Jump to content

रिचर्ड स्टीले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सर रिचर्ड स्टील हे इंग्रज निबंधकार, नाटककार आणि पत्रकार होते. त्यांचा जन्म डब्लिन ( आयर्लंड ) येथे झाला. त्याचे वडील त्याच्या बालपणीच निधन पावले. त्यानंतर त्याच्या काकांनी त्याची जबाबदारी घेतली. इंग्लंडमधील चार्टरहाउस, ख्राइस्ट चर्च ( ऑक्सफर्ड ) आणि मर्टन कॉलेज ( ऑक्सफर्ड ) येथे त्याने शिक्षण घेतले तथापि सैन्यात जाण्याच्या उत्साहामुळे पदवी मात्र घेऊ शकला नाही. १७०५ मध्ये त्याने सैन्यातली नोकरी सोडली आणि तो नाटके लिहू लागला. द फ्यूनरल (१७०१), द लायिंग लव्हर (१७०३) आणि द टेंडर हजबंड (१७०५) ह्या त्याच्या नाटकांना थोडेफार यश मिळाले. ह्या नाटकांत त्याच्या नर्मविनोदयुक्त व खेळकर लेखनशैलीची चुणूक दिसते. त्याचप्रमाणे जीवनाकडे बघण्याचा त्याचा नीतिप्रधान दृष्टिकोणही स्पष्ट दिसतो. ह्याच जीवनदृष्टीचा परिपोष त्याच्या पुढील सर्व लेखनात सतत झाला.

सरकारचे अधिकृत जर्नल लंडन गॅझेट लिहिण्यासाठी स्टीलची नियुक्ती झाली. त्यामुळे व्हिग पक्षाच्या नेत्यांबरोबरचे त्याचे संबंध दृढावले, तरी त्यातून आपल्या कलात्मक गुणांना वाव मिळत नाही हे त्याच्या लक्षात आले आणि १२ एप्रिल १७०९ रोजी त्याने द टॅट्ल हे नियतकालिक सुरू केले. ते आठवड्यातून तीनदा प्रसिद्ध होत असे. आरंभी ह्या पत्रातून राजकीय वार्ता व चर्चात्मक लिखाण येत असे तथापि लवकरच त्याने आयझॅक बिकरस्टाफ या टोपणनावाने विविध विषयांवर निबंधरूपाने आपले विचार मांडायला सुरुवात केली. या निबंधांचे विषय त्यावेळच्या वाचकांना जिव्हाळ्याचे वाटतील, असे निवडले होते. त्यांतील विचार मनोरंजक पद्धतीने, हलक्या-फुलक्या, खेळकर भाषेत व्यक्त केलेले असत. सर्व विचारांचे सूत्र लोकांचे शिक्षण करण्याचे, त्यांना आदर्श नागरिक बनवण्याचे होते. सत्य, निष्पापपणा, सन्मान आणि सद्गुण हे जीवनाचे अलंकार होत, अशी स्टीलची भूमिका होती. अठराव्या शतकाच्या आरंभी इंग्लंडमधील मध्यमवर्ग पुढे येत होता. व्यापारउदीम करून ह्या वर्गाने स्वतःला मोठी प्रतिष्ठा प्राप्त करून घेतली होती. त्या मध्यमवर्गाला स्टीलने आपल्या लेखनाने जिंकले अफाट लोकप्रियता मिळवली.

चार्टरहाउसमध्ये शिकत असताना स्टीलचा मित्र झालेला ⇨ जोसेफ ॲडिसन ह्यानेही द टॅट्लरमध्ये लिहावयास सुरुवात केली. १७११ सालच्या जानेवारीत द टॅट्लर राजकीय कारणांमुळे बंद पडले आणि १ मार्च १७११ रोजी स्टील आणि ॲडिसन ह्यांच्या संयुक्त संपादकत्वाखाली स्पेक्टेटर हे नियतकालिक सुरू झाले. हे रोज प्रसिद्ध होत असे. ह्यात ॲडिसनचेच लेखन प्रामुख्याने प्रसिद्ध झाले. स्टीलला लेखनासाठी नवीन नवीन कल्पना सुचत. त्या ॲडिसनने उचलल्या व त्यांना स्पेक्टेटरमध्ये आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीने एक आगळे रूप दिले. उदा., सर रॉजर डी कॉवुर्ली हा ग्रामीण भागातील जमीनदार वर्गाचा प्रतिनिधी. ॲडिसनने रेखाटलेली त्याची व्यक्तिरेखा मुळात स्फुरली ती स्टीलला. त्याचप्रमाणे स्पेक्टेटरमधील कितीतरी विविध सदरांची कल्पना स्टीलचीच होती.

स्टील याने वृत्तपत्रीय लेखनाचा पाया घातला. त्याच्या नियतकालिक- -निबंध ( पिरिऑडिकल एसे ) ह्या लेखनप्रकाराचा पुढे अठराव्या शतकात विकास झाला. स्टीलच्या निबंधांतून कधीकधी तात्त्विक चर्चा असे, तर कधी समाजातील प्रातिनिधिक व्यक्तींचे रेखाटन. कधी गोष्टी, तर कधी विनोदात्मक लेखन. कधी एकाच व्यक्तीला निरनिराळ्या प्रसंगांत गोवून तिच्या स्वभावविशेषांचे चिकित्सक दर्शन तो घडवीत असे. ह्यातच काही समीक्षकांना अठराव्या शतकात प्रकर्षाने विकास पावलेल्या कादंबरीची बीजे दिसली. त्यावेळच्या मध्यमवर्गाच्या स्वभावाचा एक पैलू म्हणजे भावविवशता ( सेंटिमेंटॅलिटी ). तो स्टील याच्या लेखनाचाही एक गुण आहे.

स्टीलने आणखीही नियतकालिके चालविली. त्यांतून राजकीय लेखन केले. त्यावेळी त्याचा व्हिग पक्ष सत्तेत नव्हता. त्यामुळे त्याला त्याच्या लेखनाची किंमत मोजावी लागली. १७१३ मध्ये ‘ कमिशनर ऑफ स्टँप्स ’ ह्या पदाचा त्याला राजीनामा द्यावा लागला. ह्याच वर्षी तो पार्लमेंटवर निवडून गेला होता पण १७१४ मध्ये राजद्रोहाचा आरोप ठेवून त्याचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. जॉर्ज पहिला सत्तेवर आल्यानंतर त्याचे दिवस पालटले. १७१५ मध्ये त्याला ‘ सर ’ हा किताब देऊन गौरवण्यात आले. त्याच वर्षी तो पार्लमेंटवरही पुन्हा निवडून गेला.

वेल्शमधील कामार्थेन येथे तो निधन पावला.