रिव्हर्स्ड रियालिटीज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रिव्हर्सड रिआलिटीज हे नायला कबीरलिखित पुस्तक आहे[१]हे पुस्तक मुख्यतः विकासाच्या संकल्पनेवर लिंगभाव परिप्रेक्ष्यातून चिकित्सकरित्या भाष्य करते. या पुस्तकामध्ये लेखिका विकास हि संकल्पना लिंगभावाच्या चष्म्यातून बघत आहेत आणि त्यात असलेले वेगवेगळे दृष्टीकोन त्या स्पष्ट करत आहेत. त्याचबरोबर त्यांनी विकास या संकल्पनेची स्त्रीवादी दृष्टीकोनातून चिकित्सा केलेली आहे.

पुस्तकातील घटक[संपादन]

या पुस्तकामध्ये साधारणतः विकासामध्ये स्त्रियांचे सभासदत्व, विकासातील स्त्रिया या विषयीचा संरचनात्मक दृष्टीकोन, विकासाचे लिंगभाव परिप्रेक्ष्यातून असलेले वेगवेगळे दृष्टीकोन त्याचबरोबर लिंगभाव, आणि घरदार, स्त्रिया, मातृत्व आणि लोकसंख्या धोरण, लिंगभाव प्रशिक्षणातील प्रश्न इ. गोष्टींचा समावेश आहे.

प्रकरणांची ओळख[संपादन]

हे पुस्तक साधारणतः तीन विभागांमध्ये विभागले गेले आहे. पहिले चार प्रकरणे स्त्रीवाद आणि विकास याविषयक चर्चांवर सैद्धांतिक मांडणी करते. नंतरचे तीन प्रकरणे हे विकासाचे विचार आणि व्यवहार यामधील महत्त्वाच्या संकल्पनांचे विश्लेषण करते तर शेवटच्या प्रकरणांमध्ये व्यवहारातील काही उदाहरणे घेऊन त्यामधील कल्पना आणि व्यवहार यांच्यातील संबंधाचे परिक्षण केले आहे. या पुस्तकातील बरीचशी प्रकरणे ही विकासाच्या संकल्पनेवर भाष्य करतात. विकासाची संकल्पना स्पष्ट करताना ती सर्व इतर संदर्भात स्पष्ट करावी लागते. ती वेगवेगळ्या विचारप्रणालीवर आधारलेली संकल्पना आहे. या संकल्पनेविषयक असणारी गुंतागुंती विषयीची मांडणी नायला कबीर करतात. त्याचबरोबर विकासासंदर्भात लिंगभावात्मक प्रश्न यावरही या पुस्तकामध्ये प्रकाश टाकलेला आहे. विकासाच्या संदर्भात महत्त्वाचा मुद्दा त्या मांडतात की, विकासाच्या क्षेत्रामध्ये धोरणे आणि संकल्पनांची आखणी करताना महत्त्वाच्या वित्तीय संस्था, संघटना यांची महत्त्वाची भूमिका असते. नायला कबीर यांच्या मते विकासाच्या धोरणांची आखणी करताना किंवा ठरविताना स्त्रियांना वगळले जाते. असे घडण्यामागचे मुख्य कारण म्हणजे धोरणकर्ते स्त्रियांचे विकासामध्ये योगदान मानत नाही. त्या विकासाच्या फक्त ग्रहणकर्त्या म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. त्यामुळे विकासविषयक संशोधन आणि धोरणे यामध्ये अदृश्य राहिलेल्या दिसतात. त्यामुळे स्त्रीवाद्यांनी विकासाची धोरणे आणि संशोधन यांमध्ये 'स्त्री' या कोटीक्रमाला दृश्यता मिळावी अशी मांडणी केली आणि म्हणून विकासातील स्त्रिया या दृष्टिकोनाचा मुख्य उद्देश असलेला दिसतो. त्यामुळे पहिल्या दोन प्रकरणांमधून आंतरराष्ट्रीय विकासामध्ये 'विकासातील स्त्रिया' या दृष्टिकोनाचा उगम आणि या दृष्टीकोनाविषयक सैद्धांतिक मांडणी त्याचबरोबर या दृष्टीकोनाचे धोरणात्मक चर्चाविश्वामध्ये असणारे योगदान स्पष्ट करते तसेच मुख्यप्रवाही विकासासंदर्भातील सिद्धांत लिंगभाव असमानताना आव्हान देत नाही याविषयी भाष्य केले आहे. तिसऱ्या प्रकरणामध्ये नायला कबीर यांनी विकासाच्या संदर्भातील मार्क्सवादी दृष्टीकोन आणि विकासातील स्त्रिया या दृष्टीकोनांचे चिकित्सक परिक्षण केले आहे.

   या नंतरच्या तीन प्रकरणांमधून विकासाच्या विचारातील महत्त्वाच्या अशा संकल्पना आणि निर्देशांक यावर टिका केलेली आहे. अर्थशास्त्रानूसार विकासाच्या संदर्भात ज्याप्रकारचे विचार, व्यवहार, संकल्पना आणि सिद्धांत मांडले जातात यावर या पुस्तकात टिका केलेली आहे. अर्थशास्त्राच्या घरदाराच्या प्रारुपानुसार घरदारातील सदस्यांमध्ये समान हितसंबंध असतात आणि कुटुंब प्रमुख कोणतेही निर्णय निःस्वार्थी भावनेने घेत असतो परंतू प्रत्यक्षात या गोष्टीबाबत विरोधाभास दिसून येतो. घरादारातील संपत्ती, अन्न, विश्रांतीचा वेळ यामध्ये घरातील सदस्यांमध्ये वेगवेगळी मक्तेदारी असलेली दिसते. त्यामुळे पाचव्या प्रकरणात स्वतंत्र व्यक्ती आणि संरचना, आर्थिकता आणि संस्कृती यांमधील फरक दर्शविला आहे. सहाव्या प्रकरणामध्ये दारिद्र्याचे संकल्पनीकरण आणि दारिद्र्याचे मोजमाप यासाठी पर्यायी मार्ग सुचविले आहे. पुरुषांपेक्षा स्त्रियांचे दारिद्र्याचे अनुभव वेगळे असतात त्याचबरोबर दारिद्र्यासाठी घरातील कुटुंबप्रमुख असलेल्या पुरुषाला लक्ष बनवले जाते आणि स्त्रियांना सामोरे जावे लागणाऱ्या समस्यांकडे लक्ष दिले जात नाही यावर मांडणी केली आहे.
  या पुस्तकातील शेवटची तीन प्रकरणे हि व्यवहार आणि कल्पना यांच्यातील संबंध दर्शवितात. या विभागातील नायला कबीर यांनी लोकसंख्या विषयक केलेली मांडणी महत्त्वपूर्ण आहे. जेव्हा लोकसंख्या विषयक धोरणांचा विचार पुढे येतो तेव्हा स्त्रियांचे शरीर आणि पुनरुत्पादन क्षमता यावर नियंत्रण यावर भर दिला जातो. परंतू स्त्रीवाद्यांच्या मते स्त्रियांना त्यांच्या स्वतःच्या शरीरावर स्वतःचा अधिकार किंवा हक्क हा असलाच पाहिजे. त्यामुळे स्त्रीवाद्यांचा पुनरुत्पादन नियंत्रणाकडे बघण्याचा दृष्टीकोन आणि यासंदर्भात राज्याची राजकीय भूमिका यामध्ये फरक दिसून येतो. त्यामुळे नायला कबीर यांनी या प्रकारच्या चर्चा द्वारे एखाद्या धोरणासंदर्भात गरजेचे राजकारणाचे अन्वयार्थ कशाप्रकारे लावले जातात यावर भर दिला आहे. तर शेवटच्या प्रकरणामध्ये लिंगभाव घडणीमध्ये ज्या वेगवेगळ्या संस्था महत्त्वाची भूमिका बजावत असतात त्यातील आंतरसंबंध कशाप्रकारे दुर्लक्षित केले जातात यावर मांडणी केलेली आहे. त्यामुळे या संस्थांद्वारे लिंगभाव असमानता निर्माण होण्यामध्ये जे नियम, व्यवहार आणि त्यातील आंतरसंबंध यावर चर्चा होणे गरजेचे आहे असे सुचविले आहे.

निष्कर्ष[संपादन]

एकूणच या पुस्तकामध्ये विकास या संकल्पनेकडे आणि विकास प्रक्रिया यांचा लिंगभाव दृष्टीकोनातून चिकित्सकरित्या मांडणी केलेली आहे. तसेच वेगवेगळ्या सामाजिक संस्था यांमधून जी लिंगभाव असमानता निर्माण होते त्याचाच परिणाम विकासाची धोरणे आखताना देखील होताना दिसतो यावर सूक्ष्म पद्धतीने मांडणी या पुस्तकामध्ये केलेली दिसते.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ कबीर, नायला (१९९५) रिव्हर्सड रिआलिटीज, नवी दिल्ली : काली फॉर वुमेन