मॅथ्युनी मॅथ्यूज
मॅथ्युनी मॅथ्यूज (इ.स. १९३६ - २१ मे, इ.स. २०१७) हे कुवेतमधील एक व्यावसायिक होते. हे मूळचे भारतातील केरळचे होते. १९५६मध्ये वयाच्या विसाव्या वर्षी कामाच्या शोधात ते कुवेतला गेले. टोयोटा कंपनीत टंकलेखक म्हणून सुरुवात करून १९८९ मध्ये या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून ते निवृत्त झाले. त्यांना टोयोटा सनी या टोपणनावाने ओळखले जात होते.
१९९०मध्ये इराकने कुवेतवर हल्ला केल्यानंतर तेथे अडकून पडलेल्या भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मॅथ्यूज यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मॅथ्यूज यांच्या प्रयत्नांनी आणि समयसूचकतेमुळेच लाखो भारतीयांचा जीव वाचला होता. कुवेतमध्ये त्यावेळी उद्भवलेली परिस्थिती पाहता मॅथ्यूज त्यांच्या कुटुंबासमवेत सहजपणे भारतामध्ये येऊ शकत होते. पण, त्यांनी तसे न करता कुवेतमध्ये असणाऱ्या भारतीयांची जबाबदारी घेत जवळपास १ लाख ७० हजार भारतीयांना आधार देत एअरलिफ्ट करून भारतात यशस्वीरीत्या सुरक्षित परत आणले.
एरलिफ्ट हा चित्रपट मॅथ्युनी मॅथ्यूज यांच्या या कामगिरीवर बेतलेला होता. यात अक्षयकुमारने मॅथ्यूज यांची भूमिका साकारली होती. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.