मृच्छकटिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मृच्छकटिक हे शूद्रक कवीने लिहिलेले उत्तम संस्कृत प्रकरण रूपक आहे. संस्कृतभाषेमध्ये नाटकास रूपक असे म्हणतात. तसेच नाटक हा दहा रूपकांपैकी एक प्रकार आहे .उज्जयिनी नगरीतील गणिका वसंतसेना ही या नाटकाची नायिका आणि चारुदत्त हा नायक.हा नायक जातीने ब्राह्मण वणिक् आहे. तसेच शर्विलक-मदनिका यांची प्रणयकथा तसेच राजकीय सत्तांतर  ही दोन दुय्यम कथानके मुख्य कथानकाबरोबर ह्या रूपकामध्ये एकत्रितपणे गुंफलेली आहेत. या रुपकातून तत्कालीन समाजाचे यथार्थ दर्शन घडते. कालिदासाच्या नाटकांमध्ये दिसणारे राजदरबाराचे चित्रण येथे दिसत नाही. तर समाजाच्या विविध स्तरांतील लोकांचे मनोज्ञ दर्शन नाटककाराने येथे घडविले आहे. त्यामुळे हे संस्कृत साहित्यातील पहिले सामाजिक नाटक ठरते. गृहस्थाश्रमी ब्राह्मण नायक आणि गणिका नायिका यांची प्रणयकथा रूपकाच्या माध्यमातून समाजासमोर मांडण्याचा धाडसी प्रयोग नाटककाराने केलेला आहे. तसेच प्रस्थापित सत्ता उलथवून टाकण्याचा नाट्यशास्त्राच्या नियमांविरूद्ध प्रसंग यात दाखविला आहे. अशा आणि इतर अनेक कारणांमुळे हा संस्कृत रंगमंचावरील धाडसी प्रयोग ठरतो. हे प्रकरण रूपक असल्यामुळे याचे दहा अंक आहेत. त्यापैकी प्रथम चार अंक हे संस्कृत कवि भास याच्या 'चारुदत्त' या रूपकामधून घेतलेले आहेत आणि पुढील सहा अंक ही शूद्रकाची स्वनिर्मिती आहे. काही इतिहास संशोधकांनी या रूपकामध्ये दाखविलेली राजकीय उलथापालथ ही वास्तव घटनेतून प्रेरित असल्याचे सूचित करुन त्याचे ऐतिहासिक पैलू शोधण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. तसेच या नाटकात येणारी पालक आणि गोपाल ही राजांची नावे भास कविच्या प्रतिज्ञायौगन्धरायण आणि स्वप्नवासवदत्तम् या नाटकांतही आढळतात. त्यावरून त्यांची ऐतिहासिकता सिद्ध करण्यास सबळता मिळते.

या रुपकांधील पात्रे ही समाजातील सर्वसामान्य जन असल्यामुळे त्यांची भाषा ही प्राकृत आहे. यामध्ये महाराष्ट्रीय प्राकृत, शकार भाषा असे प्राकृत भाषांचे अनेक प्रकार यांत दृग्गोचर होतात. एका गणिकेचा ब्राह्मण वणिकाशी विवाह आणि त्या गृहामध्ये गृहिणी म्हणून प्रवेश हेआजच्याही काळाला न झेपणारे कथानक इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात शूद्रकाने रंगमंचावर दाखविले आहे. यावरुन पूर्वीच्या भारतीय समाजात व्यक्तिस्वातंत्र्य नव्हते हा गैरसमज दूर होतो.

या रूपकाचे वैशिष्ट्य म्हणजे आधुनिक चित्रपटकलेतील सर्रास दाखविला जाणारा प्रेमी युगलांचा पडत्या पावसांतील मिलन-प्रसंग प्रथमतः भारतीय रंगमंचावर या रुपकांत मांडलेला आहे. अशा प्रकारे हा भारतीय चित्रपटसृष्टीसाठी प्रेरणास्त्रोत ठरतो.

या नाटकाच्या कथानकावर मराठीत मृच्छकटिक हे संगीत नाटक आहे. नाटकाच्या कथानकावर आधारित वसंतसेना नावाचा मराठी चित्रपट आचार्य अत्रे यांनी काढला. या चित्रपटाचे दिग्दर्शन गजानन जहागीरदार यांनी केले होते.

याआधी १९२९ साली दादासाहेब फाळके यांनी वसंतसेना नावाचा चित्रपट काढला हो याच नावाचा कानडी चित्रपट १९४१ साली, हिंदी चित्रपट १९४२ साली निघाले. वसंतसेना नावाचा तेलुगू चित्रपट १९६७ साली आणि तमिळ चित्रपट २०१४ साली निघाले.

मराठीतले नाटक गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिले होते. ह्या नाटकाचा पहिला प्रयोग सन १८८७ सालीं 'ललितकलोत्सव मंडळी’ने केला होता.

यातील वसंतसेनेची भूमिका आजवर शांता मोडक, कीर्ती शिलेदार, वनमाला, कान्होपात्रा दत्तात्रेय किणीकर, मधुवंती दांडेकर या अभिनेत्रींनी मृच्छकटिक नाटकात नायिकेची भूमिका केली आहे.