यक्षगान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बडगुतिट्टू यक्षगान
वीरभद्र तेंकुतिट्टू यक्षगान -एक मुद्रा

यक्षगान (कन्नड - ಯಕ್ಷಗಾನ) हा कर्नाटकातील नृत्यनाट्याचा कलाप्रकार आहे. या अभिजात नृत्यनाट्य शैलीमध्ये नृत्य, गायन, अभिनय, वेशभूषा यांचा संगम आहे. कर्नाटकाच्या सांप्रदायिक कलाप्रकारांमध्ये हा प्रमुख कलाप्रकार गणला जातो. यक्षगानाला इ.स.च्या सतराव्या शतकापासून ज्ञात इतिहास आहे.भक्ती संप्रदायाच्या प्रसारकाळात या कलाप्रकराचे महत्व विशेष वाढलेले दिसून येते.[१]आधुनिक काळात कोटा शिवराम कारंत यांनी या कलेस पुनरुज्जीवित केले. कर्नाटकाच्या किनारी भागातील उत्तर कन्नड, दक्षिण कन्नड जिल्हाउडुपी हे जिल्हे व घाटावरील शिमोगा, चिकमगळूरकेरळातील कासारगोड जिल्ह्यांमध्ये यक्षगानाचा प्रामुख्याने प्रसार आहे.

आरंभीच्या काळातील मराठी नाट्यसंगीतावर यक्षगानाचा काही अंशी प्रभाव पडला होता.

प्रमुख अंग[संपादन]

यक्षगानाची प्रमुख अंगे खालीलप्रमाणे -

 • प्रसंग (कथाविषय): यक्षगानाच्या प्रवेश वा कथाविषयास प्रसंग असे संबोधतात. प्रसंग बहुतांशी पौराणिक असतात. नाट्य असलेले प्रसंग निवडले जातात. उदा. महाभारतातील भीम दुर्योधनाच्या गदायुद्धाची कथा "गदायुद्ध प्रसंग" म्हणून प्रसिद्ध आहे. पौराणिक प्रसंग जरी बहुसंख्येने असले, तरी विषय पौराणिकच असावा असे बंधन नाही. आधुनिक काळात ऐतिहासिक, सामाजिक प्रसंगही प्रयोगासाठी घेतले जातात.
 • पात्रधारिगळू (नट व नट्या): प्रसंगातील कथेत अनेक पात्रे अभिनय करतात. कोणत्याही नाटकाप्रमाणे यातही स्त्रीपात्र, खलनायक पात्र, विदूषक पात्र, नायक पात्र इत्यादी पात्रे असतात. यक्षगान सामान्यतः रात्रीच्या वेळी ग्रामीण प्रेक्षकांसमोर सादर होते. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची मुख्य कामगिरी यांस पार पाडावी लागते.
 • वेषभूषण (वेशभूषा): यक्षगानाचे तेंकुतिट्टू व बडगुतिट्टू हे जे दोन प्रकार आहेत, त्यांतील फरक मुख्यतः पोषाखात आहे. यक्षगान हे वेगवेगळ्या व्यावसायिक मंडळींकडून सादर होते. त्यामुळे प्रेक्षकांना आकर्षून घेण्यासाठी वेशभूषेचा आधार घेतला जातो. नाटकाप्रमाणे येथेही पात्रांचे महत्त्व, फरक, प्रवृत्ती वेशांद्वारा दाखवल्या जातात. नायक व खलनायकांचा मुकुट सर्वसामान्य पात्रांपेक्षा बराच भारदस्त असतो. स्त्रीपात्रांचा मुकुट लहान असतो. तेंकुतिट्टू शैलीतील वेशभूषा बडगुतिट्टू शैलीपेक्षा बरीच वेगळी असते.
 • भागवतिके(गायक): यांना हाडुगारिके असेही संबोधतात. कथानकाच्या पार्श्वभूमीवर भागवतिके गायन करतात. या पदांस भागवतरू असे म्हणतात. नटमंडळी नृत्य करत असताना पार्श्वगायनाचे मुख्य काम भागवतिके करतात. संदर्भानुसार आवाजात तो तो भाव आणणे हे गायकांकडून अपेक्षित असते.
 • मातुगारिके(निवेदक): गायकाने गायलेल्या गाण्याचा अर्थ सारांश सामान्य जनतेला समजावण्याचे व सारांश सांगण्याचे काम निवेदकाकडे असते.
 • हिम्मेळ (वादक): वादकमंडळी साथीसाठी व पार्श्वसंगीतासाठी खालील वाद्ये वापरतात :
 1. चंडे
 2. मद्दले
 3. मृदंग
 4. टाळ
 5. जागटे

यक्षगानाच्या विविध शैली[संपादन]

तेंकुतिट्टू व बडगुतिट्टू अश्या यक्षगानाच्या दोन शैली आहेत. या दोन्हींतील मुख्य फरक वाद्ये व वेशभूषेचा आहे. बडगुतिट्टू शैलीचा प्रचार कोटा शिवराम कारंत यांनी केला. उडुपी, उत्तर कन्नड आदी जिल्ह्यांमध्ये या शैलीचा प्रसार आहे. तेंकुतिट्टू शैली केरळालगतच्या कर्नाटकात लोकप्रिय आहे. या शैलीवर कथकलीचाही प्रभाव आहे.

प्रमुख कलाकार[संपादन]

 • भागवतिके : नेब्बूरू नारायण, दि. उप्पूरू नारणप्पा, कडतोक मंजुनाथ भागवत, दि. गुंडमी काळिंग नावुड, सुब्रह्मण्य धारेश्वर, नारायण शबराय, बलिप नारायण भागवतरू, दामोदर मंडेच्च, पोळ्य लक्ष्मीनारायण शेट्टी, कोळगी केशव हेगडे, लीलावती बैपाडित्ताय, पद्याण गणपती भट, दिनेश अम्मण्णाय, पुत्तिगे रघुराम होळ्ळ.
 • हिम्मेळ : दि. नेड्ले नरसिंह भट, के. हरिनारायण बैपाडित्ताय, कुद्रेकुड्लू राम भट, केशव बैपाडित्ताय, मोहन बैपाडित्ताय, पद्याण शंकरनारायण भट, अडूरू गणेश राव.
 • पात्रधारी : दि. केरेमने शिवराम हेगडे, केरेमने महाबल हेगडे, केरेमने शंभु हेगडे, चिट्टाणी रामचंद्र हेगडे, कोंडदकुळी रामचंद्र हेगडे, ऐरोडी राम गाणिग, मंटप प्रभाकर उपाध्याय, गोडे नारायण हेगडे, बळकुरू कृष्णयाजी, जलवळ्ळी, कण्णिमने गणपती हेगडे, भास्कर जोशी, कुंबळे सुंदर राव, वासुदेव सामग, बण्णद महालिंग, चंद्रगिरि अंबु, सुब्रह्मण्य हेगडे चिट्टाणी, सिद्धकट्टे चेन्नप्पा शेट्टी, के. गोविंद भट, कोळ्युरू रामचंद्र राव.
 • ताळ मद्दले : शेणी गोपालकृष्ण भट, मालपे लक्ष्मीनारायण सामग, डॉ. प्रभाकर जोशी, किरिकाड्डू मास्तर् विष्णू भट, देराजे सीतारामय्या, डॉ. रमानंद बनारी, यू.बी. गोविंद भट, जब्बर समो संपाजे
 1. ^ Kāranta, Śivarāma (1997). Yakṣagāna (इंग्रजी भाषेत). Abhinav Publications. ISBN 978-81-7017-357-1.