रोमन कॅथलिक ब्राह्मण
रोमन कॅथॉलिक ब्राह्मण (रोमन लिपी: Roman Catholic Brahmin), ही भारतातील गोवा आणि मंगलोर येथील लोकांमधील एक जात आहे. हिचे मूळ आजच्या गोवेकर ब्राह्मणांशी जोडले गेले आहे. धर्मपरिवर्तनाने तयार झालेली ही एक आधुनिक जात म्हणता येईल.
उदय[संपादन]
गोव्यात, ब्राह्मण मुख्यत: पौरोहित्याच्या व्यवसाय करत असत. त्याबरोबरच ते शेती, सोनारकी आणि व्यापारदेखील करत असत. ह्या जातीचे मूळ आपल्याला जुन्या मिळकतीच्या, अर्थात वेल्यास काँकिस्तासच्या[१] ख्रिस्तवादाबरोबर सापडेल. इ.स.च्या १६व्या आणि १७व्या शतकात पोर्तुगीजांनी गोव्यात आक्रमणासोबत, ख्रिस्ती धर्माचा प्रसार सुरू ठेवला. जेजुआइट, फ्रान्सिकन आणि डोमिनिकन मिशनऱ्यांनी स्थानिक गौड सारस्वत, पद्ये (पध्ये किंवा पाध्ये किंवा भट अशी जातनावे असलेले गोव्यातील ब्राह्मण), दैवज्ञ इत्यादी शाखांच्या ब्राह्मणांना ख्रिश्चन धर्मात आणले.
धर्मपरिवर्तित झालेल्या सर्व ब्राह्मण पोटजातींना, ख्रिस्ती ब्राह्मण जातीत धरले गेले. बहुतांश भागातील धर्म परिवर्तन हे सक्ती-स्वरूप फतव्याने करण्यात आले. धर्मांतरानंतरही ब्राह्मणांनी आपला ब्राह्मणवाद सोडला नाही. त्यामुळे त्यांना यज्ञोपावीत (जानवे) घालण्याची तसेच अन्य ब्रह्म-चिन्हे (माळ, भस्म, धोतर, गंध) वापरण्याची मुभा होती, पण त्यासाठी ह्या सर्व गोष्टी चर्चकडून मंतरून दिल्या जात असत. ब्राह्मणांचे धर्मांतर केले की, बहुजन समाज आपोआप त्यांच्या मागे येईल, असे ख्रिस्ती धर्मप्रचारकांना वाटत होते. ब्राह्मणांना आकर्षित करण्यासाठी मिशनऱ्यांनी त्यांना ब्राह्मण्य कायम ठेवले जाईल, अशी हमी दिली. त्यातून ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतरही ब्राह्मणांना जानवे घालण्याची मुभा मिळाली. आर्थिक लाभ आणि सवलतीही मोठ्या प्रमाणावर दिल्या. काही प्रमाणात ब्राह्मणांच्या धर्मांतरासाठी तत्कालीन रूढींचा फायदा घेतला गेला.
संदर्भ व नोंदी[संपादन]
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |