Jump to content

मेंदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हातावर काढलेली मेंदी

मेंदी ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. स्त्रिया या वनस्पतीचा उपयोग फार पुरातन काळापासून सौंदर्यप्रसाधनासाठी करत आहेत. अनेक सणांमध्ये/धार्मिक कार्यक्रमात मेंदीची कलाकुसर हातावर काढण्यात येते. हिचा वापर करून पांढरे केसही रंगविले जातात. मेंदीचा लेप बनवताना त्यात लिंबू पिळतात, म्हणजे हातावरच्या नक्षीला छान लाल रंग येतो.

मेंदीची नावे:-

  • हिंदी - मेहॅंदी
  • इंग्रजी - Henna., Egyptian Private (?)किंवा Turry Mignonette (?)
  • शास्त्रीय नाव - ‘लॉसोनिया अल्बा’ आणि ‘लॉसोनिया इनरमिस (Lawsonia inermis)
  • कानडी - कोरांत, मदरंगा
  • संस्कृत - मेंधिका, मेंधी, चमेदिका, नखरंजक, रागांगी, यवनेष्टा

हात किंवा केस रंगवायला वापरण्यात येणारी मेंदीची पावडर ही मेंदीच्या पानांपासून बनविली जाते.

मेंदीच्या झाडाचा आढळ आणि त्याची लागवड

[संपादन]

शास्त्रीयदृष्ट्या मेंदीचा सामावेश लिथ्रेसी (Lythranceae) कुळामध्ये होतो. मेंदीचे झाड मूळचे आफ्रिकेतले असले तरी ऑस्ट्रेलिया, युरोप, कॅनडा, पाकिस्तान, इजिप्तपासून आखाती देशापर्यंत प्रसिद्ध आहे. वाळवंटी प्रदेशातले हे झाड भारतात महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान या भागांत आढळते. मेंदीची रोपे बियांपासून तसेच छाट कलमांद्वारेही तयार करतात. ती कोणत्याही प्रकारच्या जमिनीत वाढू शकतात. वाळवंटी प्रदेशातले झाड असले तरी ते समुद्रकाठीही छान वाढते. कोरड्या, उष्ण किंवा थंड हवामानातही तग धरू शकते. मुळे बऱ्यापैकी खोलवर जात असल्यामुळे पूर्ण वाढलेल्या झाडाला पाणीही फारसे घालावे लागत नाही.

मेंदीची झाडे काटेरी असतात आणि गुरे या झाडाची पाने कडू असल्याने खात नाहीत, त्यामुळे ही झाडे कुंपणासाठी लावतात. मेंदीची झुडपे दीड ते तीन मीटर उंच वाढतात. पाने सामान्यपणे समोरासमोर असतात. या झुडपांना एप्रील ते जुलै या महिन्यांत पांढऱ्या किंवा गुलाबी रंगाची सुवासिक फुले येतात. फुलांपासून बनलेले बोंड गोलाकार व बाहेरून शिरायुक्त असते.

उपयोग

[संपादन]

मेंदीचा वापर सौंदर्यप्रसाधनाबरोबरच वस्त्रोद्योगात कापड रंगविण्यासाठीही करतात. पिवळा, तांबडा, पगट, शेंदरी असे रंग विविध पदार्थाच्या मिश्रणाने तयार करून वापरले जातात. पानांमध्ये ‘लॉसोन’ हे रसायन असते ज्याला ‘हेन्नोटॅनिक आम्ल’ असेही म्हणतात. हेन्नोटॅनिक आम्लामुळे त्वचेला किंवा केसांना रंग येतो.

पानातील सेल्युलोजमधून रंगद्रव्ये विरघळून पसरण्यासाठी काही अवधी लागतो. त्यासाठी त्वचा चांगली रंगण्यासाठी मेंदीचा लेप ६ ते १२ तास व्यवस्थित राहणे आवश्यक असते. लॉसोनची प्रथिनांबरोबर रासायनिक अभिक्रिया घडून येते. त्यामुळे प्रथिने असणारे पदार्थ मेंदीमुळे चांगले व पक्के रंगतात. मानवी त्वचा, नखे आणि केसांमध्ये केराटिन नावाचे प्रथिन असते. याशिवाय चामड्याच्या वस्तू, रेशीम आणि लोकर रंगवण्यासाठीही मेंदीचा वापर होतो. आम्लाबरोबर मेंदीचा रंग आणखी गडद होतो म्हणूनच मेंदीचा वापर करताना लिंबू रस, चहा यांचा वापर केला जातो.

मेंदीच्या फुलांपासून हीना नावाचे अत्तर बनते. मेंदीची पेस्ट भाजले, कापले, खरचटले, कीटकदंश आदींनी त्वचेवर आलेल्या सुजेवर गुणकारी असते. मेंदीची पाने वांतिकारक व कफोत्सर्गक आहेत. बिया आंतड्यासाठी स्तंभक असून ज्वरशामक व चित्तभ्रमात उपयोगी आहेत. (आयुर्वेद)

मेंदीची पाने कडू, जखमा भरून आणनारी, मूत्रवर्धक अहेत. डोकेदुखी, कंबरदुखी, स्वासनलिका दाह केसतूट, मुखश्रोथ, उपदंश व्रण, खरूज आदींवर उपयोगी आहेत. (युनानी)

मेंदीच्या झाडाची साल कावीळ. प्लीहावृद्धी आणि मुतखड्यावर देतात. हट्टी त्वचारोगावर, भाजण्यावर, गरम पाण्याने पोळण्यावर लावतात. जळजळणाऱ्या तळव्यांवर मेंदीच्या ताजी पाने लिंबाच्या रसात वाटून चोळतात.