लसीकरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लसीकरण
वर्गीकरण व बाह्यदुवे
आय.सी.डी.- 99.3-99.5

प्रत्येक लस म्हणजे खुद्द त्या त्या रोगाचे मेलेले किंवा अर्धमेले केलेले जंतू असतात, किंवा त्या जंतूंचा अंश असतो. ही लस शरीरात गेली तर जणू काही त्या रोगाची रंगीत तालीमच होते. लसींत सबळ जंतू नसल्याने रोग तर होत नाही पण शरीराला त्या रोगजंतूंशी लढण्याचा अनुभव प्राप्त होतो. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी या लसीचे शरीरात देणे म्हणजे लसीकरण होय. लसीकरणामुळे आजाराची तीव्रता कमी केली जाते किंवा काही आजार टाळले जातात.[ संदर्भ हवा ]

पोलिओ लसीकरण[संपादन]

जगात पोलिओ निर्मूलनासाठी दोन महत्त्वाच्या लसीकरण पद्धती वापरल्या जातात. पहिली पद्धत जोन्स साल्क यांनी १९५२ साली यशस्वीरित्या शोधून काढली. या पद्धतीत लस म्हणजे मेलेल्या जीवाणूंचा संच वापरला गेला. हे जीवाणू शरीरात स्नायूमार्फत टोचून दिले जात. नंतर अल्बर्ट सबिन यांनी मुखामार्गे लसीकरणाची पद्धत शोधून काढली. पोलिओचे जीवाणू कोणत्याही प्राण्याच्या शरीरामध्ये फार वेळ राहू शकत नाहीत कारण त्या प्राण्याची रोग प्रतिकार शक्ती त्या पोलिओ विशानुना पळवून लावते व त्यामुळे पोलिओचे कायम स्वरूपी निश्चित असे वाहक निसर्गात नाहीत. या गोष्टीमुळे आपल्या हे लक्षात आले कि मनुष्यांतर्गत पोलिओ विषाणूंचा होणारा प्रसार रोखणे ही जागतिक पोलिओ निर्मुलनातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. असे केल्यामुळे व या दोन लसीकरण पद्धतींचा अवलंब केल्यामुळे आज जगातील सगळ्या देशांमध्ये पोलिओ रुग्णांची संख्या कमी झालेली आहे. याचा पुरावा हा कि गेल्या २० वर्षांमध्ये ३,५०,००० पासून १५०० रुग्णांपर्यंत पोलिओमध्ये घट झालेली आहे.[ संदर्भ हवा ]

बाळ जन्मल्याबरोबर अर्ध्या तासात केलेले स्तनपान म्हणजे बाळाचे पहिले लसीकरण[संपादन]

चीक घट्ट दुधासारखा असतो. त्याचा रंग लिंबाच्या रंगासारखा पिवळसर हिरवा असतो. दुधामध्ये पहिले तीन ते सहा दिवस हा चीक असतो. चीकातील रोगप्रतिबंधक शक्तीमुळे बाळाचे अनेक रोगांपासून संरक्षण होते. उदा. जुलाब, सर्दी, खोकला, कान फुटणे, पोलियो, दमा इत्यादी आजारांपासून बाळाचा बचाव होतो. हा चीक पोटात गेल्यामुळे बाळाला शौचास साफ होते आणि पोटातील काळी घाण शौचावाटे आपोआपच बाहेत पडते. चीक जरी घट्ट असला तरी पचायला तो हलका असतो. या चीकामुळे आतड्यात पाचकरस तयार होण्यास मदत होते. चीक व दुधातील अन्न घटक बाळाला पोषक ठरतात.