मेरी ॲनिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उदयोन्मुख लेखCrystal Project tick yellow.png
हा लेख ८ जुलै, २०१२ रोजी मराठी विकिपीडियावरील उदयोन्मुख सदर होता. २०१२चे इतर उदयोन्मुख लेख
मेरी ॲनिंग
मेरी ॲनिंग व तिचा कुत्रा ट्रे, पार्श्वभूमीवर गोल्डन कॅप दिसत आहे. (चित्रणकाळ: इ.स. १८४२पूर्वी)
जन्म २१ मे, १७९९ (1799-05-21)
लाईम रेगीस, डॉर्सेट, इंग्लंड
मृत्यू ९ मार्च, १८४७ (वय ४७)
लाईम रेगीस
मृत्यूचे कारण स्तनाचा कर्करोग
चिरविश्रांतिस्थान सेंट माइकल्स चर्च, लाईम रेगीस
50°43′32″N 2°55′54″W / 50.725471°N 2.931701°W / 50.725471; -2.931701
पेशा जीवाश्म संग्राहक, पुराजीवशास्त्रज्ञ
धर्म काँग्रेशनल चर्च व नंतर ॲंग्लिकॅनिझम
वडील रिचर्ड ॲनिंग
(इ.स. १७६६ - इ.स. १८१०)
आई मेरी मूर
(इ.स. १७६४ - इ.स. १८४२)[१]
नातेवाईक जोसेफ ॲनिंग
(भाऊ; इ.स. १७९६ - इ.स. १८४९) [१]

मेरी ॲनिंग (इंग्लिश: Mary Anning) (२१ मे, इ.स. १७९९ - ९ मार्च, इ.स. १८४७) ह्या ब्रिटिश पुराजीवशास्त्रज्ञ [श १] तसेच जीवाश्म संग्राहक [श २] व व्यापारी होत्या. त्या लाईम रेगीस, डॉर्सेट येथील निवासी होत्या. त्यांनी लाईम रेगीस भागात शोधलेल्या अनेक ज्यूरासिककालीन सागरी जीवाश्मांसाठी त्या जगभरात प्रसिद्ध झाल्या. त्यांच्या योगदानामुळे इतिहासपूर्व काळातील जीवन व पृथ्वीचा इतिहास यांच्या वैज्ञानिक आकलनामध्ये मूलभूत बदल घडले.

जीवन[संपादन]

लाईम रेगीस प्रदेशातील ब्ल्यू लिआस कड्यांमध्ये त्या जीवाश्मांचा शोध घेत. विशेषतः हिवाळी दिवसांमध्ये, जेव्हा भूस्खलनामुळे [श ३] खडकांतील जीवाश्म उघड्यावर पडत. अशा वेळी लवकरात लवकर जीवाश्म गोळा करणे आवश्यक होते अन्यथा ते समुद्रात वाहून जाण्याची शक्यता होती. हे काम अवघड होते व इ.स. १८३३ मधील अशाच एका भूस्खलनात त्यांचा जवळजवळ जीव जाणार होता. त्या भूमीपातात त्यांचा कुत्रा ट्रे मात्र मरण पावला. त्यांचा उल्लेखनीय शोध म्हणजे पहिल्यांदा बरोबर ओळखला गेलेला 'इक्थिऑसॉर' [श ४] नावाच्या डायनासॉरचा सापळा. हा सापळा मेरी व त्यांचा भाऊ जोसेफ यांना त्यांच्या वयाच्या केवळ बाराव्या वर्षी सापडला होता. त्यांचे इतर महत्त्वाचे शोध म्हणजे, 'प्लेसिऑसॉर'चे [श ५] पहिले दोन सापळे, 'टेरॉसॉर'चा [श ६] जर्मनीबाहेर सापडलेला पहिला सापळा आणि काही माशांचे महत्त्वपूर्ण सापळे. त्यांच्या निरिक्षणांमुळे असा शोध लागला, की 'कॉर्पोलाईट' दगड (जे 'बेझोआर' [श ७] दगड म्हणून त्या काळात ओळखले जात) हे खरे पाहता जीवाश्मरूपातील विष्ठा [श ८] आहेत. तसेच बेलेमनाईट [श ९] जीवाश्मांमध्ये त्यांना जीवाश्मरूपातील 'शाईची पिशवी' आढळली. अशी पिशवी सहसा ऑक्टोपस व इतर सेफलोपॉड [श १०] प्रजातीतील प्राण्यांमध्ये आढळते. यावरून बेलेमनाईट हे याच प्रजातीतील असावेत असा निष्कर्ष काढण्यात आला. भूगर्भशास्त्रज्ञ हेन्री दे ला बेचे यांनी 'दुरिआ ॲन्तिक्विऑर' [श ११] हे मेरी ॲनिंगच्या जीवाश्मांवर आधारित वित्र काढले. प्राचीन काळातील जीवन दाखवणारे व मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळालेले ते पहिले चित्र होते. या चित्राच्या प्रती विकून हेन्री यांनी मेरी ॲनिंगला त्याच्या विक्रितील काही भाग मदत म्हणून दिला.

