Jump to content

राणी दुर्गावती विद्यापीठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जबलपूर विद्यापीठ हे मध्य प्रदेश राज्यातील एक विद्यापीठ. याची स्थापना जबलपूर येथे १९५७ साली झाली. याची कक्षा जबलपूरच्या महसुली जिल्ह्यापुरतीच मर्यादित आहे. यातील २६ महाविद्यालये विद्यापीठाशी संलग्न आहेत. विविध भाषा व त्यांचे संशोधन करणारी संस्था या विद्यापीठातच विद्यापीठीय संस्था म्हणून अंतर्भूत केली आहे. याशिवाय विद्यापीठात पदव्युत्तर परीक्षांचे अध्यापन करणाऱ्या १८  विद्याशाखा आहेत. त्यांतून अध्ययन व संशोधन चालते. मुख्यतः हिंदी, संस्कृत, पाली, प्राकृत या भाषा व प्राचीन इतिहास व संस्कृती तसेच पुरातत्त्वविद्या, भौतिकशास्त्रे, शिक्षणशास्त्र, आयुर्वेद, वैद्यक, वाणिज्य हे विषय शिकविले जातात. मानव्य कक्षेतील प्रथम पदवीपर्यंत इंग्रजी व हिंदी माध्यम असून पुढील पदव्युत्तर शिक्षणाचे माध्यम इंग्रजी आहे. विद्यापीठाच्या कक्षेतील अध्यापक आणि स्त्रिया यांना बहिःस्थ विद्यार्थी म्हणून परीक्षांना बसण्याची परवानगी देण्यात येते. मात्र प्रयोगशाळांव्यतिरिक्त ज्यांचा अभ्यास करता येईल, असाच विषय असावा, असे बंधन आहे.

विद्यापीठाचे संविधान इतर विद्यापीठांप्रमाणेच असून कुलगुरू हा सवेतन सर्वोच्च प्रशासनाधिकारी आहे. त्याची मुदत चार वर्षांची असते. परदेशीय विद्यापीठांची माहिती देणारे एक खास कार्यालय येथे असून ते परदेशीय विद्यापीठे आणि उच्च-शिक्षण संस्था यांची माहितीपत्रके व वार्षिक इतिवृत्ते मिळवते आणि उच्च-शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना संबंधित विषयांचा अभ्यासक्रम, शुल्क आणि इतर सवलतींची माहिती देते. विद्यापीठाने त्रिवर्षीय पदवी-अभ्यासक्रम स्वीकारला आहे. बहुतेक संलग्न महाविद्यालये जबलपूर शहरात आणि आसपास आहेत. त्यामुळे या विद्यापीठाचा दर्जा एक स्वायत्त विद्यापीठ म्हणून वाढवावा, हा उद्देश आहे. यामुळे मुख्यतः पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि साऱ्या विद्यापीठाचे संयुक्त जीवन विकसित होऊन आंतरमहाविद्यालयीन सहकार्याला पुष्कळच उत्तेजन मिळू शकेल.

विद्यापीठाचे उत्पन्न १९७१–७२ मध्ये ३८·३८ लाख रु. व खर्च ४०·५६ लाख रु. होता. विद्यापीठीय अभ्यासिका आधुनिक सुखसोयींनी सुसज्ज असून सु. ४०० विद्यार्थ्यांची त्यात एका वेळी अभ्यास करण्याची सोय आहे. ग्रंथालयात ७१,२७९ ग्रंथ असून २७५ नियतकालिके दरवर्षी येतात. १९७१–७२ मध्ये १८,३४५ विद्यार्थी विद्यापीठाच्या सर्व कक्षा तसेच संलग्न महाविद्यालये यांतून शिकत होते.