.स. १९३७ सालच्या हैदराबाद सत्याग्रहात सहभागी झाले होते. त्यासाठी त्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

व्यक्तिगत जीवन

[संपादन]

लक्ष्मण बळवंत हे "भाला"कार भास्कर बळवंत भोपटकरांचे धाकटे भाऊ होते. त्यांची पत्‍नी यशोदा ही मराठी साहित्यिक विठ्ठल सीताराम गुर्जरांची बहीण होती. लक्ष्मण बळवंत भोपटकरांना चारू, मधु, कुंजविहारी, जगदीश हे चार पुत्र होते; तर इंदू श्रीखंडे, कुमुद मोघे, लीला आणि मीना, या चार कन्या होत्या.

व्यक्तिगत प्रसंग

[संपादन]

इ.स. १९३०च्या सत्याग्रहात त्यांच्यावर एक प्राणसंकट कोसळले होते. ते ज्या कोठडीत बंदिस्त होते त्यात एक नाग घुसला. त्यावेळी जवळपास कोणीच नव्हते. भोपटकर अर्धा तास त्या नागाच्या दृष्टीला दृष्टी लावून बसले होते. नंतर लोक आल्यानंतर भोपटकरांची सुटका झाली. दुसरे प्राणसंकट कोसळण्याची घटना पुण्यात घडली. एका समारंभाला जात असताना त्यांची मोटार बाँबस्फोटात सापडली. त्यात भोपटकरांच्या अंगाला ८२ जखमा झाल्या होत्या.[]

ल.ब. भोपटकर यांनी लिहिलेली किंवा संपादित केलेली पुस्तके

[संपादन]
  • ऐतिहासिक कथापंचक
  • काँग्रेस व कायदेमंडळ
  • कुस्ती
  • केसरी प्रबोध (संपादन)
  • केळकर (संपादन)
  • दांडपट्टा
  • नवरत्नांचा हार (ऐतिहासिक शब्दचित्रे)
  • पुणे सार्वजनिक सभा ज्युबिली अंक (संपादन)
  • महाराष्ट्र सांवत्सरिक (लेखक: श्री.म. माटे; संपादक : ल.ब. भोपटकर)
  • माझी व्यायाम पद्धती
  • मृत्यूच्या मांडीवर
  • रामशाहीर यांची कविता
  • श्रीबिपीनचंद्रपाल व्याख्याने
  • स्त्रियांचे व्यायाम
  • स्वराज्याची मीमांसा
  • हिंदू समाज दर्शन

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ जोगळेकर, ज.द. हिंदुत्ववादी धुरंधर नेते.