इ.स.च्या १९व्या शतकातील वैज्ञानिक समुदायात प्रामुख्याने श्रीमंत व ॲंग्लिकन धर्माच्या पुरुषांचे वर्चस्व होते. ॲनिंग यांचे स्त्री असणे, तसेच त्यांचा सामाजिक स्तर (त्यांचे वडील सुतारकाम करत) यामुळे त्यांना तेव्हाच्या वैज्ञानिक समुदायात पूर्णपणे सहभागी होता आले नाही. त्यांनी जवळपास पूर्ण आयुष्य आर्थिकदृष्ट्या हालाखीत काढले. त्यांचे कुटुंब गरीब होते तसेच चर्चच्या तेव्हाच्या कयद्यांनुसार त्यांना सामाजिक भेदभावास तोंड द्यावे लागले. त्या अकरा वर्षाच्या असतांनाच त्यांचे वडील मरण पावले.

त्यांच्या शोधांमुळे त्यांचे नाव ब्रिटन, युरोप आणि अमेरिकेतील भूगर्भशास्त्रज्ञांमध्ये सुपरिचित झाले. तसेच जीवाश्म गोळा करणे आणि जीवाश्मांच्या शरीररचनेबद्दल अनेक जण त्यांचा सल्ला घेत असत. मात्र एक स्त्री असल्यामुळे त्यांना लंडनच्या जिऑलॉजिकल सोसायटीचा सदस्य बनता आले नाही. त्यांच्या शोधांचे योग्य ते श्रेयही त्यांना अनेकदा मिळाले नाही. एका पत्रात त्या लिहितात, "जगाने माझा इतका निर्दयीपणे उपयोग करून घेतला आहे की मला भीती वाटते त्यामुळे मी सर्वांबद्दल साशंक बनले आहे." इ.स. १८३९ मध्ये त्यांनी 'मॅगझीन ऑफ नॅचरल हिस्टरी' च्या संपादकाना त्या नियतकालिकातील एका दाव्याबद्दल एक पत्र लिहिले होते. त्यांच्या आयुष्यात एकदाच त्यांचे हेच एक लिखाण नियतकालिकांत प्रकाशित झाले.[२]

त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अशा असाधारण आयुष्याबद्दल कुतुहल वाढत गेले. चार्ल्स डिकन्स यांनी इ.स. १८६५ मध्ये मेरी ॲनिंगबद्दल लिहिले की, "[त्या] सुताराच्या मुलीने नाव कमावले आहे आणि ती त्यास पात्र आहे."[३] २०१० मध्ये (त्यांच्या मृत्यूनंतर एकशे त्रेसष्ठ वर्षांनी) रॉयल सोसायटीने त्यांचा समावेश विज्ञानावर सर्वाधिक प्रभाव पाडलेल्या १० ब्रिटिश महिलांच्या यादीत केले.[४]

पारिभाषिक शब्दसूची[संपादन]

 1. पुराजीवशास्त्रज्ञ (इंग्लिश: palaeontologist, पॅलिऑंटॉलजिस्ट)
 2. जीवाश्म संग्राहक (इंग्लिश: fossil collector, फॉसिल कलेक्टर)
 3. भूस्खलन (इंग्लिश: landslide, लँडस्लाइड)
 4. इक्थिऑसॉर (इंग्लिश: ichthyosaur)
 5. प्लेसिऑसॉर (इंग्लिश: plesiosaur)
 6. टेरॉसॉर (इंग्लिश: pterosaur)
 7. बेझोआर (इंग्लिश: bezoar)
 8. जीवाश्मरूपातील विष्ठा (इंग्लिश: fossilised faeces)
 9. बेलेमनाईट (इंग्लिश: belemnite)
 10. सेफलोपॉड(इंग्लिश: cephalopods)
 11. दुरिआ ॲन्तिक्विऑर (इंग्लिश: Duria Antiquior) : एक प्राचीन डॉरसेट


संदर्भ[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
 • "मेरी ॲनिंग" (इंग्लिश मजकूर). ब्रिटिश नॅचरल हिस्टरी म्यूझियम. २६ मे, इ.स. २०१२ रोजी पाहिले.